रविवार, डिसेंबर ०६, २००९

जैनधर्म - व्यक्तिस्वातंत्र्य व स्वावलंबन

जैनधर्म - व्यक्तिस्वातंत्र्य व स्वावलंबन
एकेंन्द्रियापासून ते पंचेंद्रियांपर्यंत प्रत्येक प्राणी हा स्वतंत्र आहे. त्याची निर्मिती ईश्वराने केली नाही त्यामुळे ईश्वर त्याचा नाश ही करू शकत नाही. त्याचे अस्तित्व व उत्पत्तीची- नाशाची प्रक्रिया हा वर्षानुवर्षे सुरू असलेल्या व्यवस्थेचा एक भाग आहे. त्याच्या हातून काही चांगले घडले वा वाईट घडले तरी त्याला तो स्वतः वैयक्तिकरित्या जबाबदार आहे. ईश्वराचा त्यात कसलाही सहभाग नाही.अडचणींच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा व सुखप्राप्तीचा उपाय ज्याचा त्यालाच करावयाचा आहे म्हणजे स्वावलंबनानेच तो आपला आत्मविकास साधू शकतो. स्वातंत्र्य गमावणे-पारतंत्र्य भोगणे म्हणजे काम – क्रोधादि विकारांना बळी पडणे. आणि स्वतंत्र्य मिळविणे म्हणजे काम – क्रोधादि विकारांवर ताबा मिळविणे. हा ताबा श्रद्धा आणि ज्ञानार्जनासाठी आवश्यक आहे. आपले सुख किंवा दूःख, ज्ञान किवा अज्ञान यास दुसरे कोणी जबाबदार नाही. जिवनाचा विकास साधायचा तो स्वतः प्रयत्न करून आणि जिवनात अवनती आली तरी त्याला स्वतःचीच कृत्ये जबाबदार. त्यामुळे घडणाऱ्या घटनांचा कर्ता-धर्ता इतरत्र वा दुसरा कोणी हे जैनधर्माला मान्य नाही.

जगातला प्रत्येक सजीव घटक आपल्या बऱ्या-वाईटाचा, हित-अहिताचा स्वतःच निर्माता आहे. म्हणजे स्वतःचा ईश्वर स्वतःच आहे. पण विचाराच्या गोंधळामुळे, इतर संस्कारांमुळे परंपरा आणि अंधश्रद्धा यांच्यामुळे त्याला हे स्वयंभू स्वातंत्र्य लक्षात येत नाही. हे स्वातंत्र्य एकदा त्याच्या लक्षात आले, स्वतःच्या सत्वाची खरी ओळख झाली की मग आत्मजागृती हाच खरा सुखाचा मुलमंत्र आहे हे त्याला जाणवते. ईश्वर म्ङणजे आपल्याहून वेगळा असा कोणी नाही तर आत्म्याच्या (चैतन्याच्या) शुद्ध स्वभावरूप अवस्थेचे नाव आहे.

अशारितीने जैन वा श्रमण संस्कृती ही व्यक्तिस्वतंत्र्य व स्ववलंबनावर आधारलेली आहे. विश्वातल्या प्रत्येक व्यक्तित ईश्वरियगुणांचा समुच्चय वा चैतन्यशक्तिचा एकत्रित साठा आहे. उन्नतिच्या दिशेने मार्गक्रमण करावयाचे असेल तर वाईटातून चांगल्याकडे(शुभतेकडे), चांगल्यातून अतिचांगल्याकडे (शुद्धतेकडे) वाटचाल करावी लागते. यालाच निकृष्टातून निघून(निवृत्ती) व ऊत्कृष्टतेकडे प्रस्थान(प्रवृत्ती) असे म्हंटले आहे. हा पलायनवाद नव्हे तर आदर्श जिवनपद्धती आहे. याला पलायनवादच म्ङणायचे असेल तर असे आदर्श पलायन करूनच रामदासांनी दासबोधासारखा अलौकिक ग्रंथ लिहीला, बुद्ध आणि ख्रिस्तांनी मानवता टिकविली, बाबा आमटे आणि मदर तेरेसा यांनी अलोकिक लोकसेवेच्या माध्यमातून, कर्मवीर भाऊराव पाटील आणि ज्यातिबा फुले यांनी क्रातिकारी लोकशिक्षणातून, संत तुकाराम आणि गाडगेबाबा यांनी केलेल्या कडकडीत लोकजागरातून - निकृष्टातून ऊत्कृष्टाकडे जाण्याची वाट आपआपल्यापरिने सुगंधीत केली हे विसरून कसे चालेल.
श्री. पी. ए. पाटील, जयसिंगपूर.

