बुधवार, मे ३०, २०१२

बंद


समस्यांवरील उपाय शोधण्यापेक्षा कोणालातरी दोष देऊन बंद पाळणे (पाळावयास लावणे) हा सध्या सर्वात सोपा मार्ग झालाय.व्यवसाय कर वाढला, इंधनाची दरवाढ झाली,रस्ता चारपदरी करण्याचा निर्णय घेतला, दहशतवाद्यांच्या विरोधात केलेल्या कारवाईत एका निष्पापाचा चुकून बळी गेला, या व अशा सगळ्या गोष्टी मुद्दामहून केल्यात असा आव आणून त्याचे विरोधक बंद पाळतात. मात्र, या गोष्टींवर ऊपाय काय, योग्य मार्ग काय, काय करावयास हवे, याची कसलीच सविस्तर चर्चा केली जात नाही. दगडफेक करणे, रस्त्यावरच्या मोटारी जाळणे, तोडफोड करणे, प्रतिमा दहन करणे,तिरडी काढणे, याने वरील समस्यांच्या सोडवणूकीसाठी काहीही मदत होत नाही.झुंडशाहीला रान मोकळे करून देणे एवढेच त्यातून साध्य होते.आपल्या मर्यादित कुवतिवर यामुळे पांघरून पडते व शक्ति प्रदर्शन होते असे वाटत असेल तर ते पूर्णता चुकीचे आहे.कोणताच राजकिय पर्याय नसेल तर अराजक माजविणे येवढेच शिल्लक राहते. आणि ते सोपे असते.गुंडपूंड तर गल्लोगल्ली अराजकाचीच वाट पाहत टपून बसलेले असतात.त्यांच्या हातात आयतेच कोलीत मिळते.तरूणांना काहितरी करून दाखवायची खुमखुमी असतेच.हे काहितरी विधायकतेत परावर्तीत करण्यासाठीचे योग्य प्रबोधन व कार्यक्रमयांची वाणवा असते. मात्र खुमखुमी असतेच.विचारणारे कोणीही नसलेल्या परिस्थितीत हाती काठी येते.आजूबाजूला उद्रेक तर तयारच केलेला असतो. मग काठी, दगड,पेटते बोळे,उगारले- फेकले जातात.बंद पुकारणारे खुष, काही करायला मिळाले म्हणून तोडफोड करणारे तरूण खुष,हे सगळे लाईव्ह दाखवणारे फुकटचे (विना कष्टाचे)आवश्यक बाईटस् मिळाले म्हणून प्रसार माध्यमे(कशाचा प्रसार करावा याचे भान नसलेली)खुष. असा सगळाच खुषीचा मामला.याला अटकाव ज्यांनी करायचा ते विकले गेलेले.यांच्या हाती काठी फक्त शोभेसाठी किंवा मग नको तिथे ऊगारण्यासाठी, ओलिस ठेवल्यासारखे हे फक्त उभेच.सर्वसामान्य माणूस घाबरून घरी बसतो.तोडफोडीने नुकसान नको म्हणून व्यापारी दुकाने बंद करतो.वाहणांची मोडतोड नको म्हणून ती रस्त्यावर धावत नाहीत. प्रायोजकांना बंद यशस्वी झाल्याचे समाधान वाटते. समस्या मात्र तशीच राहते. अर्थव्यवस्थाच ठप्प होते याचे भान मात्र कोणालाच नसते.
      सत्ताधाऱयांनी चुकीचे निर्णय घेतले तर जनतेचे आर्थिक प्रबोधन करायचे सोडून निव्वळ चिथावणीखोर भाषा वापरायची.हुल्लडबाजी व नारेबाजी करायची.सगळे बाबा आण्णाही दहा मिनिटात प्रश्न सोडवता येतील अशा अविर्भावानेप्रसिद्धी माध्यमांशी बोलतात.व्ही. पी. सिंगांनी केलेली चूक पुढे चंद्रशेखरांना देशातले सोने जागतिक बँकेत ठेवून( त्यामुळे काय नामुष्की व्हायची ती झालीच)निस्तरावी लागली. हा ईतिहास फार जूना नाही.पण तो सायिस्करपणे विसरला जातो.पर्यायी ऊत्तरे,नियोजन यासाठीची विद्वत्ता ही कष्टाने मिळवायची गोष्ट आहे.त्यासाठी अभ्यास हवा.इतके कोण करणार?, म्हणून मग बंद करायचा. समस्याच्या सोडवणूकीशी काहीही देणेघेणे नाही.काहीही करायचे नाही.फक्त बंद. 

