समस्यांवरील उपाय शोधण्यापेक्षा कोणालातरी दोष
देऊन बंद पाळणे (पाळावयास लावणे) हा सध्या सर्वात सोपा मार्ग झालाय.व्यवसाय कर
वाढला, इंधनाची दरवाढ झाली,रस्ता चारपदरी करण्याचा निर्णय घेतला,
दहशतवाद्यांच्या विरोधात केलेल्या कारवाईत एका निष्पापाचा चुकून बळी गेला, या व
अशा सगळ्या गोष्टी मुद्दामहून केल्यात असा आव आणून त्याचे विरोधक बंद पाळतात.
मात्र, या गोष्टींवर ऊपाय काय, योग्य मार्ग काय, काय करावयास हवे, याची कसलीच
सविस्तर चर्चा केली जात नाही. दगडफेक
करणे, रस्त्यावरच्या मोटारी जाळणे, तोडफोड
करणे, प्रतिमा दहन करणे,तिरडी काढणे, याने वरील
समस्यांच्या सोडवणूकीसाठी काहीही मदत होत नाही.झुंडशाहीला रान मोकळे करून देणे
एवढेच त्यातून साध्य होते.आपल्या मर्यादित कुवतिवर यामुळे पांघरून पडते व शक्ति
प्रदर्शन होते असे वाटत असेल तर ते पूर्णता चुकीचे आहे.कोणताच राजकिय पर्याय नसेल
तर अराजक माजविणे येवढेच शिल्लक राहते. आणि ते सोपे असते.गुंडपूंड तर गल्लोगल्ली अराजकाचीच वाट पाहत टपून
बसलेले असतात.त्यांच्या हातात आयतेच कोलीत मिळते.तरूणांना काहितरी करून दाखवायची
खुमखुमी असतेच.हे काहितरी विधायकतेत परावर्तीत करण्यासाठीचे योग्य प्रबोधन व कार्यक्रमयांची
वाणवा असते. मात्र खुमखुमी असतेच.विचारणारे कोणीही नसलेल्या परिस्थितीत हाती काठी
येते.आजूबाजूला उद्रेक तर तयारच केलेला असतो. मग काठी, दगड,पेटते बोळे,उगारले-
फेकले जातात.बंद पुकारणारे खुष, काही करायला मिळाले म्हणून तोडफोड करणारे तरूण
खुष,हे सगळे लाईव्ह दाखवणारे फुकटचे (विना कष्टाचे)आवश्यक बाईटस् मिळाले म्हणून प्रसार
माध्यमे(कशाचा प्रसार करावा याचे भान नसलेली)खुष. असा सगळाच खुषीचा मामला.याला
अटकाव ज्यांनी करायचा ते विकले गेलेले.यांच्या हाती काठी फक्त शोभेसाठी किंवा मग
नको तिथे ऊगारण्यासाठी, ‘ओलिस’
ठेवल्यासारखे हे फक्त उभेच.सर्वसामान्य माणूस घाबरून घरी बसतो.तोडफोडीने नुकसान
नको म्हणून व्यापारी दुकाने बंद करतो.वाहणांची मोडतोड नको म्हणून ती रस्त्यावर
धावत नाहीत. प्रायोजकांना बंद यशस्वी झाल्याचे समाधान वाटते. समस्या मात्र तशीच
राहते. अर्थव्यवस्थाच ठप्प होते याचे भान मात्र कोणालाच नसते.
सत्ताधाऱयांनी चुकीचे निर्णय घेतले तर
जनतेचे आर्थिक प्रबोधन करायचे सोडून निव्वळ चिथावणीखोर भाषा वापरायची.हुल्लडबाजी व
नारेबाजी करायची.सगळे बाबा आण्णाही दहा मिनिटात प्रश्न सोडवता येतील अशा
अविर्भावानेप्रसिद्धी माध्यमांशी बोलतात.व्ही. पी. सिंगांनी केलेली चूक पुढे
चंद्रशेखरांना देशातले सोने जागतिक बँकेत ठेवून( त्यामुळे काय नामुष्की व्हायची ती
झालीच)निस्तरावी लागली. हा ईतिहास फार जूना नाही.पण तो सायिस्करपणे विसरला
जातो.पर्यायी ऊत्तरे,नियोजन यासाठीची विद्वत्ता ही कष्टाने मिळवायची गोष्ट
आहे.त्यासाठी अभ्यास हवा.इतके कोण करणार?,
म्हणून मग बंद करायचा. समस्याच्या सोडवणूकीशी काहीही देणेघेणे नाही.काहीही करायचे
नाही.फक्त बंद.