मंगळवार, डिसेंबर ०१, २००९

चार्वाक – एक ओळख

चार्वाक – एक ओळख
चार्वाक! भारताच्या सामाजिक ईतिहासातील विज्ञाननिष्ठ, विवेक प्रामाण्य मानणारे एक धगधगते व्यक्तिमत्व. वर्षानुवर्षाच्या अन्यायावर व शोषणावर ऊत्तरे शोधणारी विचारसरणी. ईतिहासकालीन अशिक्षीत,पिचलेल्या व गांजलेल्या सर्वसामान्य माणसाच्या श्रध्दाळू मनाचा गैरफायदा तत्कालीन प्रस्थापितांनी घेतला. बहुसंख्य लोकांची पिळवणूक केली. त्यांना जनावरांचे जिने जगावयास लावले. हे करित असताना सर्व हक्क, अधिकार, खरे खोटे ठरविण्याची न्याय पध्दती या ना त्या मार्गाने आपल्याच हातात ठेवण्याचे कौशल्य तत्कालीन प्रस्थापितांनी दाखविले. त्यांच्या या व्यवस्थेवर आसूड ओढणारे व स्वतंत्रपणे विवेकाने व्यवस्थेचे वाभाडे काढणारे व्यक्तिमत्व म्हणजे चार्वाक! अन्यायी प्रस्थापित व्यवस्थेविरूध्द विवेकी बंडाचा झेंडा उंच धरणारे क्रांतिकारक म्हणजे चार्वाक! तत्कालीन सर्वच धार्मिक ग्रंथांनी मांडलेल्या व मानलेल्या उच्छादी सिध्दांतांची कठोर चिकीत्सा करणारे ऊमदे समाजसुधारक म्हणजे चार्वाक!
धर्मशास्त्रांचा ऊपयोग तत्कालीन प्रस्थापितांचे हितसंबंध जपण्यासाठीचा मुखवटा वा बुरखा म्हणूनच केला जात असे. सर्व सृष्टी ईश्वरानेच निर्माण केली आहे. ईश्वरानेच माणसाची,निसर्गाची व पशू पक्षांची निर्मिती केली आहे. धर्मशास्त्रेही ईश्वराचीच लिहिलेली शास्त्रे आहेत. त्यातील आचार-विचार,शब्दांचे प्रमाण, निष्ठा,परंपरा व सिध्दांत हे वादातीत आहेत. त्यांना आव्हान देणे तर सोडाच पण त्याची चिकीत्साही केली जाउ शकत नाही. जो या शास्त्रांच्या परंपरेने चालणार नाही-वागणार नाही त्यास दंड देण्याची व्यवस्थाही प्रस्थापित केली आहे. ही शास्त्रे वाचणे, त्यांचा योग्य (?) अर्थ लावणे इ. संबंधीचे अधिकार प्रस्थापितांनाच दिले आहेत. अशी सर्वसामान्य माणसांची धारणा करून ठेवण्यात आली होती. त्यामुळे सर्वसामान्यांची आर्थीक पिळवणूक तर होत होतीच पण सामाजिक अस्मिता नावाची कसलीच चिज अस्तित्वात नव्हती. लोकांच्या नसात व मनात दैववादाचे व निराशावादाचे तसेच अंधश्रध्देचे विष पेरून त्यांची कुचंबणा केली होती.
शास्त्रे मग ती कुणीही निर्माण केली असोत किंवा प्रस्थापित व परंपरेने चालत आलेली मते असोत, त्यांची चिकीत्सा करायची व आपल्या बुध्दीला पटेल, विवेकाच्या ऐरणीवर खरे ऊतरेल तेच स्विकारायचे अशी चार्वाकांची भुमिका होती.
प्रत्यक्ष, अनुमान व शब्द या तीन प्रमाणांच्या आधारे घटना, परिस्थिती यांची चिकित्सा करून सत्यासत्यता पडताळून पाहता येते असा सिध्दांत चार्वाकांनी मांडला.ज्ञानेंद्रियांच्या आधारे होणारे ज्ञान हे प्रत्यक्ष प्रमाण. निसर्गातील गोष्टींचा परस्परांशी संबंध असतो.जसे धूर आणि अग्णी, पाऊस आणि मृदगंध. अशारितीने एकमेकाशी संबंधीत गोष्टींचे ज्ञान हे प्रत्यक्ष प्रमाणानुसार झाले नाही तरी अनुमानाने ओळखता येते. ज्याला पदार्थाचे सत्य ज्ञान झाले आहे अशा खरे बोलणाऱया माणसाने पाहीलेले व सांगीतलेले ज्ञान हे शब्द प्रमाण. अशी चार्वाकांनी या तीन प्रमाणांची मांडणी केली होती.
तर्क व प्रमाणांच्या आधारे धर्मशास्त्रांची कठोर चिकीत्सा चार्वाकांनी केली. लौकिक अनुमान व अलौकिक अनुमान असे अनुमाननचे दोन भाग करून अलौकिक अनुमान चार्वाकांनी नाकारले आहे. लौकिक अनुमानाचेही व्यावहारिक व तात्विक असे दोन भाग करून तात्विक अनुमानाच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत.
देहाहून वेगळा आत्मा नसतो. पुनर्जन्म, स्वर्ग-नरक, ईश्वर,मोक्ष इ.अलौकिक गोष्टींचे अनुमान त्यानी नाकारले आहे.वरील गोष्टीं नाकारल्यामुळे धर्मशास्त्रांनी उभारलेला अलौकिकाचा सारा पसाराच अर्थहिन होतो.