बुधवार, फेब्रुवारी १५, २०१२

व्हॅक्लाव्ह हॅवेल


                         व्हॅक्लाव्ह हॅवेल
       व्हॅक्लाव्ह हॅवेल हे झेक प्रजासत्ताकाचे राष्ट्रपति व नौतिक राजकारणाचे पुरस्कर्ते वयाच्या ७५ व्या वर्षी नुकतेच वारले. जुन्या झेकोस्लोव्हाकियातल्या कम्युनिष्ट एकतंत्री राजवटीविरूद्ध लेखणीने एकाकी लढलेला निधड्या छातीचा हा मुळचा नाटककार. त्याचे विचार आजच्या अराजकी वातावरणात जास्तच मोलाचे आणि अंतर्मुख व्हावयास लावणारे... माझे राजकारण माझ्यासाठीच नव्हे, माझ्या लोकांच्या भल्यासाठी असले पाहिजे.माझ्या पश्चात येणाऱयाभावी पिढ्यांसाठी असले पाहिजे.माझे राजकारण ही एक सामाजिक जबाबदारी असेल आणि माझ्या प्रत्येक कृतित ती दिसेल.मला माहित आहे सध्याच्या राजकिय व्यवहारात हा वेडेपणा मानला जातो.पण सहिष्णू समाजासाठी सहिष्णू राहूनच झिजले पाहिजे अशी माझी श्रद्धा आहे.पूर्वी साधा लेखक होतो तेव्हा राजकारण व राजकारणी यांच्या विरोधात मी जे विचार मांडले ते अजूनही तसेच आहेत काय असे वर्तमानपत्रवाले मला सतत विचारतात.गेली दोन वर्षे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करताना माझे ते विचार आज आणखिनच ठाम आणि पक्के झाले आहेत.भरपूर राजकिय संकटे आणि रोजच्या नवनव्या डोकेदुख्यातून जाऊनही मला असे वाटते की, राजकारण म्हणजे एक बदनाम पेशा असण्याचे कारण नाही. तो बदनाम केला आहे बदनाम राजकारण्यांनी... मध्यंतरी त्याच्या देशाची फाळणी झाली.लोकांना समजावण्याचे शिकस्तिचे प्रयत्न विफल झाल्यानंतर तो राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार झाला.नंतर दुभंगलेल्या त्याच्या मातृभुमिच्या एका भागाचा  राष्ट्राध्यक्ष म्हणून लोकांनी त्याला परत निवडून दिलं होतं.राजकारणातली वाढती मनगटशाही,कुटील कटकारस्थानं,पट्टीचा खोटारडेपणा, वरपांगी आकर्षक विचीरसरणीने वाहून जाण्याची घाई...असल्या वातावरणात व्हॅक्लाव्ह हॅवेल सारखी नैतिक राजकारणाची पुरस्कर्ती माणसे दुर्मिळ..
                                    श्री. पी. ए. पाटील जयसिंगपूर
                                    praspatil_10@rediffmail.com.

