संकटाने ज्याची पाठ कधी सोडली नाही, संघर्ष ज्याला कधी सुटला नाही, असा महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवी वर्षात आणखी कशाकशाने तळपतो आहे----
स्वाभिमानाच्या नावाखाली मुख्य प्रवाहातून बाजूला होऊन इतर प्रांतियांना धमकावण्यात, प्रसंगी हल्ले करण्यात पराक्रम समजणारा तरीही स्वतःला महा-राष्ट्र म्हणवून घेणारा आणि दहशतीने विचारांचा आवाज बंद करण्यात पटाईत असलेल्या सेना, दल आणि तत्सम् संघटनांच्या भरमारीने तळपतो आहे..
केवळ स्वतःला उच्च पदे भोगता यावीत म्हणून अनेक उलटसूलट व तर्कहीन भुमिका घेऊन सवतासुभा मांडण्यात लोकांचा आत्मसन्मान किती आणि पदासाठी चाललेली खटपट किती? सर्वसामान्यांच्या,कष्टकरी लोकांच्या, धरणग्रस्तांच्या चळवळी मोडून काढण्यात धन्यता मानलेल्या पुढारी नेत्यांचा सुळसुळाट इथेच आहे. लाखो करोडोंची माया बेकायदेशीर मार्गांनी जमवूनही ऊजळपणे फिरत असलेल्या भ्रष्ट लोकांनी महाराष्ट्र तळपतो आहे.
वरील गोष्टींनी अधोगतीचा आलेख ज्याचा खाली आलेला नाही अशा महाराष्ट्राचा प्रवास समृध्दीच्या मार्गावर चालू आहे? स्वातंत्र्य म्हणजे काय हे देशाला शिवबांनीच शिकविले आणि त्या शिवबांचे आपण फक्त पुतळेच उभे केले. दुसरे काय केले?
ज्ञानेश्वरांनी विश्वकल्याणाची प्रार्थना दिली आणि आम्ही आमच्या देशातल्याच इतरांना महाराष्ट्राचे दरवाजे बंद केले. घटनेचे अधिष्ठान बाबासाहेबांनी दिले आणि आपल्याच बांधवांची घरे जाळून आपण ते पुर्णत्वाला नेले? स्त्री पुरूष समता फुल्यांनी शिकवली आणि स्त्रीया जळून मरण्याचे प्रमाण आम्हीच वाढविले. काँग्रेसची स्थापना महाराष्ट्रात अंकुरली आणी पक्षीय यश नव्हे तर वैयक्तिक लाभासाठी आम्हीच संघटनांच्या पाठीत खंजीर खुपसले. गांधींना गुरू याच भुमीत मिळाले आणि सर्वात जास्त कुचेष्टा करून त्यांचा खून कोणी केला?
सहिष्णू हिंदूत्वाच्या विचारांचा जन्म याच भुमित झाला आणि त्याच्या सहिष्णूपणाला आम्हीच सर्वप्रथम जातियवादाच्या दंगलींत जाळून टाकले.औद्योगिक जगताचा हुंकार याच भुमित झाला आणि एकाही उद्योजकाने रोखठोक भुमिका घेवून समाजकारणात-अन्यायाविरूध्दच्या लढाईत ठसा नाही उमटवला।
शिक्षणाचा ज्ञानदिप इथेच तेवला आणि त्याच शिक्षण क्षेत्रात अशैक्षणिक लोकांनी प्रवेशाच्या व नेमणूकीच्या नावावर विद्यार्थ्यांकडून व कर्मचारींकडून भरमसाठ देणग्या गोळा करून खाजगी मालमत्तेची संस्थाने ऊभी केली. अवकाश विज्ञानाचा वेध घेतलेल्या विभूती इथेच जन्मल्या आणि ग्रहतारे यांची भिती दाखवून लोकांना लुबाडणारेही इथेच मोठे झाले.
१९९२ चे मुंबई बाँबस्फोट, पूर, दुष्काळ, शेतकरी यांच्या आत्महत्या अशी संकटे आम्ही पहात बसलो-त्यावर कायमस्वरूपी उपाय नाही शोधले. फळबाग लागवड, हापूस आंबा, बोर, सिताफळे, डाळींब, द्राक्षे, मोसंबी हे सर्व पिकले-बाजारपेठ फुलली आणि कुपोषीत बालकांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र वाढले. मुंबई बाँबस्फोटाने आर्थीक राजधानी हे बिरूद नसेल हिरावून नेले पण आमच्या आत्मसन्मानावर हल्ला झाला तो कशामुळे?
एकवीस हजारांची उंची गाठल्यावर काहींनी स्वप्नांचे मनोरे बांधले तरी तेच मार्केट कोसळल्यावर अनेक छोट्या गुंतवणूकदारांची आयुष्याची पूंजी देशोधडीला लागलीच की.आरोग्य सेवा उपलब्ध असूनही शेकडो लोक वेळेत ऊपचार न मिळाल्यामुळे मृत्यू पावतात हे, त्या सेवेच्या यशस्वितेचे प्रमाण कसे मानायचे?
स्त्रिला सन्मान बहाल करणारे हक्क महाराष्ट्राने दिले आणि बलात्कार, हुंडाबळी यामुळे तिची अवहेलनाही आम्हीच नाही केली? सर्वांना बरोबर घेवून जाणारा एकही मराठी नेता पंतप्रधान झाला नाही, हे नेकीमुळे घडले की इतरांचा विश्वास गमावल्यामुळे झाले?
पू्र्वेतील ऑक्सफर्ड ही ओळख राज्याने कमावली आणि शिक्षणसेवक नावाचा वेठबिगारही निर्माण केला, शिक्षकाला अशैक्षणिक कामे आम्हीच दिली आणि शिक्षकाची पिळवणूकही संस्थाचालकांना आम्हीच करू दिली।
सांस्कृतिक क्षेत्रात आम्ही असांस्कृतिक महोत्सव सुरू केले, राजकारणात आमच्या नेत्यांवर इतरांचा विश्वास नाही, आणि समाजकारण म्हणजे राजकारणात शिरण्यापूर्वी गुंड-पुंडांनी केलेली पुढारेगिरी हे आम्ही बघीतले नाही?
मराठीचा टक्का त्याच्या कर्तृत्वातून व्यक्त होतो हे खरेच पण मग रस्त्यावरच्या उभ्या मोटारी फोडण्यात, दगडफेक करण्यात, दुकाने जाळण्यात आणि तलवार हल्ले करण्यात आम्ही पुढे कसे?
असू द्या! बोला..
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा..
श्री. पी.ए.पाटील, जयसिंगपूर.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ
ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ सगळ्याच तीर्थंकरांचा उपदेश एकसारखाच असेल का...
-
सृजनशक्ती साहित्य विचार मंच चिंचवाड व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई आयोजित, १४ वे ग्रामीण युवा मराठी साहि...
-
चार्वाक – एक ओळख चार्वाक! भारताच्या सामाजिक ईतिहासातील विज्ञाननिष्ठ, विवेक प्रा...