अनुमानामुळेही पूर्ण सत्य कळत नाही. अनुमानाने मिळणारे ज्ञान हे व्यवहारोपयोगी असते, ते पूर्ण सत्याचा बोध करून देत नाही. त्यामुळे अनुमानाच्याही मर्यादा ओळखल्या पाहिजेत. ऋषी, मुनी, धर्मसंस्थापक, प्रेषीत इ. नी केलेली अनुमाने ही पूर्ण सत्य मानल्यामुळे खऱया सत्याचे आपले ज्ञान अपूरेच राहते.धर्मशास्त्रे सर्वश्रेष्ठ व स्वयंभू मानल्यामुळे खोटेपणा आत्मविसंगती व पुनरूक्ती या दोषांनी मंडीत झाले.असे चार्वाकांनी मानले.
धर्मशास्त्र हे संरक्षण करणारे कवच आहे व व्यक्तिची लज्जा, त्याची समाजातील प्रतिष्ठा त्याला मिळणारे ऐश्वर्य आणि व्यक्तिचे अस्तित्व इ. चे रक्षण धर्मशास्त्रांच्या आचरणाने होते.नाहीतर या गोष्टी नष्ट होतात हा कर्मकांडवाल्यांचा दृष्टीकोन होता.
स्वार्थी लोक पावित्र्य, शुचिता, विशुध्दता यांना आपली ढाल करून वावरत असतात. आपल्या हितसंबंधाच्या रक्षणासाठी अशा मुल्यांचा मुखवटा त्यांनी धारण केलेला असतो. आपले हेतू साध्य करून घेण्यासाठी अशा मुल्यांच्या आड हितसंबंधांचे व्यवहार विना- आडकाठी, धार्मिक उत्सवांच्या स्वरूपात पूर्ण करता येतात. वर्षानुवर्षांच्या अशा कृत्यांमुळे भल्याभल्यांना नंतर इच्छा असुनही हा बुरखा फाडता आला नाही, इतका त्याचा पगडा समाजमनावर बसला होता.
थोडासा ईतिहास अभ्यासला तर असे दिसते की, जो गट किंवा व्यक्ती ग्रंथांची-शास्त्रांची निर्मीती करतो तो स्वताच्या विचारांना अनुकूल व त्याचे वा त्याच्या गटाचे हितसंबंध जपणारे विचार, नियम यांचा पुरस्कार करतो.पुरूषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना नगण्य स्थान मिळते. तसे समुदायविशेषांचे हितसंबंध जपणारे, त्यांचे चरितार्थ चालविणारे व इतरांचे आर्थिक शोषण करणारे तत्वज्ञान धर्मशास्त्रांतून प्रसारित होते. अशा चुकीच्या व अवैज्ञानिक गोष्टींवर चार्वाकांनी कठोर टिका केली आहे.
धर्मशास्त्रांमध्येच सर्व ज्ञान सामावलेले आहे अशीही भुमिका काहींनी घेतली. वस्तूतः या शास्त्रांनी स्पर्श न केलेले अनेक विषय आहेत. हे विश्वच इतके अफाट आहे की, त्याच्या संबंधीच्या सर्वांगीण ज्ञानासाठी इतर साधनांची आवश्यकता आहे. कर्मकांड व ज्ञानकांड म्हणजेच सर्वकाही नव्हे. बुध्दीला पटतील तीच शास्त्रातील वचने स्विकारावीत ही चार्वाकांची भुमिका विज्ञाननिष्ठ व विवेकी आहे. प्रत्यक्ष हेच प्रमाण आहे. अलौकिक गोष्टींचे अस्तित्व सांगणारे अनुमान व शब्द यांना चार्वाकांनी प्रमाण मानले नाही. बुध्दीला शरण यायला सांगणारी कोणतीही तत्वे व चिकीत्सेला भिणारी शास्त्रे यांना खरे कसे मानायचे हा चार्वाकांचा खरा प्रश्न होता.
चार्वाक वास्तववादी होते. आत्मा नावाची कोणतीच गोष्ट अनुभवाला येत नाही.त्यामुळे देहसोडून दुसरा आत्मा अस्तित्वात नाही.चेतनायुक्त देह म्हणजेच आत्मा किंबहूना इंद्रिय, मन व प्राण यांनाच आत्मा म्हणता येईल अशी भुमिका चार्वाकांनी घेतली. आत्म्याचे अस्तित्व देहाहून वेगळे मानल्यामुळे देहनिंदा झाली. निव्वळ मांसग्रंथी म्हणून देहाचा (शरिराचा) तिरस्कार केला गेला. कल्पनेतल्या संदिग्ध आत्म्याला प्रतिष्ठा आणि वास्तवातल्या व प्रत्यक्ष दिसणाऱय़ा निश्चित शरिराला हिनत्व दिले गेले.त्यामुळे त्याची हेटाळणी झाली. देहाहून वेगळा आत्मा मानल्यामुळे ऊभा राहीलेला आध्यात्मिक व पारलौकिक विश्वाचा डोलारा चार्वाकांच्या या सडेतोड भुमिकेमुळे कोसळला, हे लक्षात घेतले तर धर्ममार्तंडांनी चार्वाकांना का मारून टीकले हे समजू शकेल.
पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभूतांच्या संयोगातून विश्वाची निर्मिती झाली.तशीच जीवजंतूंचीही निर्मिती झाली. वातावरणात अस्तित्वात असलेल्या अजैविक पदार्थांच्या एकत्रीकरणातून व संयोगातून जिवांची निर्मीती झाली हे विज्ञानानेही स्पष्ट केले आहे.शरिराच्या निर्मितीपूर्वी आत्मा नसतो आणि महाभूतांचे विघटन झाले की चैतन्याचा नाश होतो अशी भुमिका चार्वाकांनी घेतली.