गॅदरिंगचा अर्थ


शाळा ही विचारांच्या संक्रमनाचे केंद्र म्हणून पाहण्याची दूरदृष्टी फारच थोड्यांना असते. गॅदरिंगच्या गोंधळात मुलांच्या फिल्मी गाण्यांची धुळवड करणे इतकाच गॅदरिंगचा अर्थ राहिलाय. केवळ पारितोषिक वितरणासाठी पाहूणा हवा यासाठी सोपस्कार म्हणून कोणालाही बोलावले जाते.त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रबोधनही नाही आणि त्यांच्या संस्कारांना दिशा देणारा विचार ही नाही अशा दिशाहिन अवस्थेत स्नेहाचा गंधही नसलेली स्नेहसंमेलने पार पाडली जातात. मग विद्यार्थीही गॅदरिंग म्हणजे हेच सगळे असे समजतो. गॅदरिंग या इंग्रजी शब्दापेक्षाही स्नेहसंमेलन या शब्दाचा मुळ अर्थ ध्यानी घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनाच नव्हे तर त्यांच्या पालकांनाही थोडी समज देण्याचे धारिष्ट्य ज्या मोजक्या व कतृत्ववान वक्त्यांमध्ये आहे अशांना आमंत्रण देण्याचे धाडस यंदा जयसिंगपूरच्या जनतारा हायस्कूलने दाखवून विचारांना आणि सडेतोड प्रबोधनाला प्राधान्य दिल्याबद्दल कौतुकच केले पाहिजे.
                                          सुवर्णा पाटील, जयसिंगपूर.  

शिल्पकला आणि वास्तूशास्त्र


खिद्रापूरचे दीड हजार वर्षापूर्वीचे शिल्पकला आणि वास्तूशास्त्र.
कृष्णाकाठचा हा मैदानी प्रदेश, दोन्ही तिरावर काळीभोर जमीन अनेक मैल पसरली आहे. बांधकामाचा दगड जवळपास उपलब्ध नाही. मंदिरासाठी वापरलेल्या प्रचंड दगडी शिळा पाहिल्यावर मन चक्रावून जातं. या भागात या प्रचंड शिळा आणल्या असतील कशा?...... आणि मन भूतकाळात तर्काच्या वाटेने सुसाट धावत सुटते. सह्याद्रीतून येणाऱया कृष्णा व तिच्या बहिणी वर्षाकाळामध्ये दुथडी भरून वहात आहेत. मंदिर परिसरात तराफे अडवले जात आहेत. अनेक हत्ती शीलाखंड ओढून मैदानात आणत आहेत. वर्षाकाळानंतर कलाकारांचे अनेक जथ्थे शीलाखंडांना आकार देत आहेत. मूर्ती घडत आहेत. तुळ्या साकारत आहेत. खांबांचे मोजमाप चालू आहे. प्रमुख शिल्पी आपल्या मनाजोगे काम करून घेत आहेत.सुचना देत आहेत.मंदिराचे काम पाहण्यासाठी राजा आलेला आहे.कामाचा आढावा देताना त्यांची तारांबळ उडाली आहे. काम पाहून राजा आनंदाने निरोप घेत आहे. अनेक वर्षे हे असेच चालले असणार....
मंदिर पूर्णत्वाकडे वाटचाल करित आहे. स्वप्नातले शिखर शिल्पींच्या मनात साकारत आहे. पहिला थर पूर्ण झाला आहे. दगड आकार घेत आहेत. सभामंडपाच्या दक्षिण व ऊत्तर मुखमंडपाचा नकाशा तयार आहे. खांब आकारत आहेत. झरोके साकारत आहेत. मदनाला लाजविणारे सात हात उंचीचे द्वारपाल पूर्ण झाले आहेत. उत्तरेचा द्वारपाल स्थानापन्न झाला आहे. दक्षिणेचा द्वारपाल आभूषणांनी नटून मंदिरात नेणेसाठी तयार आहे. दक्षिण झरोक्याची खिडकी द्वारपाल स्थापनेनंतर बसवली जाणार आहे. सारे काही सुरळीत चालले असताना वज्राघातासारखी ती वार्ता मंदिरपरिसरात कोसळली. राजसत्ता संकटात सापडली होती.कारागिरांचे जथ्थे पूर्ण मंदिराचे स्वप्न हृदयाच्या कुप्पीत ठेवून नाईलाजाने पांगत होते. शेकडो वर्षे लोटली, नैसर्गिक व राजकिय आपत्तींना तोंड देत अनेक दंतकथांच्या धूसर पडद्यातून रसिकांना मोहिनी घालत हे पाषाणपुष्प अजूनही दरवळत आहे.
         

ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ

ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ सगळ्याच तीर्थंकरांचा उपदेश एकसारखाच असेल का...