मृत्यूनंतरचे सगळेच अस्तित्व नाकारल्यामुळे पूनर्जन्म, स्वर्ग-नरकाचे ईश्वराकडून मिळणारे फळ इ. गोष्टी बाद होतात. व्रतवैकल्ये, पुराणकथा यासारखी मृत्यूनंतरच्या जीवनाची उठाठेव करणारी संपदा भाकड ठरते आणि वर्तमान जीवन सचोटीने, प्रेमाने व सौहार्दाने व्यतित करण्याची दृष्टी येते. मानवी हितसंबंधातून-शोषणातून –विषमतेतून निर्माण झालेल्या दारिद्य्र, वर्णव्यवस्था, वैधव्य इ. प्रकारांना समाजव्यवस्था नव्हे तर माझेच कर्म कारणीभूत आहे असे म्हणन्याची-मानण्याची वृत्ती नष्ट होते. कृत्रिमरित्या लादलेली दूःखे,व्यवस्था यांना धर्मशास्त्रांच्या आधारात गुंफल्यामुळे निमुटपणे सोशित राहण्याच्या विचारालाच हादरा बसतो व ही व्यवस्था बदलून अधिकाधीक समान पातळीवरची व्यवस्था विकसित करण्याची उर्मी-आकांक्षा निर्माण होते. उत्तम जीवन जगण्याची आशा अंकुरते. हे लक्षात घेवूनच चार्वाकांनी अन्यायावर आधारलेल्या समाजव्यवस्थेला आव्हान दिले.
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यापैकी मोक्ष हा परमपुरूषार्थ सर्वश्रेष्ठ मानला आहे. जन्ममरणाच्या फेऱयातून आणि दूःखातून सुटका असे मोक्षाचे वर्णन केले जाते. चार्वाकांनी हा मोक्ष नाकारून ‘पारतंत्र्य म्हणजे बंध आणि स्वतंत्र्य म्हणजेच मोक्ष’ ही संकल्पना मांडली. स्वातंत्र्यासाठी जगभर होणारी आंदोलने पाहिली, आर्थिक सामाजिक व राजकिय जोखडातून मुक्त होण्यासाठी चाललेली माणसांची धडपड पाहिली तर चार्वाकांनी स्वतंत्र्यालाच सर्वोत्तम पुरूषार्थ का मानले हे लक्षात येईल.
मृत्यूनंतरचे पारलौकिक जीवन नाकारताना वर्तमान जीवनावरचे प्रेम, कर्मसिध्दांत नाकारताना वर्तमानाचा गौरव, ईश्वर नाकारताना स्वभाववाद अशी विधायक बाजू चार्वाकांनी मांडली.
चार्वाक अर्थ आणि काम असे दोनच पुरूषार्थ मानित होते. पण धर्म नाकारताना पारलौकिकाचे फळ देणारे साधन म्हणून तो नाकारलाय हे लक्षात घेतले पाहीजे. शिस्त आणि व्यवस्था हे महत्वाचे आहेतच पण त्यासाठी समाजाचे नियमन करणारी दंडनिती चार्वाकांनी ग्राह्य मानली आहे. धर्म- परलोकात सुख देणारा, पूण्यकृत्य- परलोकात सुख देणारे, पाप- परलोकात दूःख देणारे ही धर्माची संकल्पना चार्वाकांनी नाकारली. पण त्यांनी मानवी मुल्ये नाकारली नाहीत. यावरून चार्वाकांची धर्मटिका म्हणजे समाजधारणेविषयीचे गंभीर चिंतनच होते हे स्पष्ट होते.
य़ज्ञाचे कर्मकांड, त्यात होणारा वेळेचा व द्रव्याचा नाश आणि त्यातील अपरिमित हिंसा हे चार्वाकांच्या यज्ञविरोधामागील कारण होते. चातुर्वण्य हे संस्कृतिचे अधिष्ठान मानायलाही त्यांचा विरोध होता. चातुर्वण्यामुळे समाजाला उच्च-निचतेचा जाच सहन करावा लागला. माणूस हा एकच उच्च वर्ण न मानता सगळी व्यवस्थाच आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी चातुर्वण्याची निर्मिती केली गेली. तीच गोष्ट वंशाची.आपलाच वंश श्रेष्ठ, पवित्र व शुध्द असे म्हणनारी व्यवस्था मुद्दामहून निर्माण केली गेली. अर्थात मानववंशशास्त्राच्या दृष्टीने त्याला आज काहीही अर्थ राहीला नाही. ऐतिहासिकदृष्ट्या वंशशुध्दी व तिच्यामुळे येणारा अहंकार यावर चार्वाकांनी कठोर टिका केली. वंशशुध्दी ही वस्तूस्थिती नसून आभास आहे, तो आपले वरिष्ठत्व टिकविण्यासाठी केलेला प्रचार आहे असे चार्वाक मानातात. यामुळे चातुर्वण्याचा पायाच डळमळीत होतो.



व्याज, नफा व खंड हे कनिष्ठ वर्गाकडून उच्चवर्णीयांपेक्षा मोठ्या प्रमाणात वसूल केले जात होते. संपत्तीच्या उत्पादनात प्रत्यक्ष भाग न घेणाऱया उच्चवर्णावरील व्याजाचे, खंडाचे व नफ्याचे प्रमाण कायद्यानेच कमी केले होते.आणि उत्पादक व्यवसाय करणाऱ्या, संपत्तीची प्रत्यक्ष निर्मिती करून सामाजिक जीवनाचा पाया ठरवणाऱया खालच्या वर्णांवर व्याज, खंड इ. चे दर मोठ्या प्रमानावर लादले होते.अशारितीने अर्थशास्त्राला धर्मशास्त्राचे गुलामच बनविण्यात आले होते. खालच्या वर्णाने कर्जफेडीत अडचण असल्यास काम करून कर्ज फेडावे व उच्चवर्णाने सावकाशिने कर्जफेड करावी असे हे अर्थशास्त्र सांगत होते.
चार्वाकांनी ऋणाविषयी हा बेजबाबदारपणा मान्य केला नाही.समाजाला नियंत्रित करण्यासाठी दंडनिती नावाच्या स्वतंत्र विद्येचा पुरस्कार त्यांनी केला.चांगली कृत्ये, न्याय प्रशासन व कल्याणकारी शासन याचा त्यानी आग्रह धरला होता.
यज्ञाच्या अग्नित तूप जाळण्यापेक्षा (अलौकिकाच्या अभिलाषेपेक्षा ) ते तूप पिउन शरिर व मन धष्टपूष्ट व समर्थ करा असा लौकिक जिवनाबाबतचा विधायक अर्थ त्यानी सांगीतला.प्रस्थापित हितसंबंधावर आधारलेला धर्म नाकारून विधायक मार्ग दाखवून देण्याचे महान कार्य चार्वाकांनी केले आहे.ऋणाला भिण्याचे कारण नाही आणि तूप पिण्यातही काही पाप नाही.संकटांनी खचून-पिचून जाऊ नका, कर्तबगारिने संकटावर मात करा व स्वतःच्या कष्टाचा आस्वाद स्वतः घ्या हा मुलमंत्र सर्वांनाच सारखा सांगितला.
संकुचित विचारांची प्रणाली म्हणजे जसे धर्म नव्हे तसेच मर्यादित लोकांसाठी, त्यांचे हितसंबंध जोपासणारे तत्वज्ञानही नव्हे.विशीष्ठ कर्मकांडात दडणे धर्माला कधीच मानवत नाही.जिवनाला शाश्वत अशा सौंदर्याची आणि सामर्थ्याची देणगी देणारी निर्मितीशील तत्वदृष्टी म्हणजे धर्म. जिवनातला आणि मनातला निराशावाद, भिती त्यागून जिवन उज्वल बनविणारी अशी विचारधारा-शक्तिधारा म्हणजे धर्म असे चार्वाकांनी मानले.
सर्वहितैषी धर्मविचाराच्या प्रतिष्ठापनेसाठी अनेक दार्शनिकांना, तत्वज्ञांना, संत व समाजसुधारकांना प्रसंगी छळ सोसून, अत्याचार सहन करून, प्रस्थपितांचा विरोध पत्करून सत्याची आस धरावी लागली.उत्कटपणे झुंज देऊन जिवनप्रवाहात खऱया-सर्वसमावेशक विचारांची घुसळण करावी लागली, प्रवाह शुध्द करावा लागला,चार्वाकांनी नेमके हेच केले.
हेकेखोरांनी गॅलिलिओ सारख्या शास्त्रज्ञाचे हालहाल केले. ब्रुनो ला जिवंत जाळले. वेन राजाचा खून केला. चार्वाकांचीही शेवटी हत्याच झाली.
सुधारकांना प्रवाहाविरूध्द पोहल्याची किंमत मोजावीच लागते. पण ती सद्सद्विवेकबुध्दी जागृत ठेवून ते मोजतात, म्हणूनच नंतर येणाऱया पिढ्यांना त्यांचे विचार मार्गदर्शन करित राहतात.

श्री. पी. ए. पाटील.

घुसमट

घुसमट

कुणीतरी एकेदिवशी स्वतःच्या आयुष्याचा दिवा मालवून टाकते. मग आपण ठाम आणि सोपे निष्कर्ष काढतो. जसे- दारिद्र्याला कंटाळून आत्महत्या, प्रेमभंगापायी आत्महत्या,नवऱयाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या,नोकरीतील अन्यायाने कंटाळून आत्महत्या, परिक्षेत नापास झाल्यामुळे वा होण्याच्या भितीमुळे आत्महत्या.
आणि मग चर्चा- आत्महत्या करणारी माणसे दुबळ्या मनाची असतात,म्हणजे आपण समर्थ मनाचे असतो.मन दुबळे होते तर मग इतकी वर्षे त्याने जगण्याला कसे तोंड दिले.? आत्महत्या करने दुबळ्या मनाचे लक्षण मानले तर स्वतःचा बळी घेणे हे काय सोपे काम आहे? केवळ कल्पनेनेही समर्थ मनाच्या आपल्याला घाबरे व्हायला होते. मग कल्पनेनेही स्विकारायला समर्थ मनाला जे जड वाटते ते दुबळ्या मनाने कसे केले असेल असा प्रश्र्न निर्माण होतो.
‘ नैराश्याच्या प्रवासातले अखेरचे स्टेशन म्हणजे आत्महत्या ’ असे मानसशास्त्रज्ञ मानातात. आणि फ्रॉइडच्यामते ‘ आत वळलेला राग म्हणजे नैराश्य.’ मनासारखे काही होइनासे झाले की राग येतो.राग साचत जातो.तो कोनावर काढावा हे समजत नाही.शेवटी तो आपल्यावरच काढल्याशिवाय पर्याय नसतो.त्यामुळे स्वतःला निरूपयोगी, बिनकामाचे, अडगळ, क्षुद्र इ. समजण्याकडे कल होतो.या जगात जगण्याच्या लायकीचे आपण नाही असे वाटून तिरस्कार, किळस करण्याकडे ओढा होतो.बाहेरची व आतली परिस्थिती एकच वाटू लागते.या अवस्थेत बाहेरून या जगात आहे वाटणारी व्यक्ति मनाने वेगळ्याच जगात वावरत असते.मग अशा अंधाऱया गुहेतल्या प्रवासाचे वेडच व्यक्तिला लागते.
दैंनदिन जिवनातले मंदावने, कमी झालेले व तुसडे वाटनारे बोलने चालने ही लक्षणे दिसू लागतात.घुसमट वाढते, इतरांना लक्ष द्यायला वेळ नसतो, अंधारी गुहा आणखी अरूंद होते,बाहेर पडण्याची वाट सापडत नाही,धीर राहत नाही,आणि यातून सुटण्याची घाई होते, काहीतरी घडते..कुणाचे बोलणे वागणे घाव घालते.ऊपेक्षा आणि अपमान जिव्हरी लागतो,जगण्याचा हेतू संपतो... आत्महत्येचा हाच तो क्षण असतो, धुसमटवनाऱया अर्थहिन अस्तित्वाचा शेवट.
सगळे घडल्यावर इतरांना कळते, धक्का बसतो, आश्चर्य वाटते, मग निमित्त शोधले जाते, ठाम निष्कर्ष काढले जातात. पण आत्महत्येचा प्रवास खुप आधीपासून सुरू झालेला असतो.खुप काही सोसून झालेले असते आणि शेवटी काहितरी निमित्त होते – मात्र ते कारण नसते.
याविषयावर जॉर्ज शेव कोल्ट यांचे एक छानसे पुस्तक आहे – दि एनिग्मा ऑफ सुसाइड्

सोमवार, मे ०४, २००९

महाराष्ट्र माझा

संकटाने ज्याची पाठ कधी सोडली नाही, संघर्ष ज्याला कधी सुटला नाही, असा महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवी वर्षात आणखी कशाकशाने तळपतो आहे----

स्वाभिमानाच्या नावाखाली मुख्य प्रवाहातून बाजूला होऊन इतर प्रांतियांना धमकावण्यात, प्रसंगी हल्ले करण्यात पराक्रम समजणारा तरीही स्वतःला महा-राष्ट्र म्हणवून घेणारा आणि दहशतीने विचारांचा आवाज बंद करण्यात पटाईत असलेल्या सेना, दल आणि तत्सम् संघटनांच्या भरमारीने तळपतो आहे..
केवळ स्वतःला उच्च पदे भोगता यावीत म्हणून अनेक उलटसूलट व तर्कहीन भुमिका घेऊन सवतासुभा मांडण्यात लोकांचा आत्मसन्मान किती आणि पदासाठी चाललेली खटपट किती? सर्वसामान्यांच्या,कष्टकरी लोकांच्या, धरणग्रस्तांच्या चळवळी मोडून काढण्यात धन्यता मानलेल्या पुढारी नेत्यांचा सुळसुळाट इथेच आहे. लाखो करोडोंची माया बेकायदेशीर मार्गांनी जमवूनही ऊजळपणे फिरत असलेल्या भ्रष्ट लोकांनी महाराष्ट्र तळपतो आहे.

वरील गोष्टींनी अधोगतीचा आलेख ज्याचा खाली आलेला नाही अशा महाराष्ट्राचा प्रवास समृध्दीच्या मार्गावर चालू आहे? स्वातंत्र्य म्हणजे काय हे देशाला शिवबांनीच शिकविले आणि त्या शिवबांचे आपण फक्त पुतळेच उभे केले. दुसरे काय केले?

ज्ञानेश्वरांनी विश्वकल्याणाची प्रार्थना दिली आणि आम्ही आमच्या देशातल्याच इतरांना महाराष्ट्राचे दरवाजे बंद केले. घटनेचे अधिष्ठान बाबासाहेबांनी दिले आणि आपल्याच बांधवांची घरे जाळून आपण ते पुर्णत्वाला नेले? स्त्री पुरूष समता फुल्यांनी शिकवली आणि स्त्रीया जळून मरण्याचे प्रमाण आम्हीच वाढविले. काँग्रेसची स्थापना महाराष्ट्रात अंकुरली आणी पक्षीय यश नव्हे तर वैयक्तिक लाभासाठी आम्हीच संघटनांच्या पाठीत खंजीर खुपसले. गांधींना गुरू याच भुमीत मिळाले आणि सर्वात जास्त कुचेष्टा करून त्यांचा खून कोणी केला?

सहिष्णू हिंदूत्वाच्या विचारांचा जन्म याच भुमित झाला आणि त्याच्या सहिष्णूपणाला आम्हीच सर्वप्रथम जातियवादाच्या दंगलींत जाळून टाकले.औद्योगिक जगताचा हुंकार याच भुमित झाला आणि एकाही उद्योजकाने रोखठोक भुमिका घेवून समाजकारणात-अन्यायाविरूध्दच्या लढाईत ठसा नाही उमटवला।

शिक्षणाचा ज्ञानदिप इथेच तेवला आणि त्याच शिक्षण क्षेत्रात अशैक्षणिक लोकांनी प्रवेशाच्या व नेमणूकीच्या नावावर विद्यार्थ्यांकडून व कर्मचारींकडून भरमसाठ देणग्या गोळा करून खाजगी मालमत्तेची संस्थाने ऊभी केली. अवकाश विज्ञानाचा वेध घेतलेल्या विभूती इथेच जन्मल्या आणि ग्रहतारे यांची भिती दाखवून लोकांना लुबाडणारेही इथेच मोठे झाले.

१९९२ चे मुंबई बाँबस्फोट, पूर, दुष्काळ, शेतकरी यांच्या आत्महत्या अशी संकटे आम्ही पहात बसलो-त्यावर कायमस्वरूपी उपाय नाही शोधले. फळबाग लागवड, हापूस आंबा, बोर, सिताफळे, डाळींब, द्राक्षे, मोसंबी हे सर्व पिकले-बाजारपेठ फुलली आणि कुपोषीत बालकांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र वाढले. मुंबई बाँबस्फोटाने आर्थीक राजधानी हे बिरूद नसेल हिरावून नेले पण आमच्या आत्मसन्मानावर हल्ला झाला तो कशामुळे?

एकवीस हजारांची उंची गाठल्यावर काहींनी स्वप्नांचे मनोरे बांधले तरी तेच मार्केट कोसळल्यावर अनेक छोट्या गुंतवणूकदारांची आयुष्याची पूंजी देशोधडीला लागलीच की.आरोग्य सेवा उपलब्ध असूनही शेकडो लोक वेळेत ऊपचार न मिळाल्यामुळे मृत्यू पावतात हे, त्या सेवेच्या यशस्वितेचे प्रमाण कसे मानायचे?

स्त्रिला सन्मान बहाल करणारे हक्क महाराष्ट्राने दिले आणि बलात्कार, हुंडाबळी यामुळे तिची अवहेलनाही आम्हीच नाही केली? सर्वांना बरोबर घेवून जाणारा एकही मराठी नेता पंतप्रधान झाला नाही, हे नेकीमुळे घडले की इतरांचा विश्वास गमावल्यामुळे झाले?

पू्र्वेतील ऑक्सफर्ड ही ओळख राज्याने कमावली आणि शिक्षणसेवक नावाचा वेठबिगारही निर्माण केला, शिक्षकाला अशैक्षणिक कामे आम्हीच दिली आणि शिक्षकाची पिळवणूकही संस्थाचालकांना आम्हीच करू दिली।

सांस्कृतिक क्षेत्रात आम्ही असांस्कृतिक महोत्सव सुरू केले, राजकारणात आमच्या नेत्यांवर इतरांचा विश्वास नाही, आणि समाजकारण म्हणजे राजकारणात शिरण्यापूर्वी गुंड-पुंडांनी केलेली पुढारेगिरी हे आम्ही बघीतले नाही?

मराठीचा टक्का त्याच्या कर्तृत्वातून व्यक्त होतो हे खरेच पण मग रस्त्यावरच्या उभ्या मोटारी फोडण्यात, दगडफेक करण्यात, दुकाने जाळण्यात आणि तलवार हल्ले करण्यात आम्ही पुढे कसे?
असू द्या! बोला..
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा..

श्री. पी.ए.पाटील, जयसिंगपूर.

शुक्रवार, एप्रिल १७, २००९

 

समान नागरी कायदा आणि ‘जैन लॉ’ 

भारतातील विविधता ही वेगवेगळ्या धर्म, जाती, जमाती, वंश, संस्कृती यांनी बनलेली आहे. वेगवेगळ्या संस्कृतींच्या पार्श्वभूमीचे जनसमूह, वेगवेगळे नियम व व्यवहार पाळत असतात. ही विविधता आपल्या कायद्या मधेही प्रतिबिंबित झाली आहे. त्यामुळे विविध जनसमुहासाठी वेगवेगळे वैयक्तिक कायदे आहेत, त्यात एक समानता नाही. देशभर एकच समान नागरी कायदा असावा व सर्वाना सारख्याच संधी प्राप्त व्हाव्यात, हे समान नागरी कायद्याचे ढोबळ मानाने उद्दिष्ट आहे. असे केल्याने व्यक्तीच्या कोणत्याही धार्मिक परंपरा पाळण्यास, वैक्तिकरीत्या तो मोकळा असेल, त्यावर कोणतेही बंधन असणार नाही. मात्र सार्वजनिक रीत्या त्याला, तो कोणत्याही धर्माचा असला तरी, देशात लागू कायद्यानुसारच न्याय मिळेल.

सध्या हिंदू,शीख,जैन व बौद्ध यांचे वैयक्तिक कायदे सारखेच आहेत व ते ‘हिंदू वैयक्तिक कायदा’ या नावाने ओळखले जातात. मुस्लीम, पारशी, ख्रिस्चन व ज्यू यांचे वैयक्तिक कायदे वेगळे - वेगळे  आहेत. गुन्हेगारीचा कायदा मात्र सर्वाना समानच आहे.

जो समान नागरी कायदा येवू घातला आहे, त्याचा कसलाही ड्राफ्ट अजून तयार झालेला नाही. फक्त तो तयार करत असताना, संस्था व व्यक्तींकडून त्याबाबतीत सुचना मागवल्या आहेत. त्यामुळे या समान नागरी कायद्यामुळे जैन व्यवहारावर काय परिणाम होतील हे आताच सांगता येणार नाही.

उत्तराखंड राज्याने नागरी कायद्या संबंधाने प्रक्रिया सुरु केली असून, ३० जून रोजी त्याचा ड्राफ्ट विधान सभेत मांडला जाईल असे दिसते. त्यात असलेल्या काही तरतुदी, सूत्रांच्या माध्यमातून समाज माध्यमात काही त्रोटकपणे प्रसिध्द केल्या जात आहेत. यांची अधिकृत पणे जाहीर वाच्यता सक्षम अधिकाऱ्याने केलेली नाही. जनमताची चाचपणी करण्यासाठी काही प्रमाणात प्रसिद्धी केली जात असल्याची शक्यता आहे. पण सध्याच्या राजकीय व्यवस्थेची कार्यप्रणाली लक्षात घेतली तर, सर्वसाधारणपणे त्याच कलमांची देशभरासाठीच्या समान नागरी कायद्यात ही अंतर्भाव केला जाईल असे वाटते.

१. बहुपत्नीत्व रद्द केले जाईल.

२. लग्नापूर्वी, पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करता यावे म्हणून, मुलींचे लग्नाचे वय वाढवणे.

३. संमतीने एकत्र राहायचे असेल (Live In Relationship) तर त्याची नोंद सरकार दरबारी करावी लागेल, आणि त्याची माहिती पालकांना दिली जाईल.

४. वारसा हक्कात मुलीना मुलांच्या बरोबरीने वाटा मिळेल.

५. दत्तक घेण्याचा हक्क सर्वाना लागू केला जाईल, त्यामुळे दत्तक घेण्याचा हक्क मुस्लीम स्त्री ला हि असेल.

६. लग्नाची नोदणी केली नसेल, तर शासकीय सुविधा मिळणार नाहीत.

७. पती व पत्नी दोघानाही समान कारणासाठी घटस्फोट घेण्याचा अधिकार मिळेल.

८. पतीच्या किंवा पत्नीच्या  मृत्युनंतर मिळणाऱ्या भरपाईत त्याच्या/ तिच्या  वृध्द आई वडिलांची उपजीविकेची जबाबदारी हि त्या भरपाईत अंतर्भूत असेल.

९. पती पत्नी यांच्या भांडनात त्यांच्या मुलांचा ताबा त्यांच्या आजी आजोबांकडे दिला जाईल.

१०. लोकसंख्या नियंत्रणा संबंधित कलमात, किती मुले असावीत याबाबत समानता असेल.

वरील मुद्य्यांची कसलीही अधिकृत घोषणा नाही. हे किती खरे–खोटे माहित नाही, मात्र त्यावरून दिशा समजून घ्यायला मदत होते. त्याचा मसुदा ज्यावेळी संसदेत मांडला जाईल, त्यावेळी त्याच्यातील कलमांचा उहापोह करता येईल. सध्या आपल्या हाती त्या मसुद्याची वाट पाहणे इतकेच आहे.

अशा परिस्थितीत हे वैयक्तिक कायदे आणि त्याची कलमे ठरवताना जो संघर्ष करावा लागला, प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली, अडचणी आल्या, त्याचा संक्षिप्त इतिहास पाहणे रंजक आहे.

इंग्रजी आमदनीत १८५८ सालापासून कायदे तयार केले जात होते त्यावेळी, सुधारकी व पुरोगामी जैन कायदे तज्ञांनी/वकिलांनी अँग्लो-हिंदू कायदे जैन समाजावर लादण्यास विरोध केला. त्यांनी आमच्या जैन सूत्र, नीती व शास्त्र वचनें यावर आधारित वैयक्तिक कायदा करावा यासाठी चिकाटीने मागणी केली. याचा उद्देश जैन समाज एक व्हावा, त्याचा राजकीय दबाव गट तयार व्हावा, व काळाच्या ओघात गडप झालेला मुळचा एकत्रित जैन कायदा अमलात यावा हे होते.

 

“आज जरी जैन एकसंध नसले, तरी भूतकाळात जैन स्त्री पुरुषांचा समाज एकसंध व एकरूप होता. त्यांचा स्वताचा एक कायदा होता. तो पूर्णपणे गायब झाला नाही, तर तो कायदा साहित्य व परंपरांच्या ओझ्याखाली दबला गेलाय. पण त्याचे अस्तित्व शाबूत असून त्याची दखल घ्यावी लागेल.जैन समाजा मध्ये प्रचंड प्रमाणात जाती, जमाती नाहीत व त्यामुळे विविध संस्कृतींचा,विविध धारणांचा वा पंथांचा एकत्रित केलेला तो गठ्ठा नव्हे. एक शिकवण-श्रद्धा,एक धर्म, एक संस्कृती व एक समाज हीच जैन परंपरा आहे.” असे प्रतिपादन करावे लागले.

हिंदू कायदा निर्मितीच्या वेळी, कोर्टाला,जैन कायद्यासाठी आवश्यक लिखित कागदोपत्री साक्षी पुरावे उपलब्ध नसल्यामुळे, जैन कायदे हे हिंदूच कायद्याचे भ्रंश रूप आहे असे मानले गेले. १८७९ पर्यंत जैन हा स्वतंत्र वेगळा धर्म आहे असेही मानले जात नव्हते. हर्मन जाकॉबी या पाश्च्यात्य अभ्यासकाने त्याच्या “Kalpsutra of Bhadrabahu” या ग्रंथात, प्राचीन बुद्ध वचनात ‘निर्ग्रंथ’ या अर्थाने जैन या स्वतंत्र धर्माचे वर्णन केले आहे, असे प्रथमच पुराव्यानिशी सिध्द केले. सरकारने १८८१ च्या जनगणनेत प्रथमता जैन ही अधिकृतपणे वेगळी वर्गवारी मान्य केली. 

विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकापूर्वी पर्यंत, समर्पक शास्त्रीय वा धार्मिक पुराव्यांचे सहज उपलब्ध होणारे लिखित आधार नव्हते.  फक्त ‘तज्ञ’ साक्षीदार हेच कोर्टासमोरचे  पुरावे असत. याचे कारण काही परंपरावादी सनातनी जैनानी एकच सर्वसमावेशक जैन कायद्याला विरोध केला. ‘आमच्या सामाजिक प्रथामध्ये मोठ्या प्रमाणात वेगळेपण आहे’ असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे पूर्ण देशासाठी एकच मार्गदर्शक व दिशादर्शक समितीलाही त्यांचा विरोध होता.१८९९ सालच्या हर्नाभ प्रसाद विरुध्द मंदिल दास खटल्यात, ‘एका प्रांतात असलेल्या जैन प्रथा, या दुसऱ्या प्रांतातही तशाच जैन प्रथा अस्तित्वात होत्या असे मानण्याला आधार ठरतात’ या म्हणण्याला प्रस्तुत ठरवून आखिल भारतीय जैन प्रथांना मान्यता दिली गेली व मग जैन कायदे निर्मितीला त्याचा आधार झाला.

१९०४ मध्ये ‘ऑल इंडिया जैन असोसिएशन’ व ‘दिगंबर ऑल इंडिया जैन महासभा’ यांच्या सदस्यांनी हिंदू कायद्यांच्या धर्तीवर, प्राचीन जैन शास्त्रामधून, कायदे  तयार करण्या संबंधात आवश्यक साधन सामुग्री जमवून संगाहित करण्याचे ठरवले. १९१० साली महासभेने, सर्व जैन समूहासाठी सामाईक, कायदेशीर नियम-निर्बंध ठरवण्यासाठी व नव्या विधानसभेत हक्क व अधिकार यांचा आपला दावा मांडण्यासाठी  ‘जैन लॉ कमिटी’ स्थापन केली. बॅरीष्टर जगमंदर लाल जैनी(१८८१-१९२७) यांनी ‘भद्रबाहू संहिता’ याचे केलेले भाषांतर हा मैलाच्या दगडासारखे मार्गदर्शक ठरणारा ग्रंथ प्रकाशित झाला. १९१७ साली, जैनांना एकात्मिक राजकीय प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी, ‘जैन पॉलिटीकल असोसिएशन’ स्थापन करण्यात आले.  

१९१९ साली हरी सिंग गौर यांनी ‘द हिंदू कोड’ प्रकाशित केले. त्यानंतर ‘जैन मित्र मंडळ दिल्ली’ या दिगंबर संघटनेने बॅरीष्टर जगमंदर लाल जैनी आणि चंपत राय जैन (१८६७-१९४२) यांच्या नेतृत्वाखाली ‘हिंदू कोड’ मधील जैनांच्या बद्दल चुकीच्या धारणांचे खंडन करण्यासाठी ‘जैन लॉ सोसायटी’ स्थापन केली. “या हिंदू कोड नुसार हिंदू कायदे जैनांना सुद्धालागू होतात असे समजणे बेकायदेशीर आहे” असे जैनी यांनी मांडणी केलेली दिसते. या नुसार ‘हिंदू कोड’ च्या दुसऱ्या आवृत्तीत चुकीची दुरुस्ती करण्यात आली. सोसायटीने ठराविक काळात शास्त्रांचा अभ्यास करून जैन कायद्यांना निश्चीत स्वरूप देण्याचे ठरवले. या सगळ्या प्रयत्नांचा भाग म्हणून चंपत राय जैन यांचा ‘जैन लॉ’ हा  ग्रंथ  निर्माण झाला. श्वेतांबार व दिगंबर लेखकांच्या प्रयत्नातून सिद्ध झालेला, हा वैयक्तिक कायदा परिणामकारक झाला. ‘गाटेप्पा विरुध्द इराम्मा’ या खटल्यातून जैन हे हिंदूंच्याच मतभेदी पंथातील नाहीत, तर ते स्वतंत्र धर्माचे अनुयायी आहेत असा निष्कर्ष दिला गेला. जैन कायद्यांचा मुख्य स्त्रोत हे श्वेतांबर व दिगंबर यांच्या प्राकृत भाषेतील ‘आगम’ किंवा ‘सिद्धांत’ मधील वचणे व त्यावरील टीका, विश्लेषणे यावर आधारित  आहेत.

‘जैन लॉ’ त्याच्या व्यापक अर्थाने, जैन श्रद्धा व व्यवहारातील प्रथा, व्यक्त करतात. विशेष करून हे जैन ‘व्यवहार’ व ‘व्यवस्था’ यावरून तयार केलेले नियम आहेत. आधुनिक भारतीय न्याय व्यवस्था जैन वैयक्तिक कायद्यांच्या संबंधित उहापोह करते. १९५५ साली जैन वैयक्तिक कायदया चा अंतर्भाव ‘हिंदू कोड’ मध्ये केला गेला.

                                          प्रा. पी. ए. पाटील

                                          papatils@gmail.com

 

ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ

ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ सगळ्याच तीर्थंकरांचा उपदेश एकसारखाच असेल का...