शनिवार, ऑक्टोबर ०२, २०२१

कोट कल्याण

                                                             कोट कल्याण

      धान्यावर प्रक्रिया करून जिवनावश्यक गोष्टींची निर्मिती करणे शक्य असताना एकदम दारू तयार करणे कसे काय शासनाच्या मनात आले ? काहीतरी उदात्त हेतू मनात ठेवून क्रांतीकारी निर्णय घेतले जातात. त्यापैकीच हा प्रकार असावा. आपल्या पूर्वजांची बुद्धी मागास होती. ते अन्न निवडून, शिजवून खायचा वेळखाऊ खटाटोप सांगून गेले. आत्ताचे युग हे आधुनिक. या आधुनिक युगात इतका खटाटोप कशाला करायचा ?

      धान्यापासून दारू तयार केली की धान्य दळूण भाकरी-पोळी करण्याचा गृहीणींचा त्रास वाचेल. नोकरीसाठी बाहेर पडताना व मुलांनी शाळेस जाताना डबा बांधण्याचा गृहीणींचा त्रास वाचेल. धान्यापासूनच दारू तयार होणार असल्याने आवडीच्या धान्यापासून तयार झालेल्या दारूची बाटली जाता-जाता घेतली की झाले. ज्वारी वा गव्हापासून तयार झालेली एक बाटली घेतली की काम झाले. वेगवेगळ्या डाळी व भाज्यांपासूनही दारू गाळावी. म्हणजे भाकरी-चपाती-पोळी बरोबर आणखी एक लहाणशी बाटली घ्यायची. म्हणजे भाकरी भाजी खाल्यासारखे वाटेल. भातापासूनही दारू गाळावी. वर भात खाल्याशिवाय जेवण परिपूर्ण होत नाही. त्यामुळे भाजी, भाकरी, भात हे सर्व दारूच्याच स्वरूपात मिळेल. शिवाय हे सगळे द्रावण असल्यामुळे पचायला हलके. लगेच रक्तातून फिरावयास लागेल. व तरतरी (तर्रतर्री) येईल. कार्यालयांमधला उत्साह वाढेल. कामे वेगाने होतील. मध्येच भुक लागली की अर्धी भाकरी पिऊन घ्यायची, की लगेच पुढची कामे वेगाने पूर्ण होतील. कुणाचीही कामे पेंडींग राहणार नाहीत. कारण सगळेच, कामासाठी येणारे व कामे करणारे सगळ्यांनीच द्रावणस्वरूपातील तर्रतर्री पेय घेतलेले असेल.

            शाळांमधील मुलांची गळती रोखण्यासाठी दुपारच्या भोजणाच्या वेळीही मुलांना अशा वेगवेगळ्या बाटल्या वाटल्या की मुलेही तर्रतर्रीत राहतील. मुख्य म्हणजे अन्नात अळी सापडने, न शिजलेले अन्न, करपलेले अन्न, अशा तक्रारींपासून पासून मुलांची शाळाप्रमुखांचीही सुटका होईल. दुपारच्या अशा भोजनानंतर शाळा (मुले, शिक्षक सगळेच) ऊत्साहाने शिक्षणाचे पवित्र कार्य पार पाडेल. धान्यापासून तयार केलेली अनुदानीत दारू-पौष्टीक दारू पिऊन ऊद्याच्या भारताचे आधारस्तंभ बलवान होतील. पहिलवानासारखी प्रकृति असणारे किंवा किमान पोष्टरवरच्या राजकिय पुढाऱयांसारखी तुकतुकित कांती, गोबरे गोलमटोल फुगलेले गाल अशा तुळतुळीत व्यक्तिमत्वांचे आधारस्तंभ तयार होतील. मग भारत देश अशा भक्कम आधारस्तंभावर पायांवरू ऊभा राहून ऊजळ माथ्याने साऱया विश्वात शोभून राहील.विद्यार्थ्यांच्या इतक्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणारे हे शासन खरोखर अभिनंदनास पात्र आहे.

      आता प्रश्न राहीला तो वाटप केंद्रांचा. स्वस्त धान्यदुकानाची नावे बदलून स्वस्त दारु दुकान करायचे. किंवा नाक्यावर-चौकाचौकात एटीएम मशिनसारखे मशिन बसवायचे. हव्या त्या धान्याच्या दारूची बाटली बारा महिने चौविस तास केव्हाही मिळायची सोय केली की शासनाचे कामच झाले. ज्याला जे काही पाहिजे ते त्याने मशिनवरून घेवून जावे.

      ताट, वाट्या, भांडी-कुंडी गॅस, स्टोव्ह, किचन या सर्वांना फाटा मिळेल.म्हणजे जनतेचा जो खर्च वरील गोष्टींच्या तजवीजीसाठी होतो तो वाचेल. घरबांधणी करताना त्यात किचन असणारच नाही.काहीच शिजवायचे नसल्यामुळे किचन कशाला ?

      जड अन्न खाल्यामुळे येणारा लठ्ठपणा वा वाढणारे वजन धान्यापासून तयार झालेल्या दारू पिण्याने आपोआप कमी होईल. प्रकृतिच्या तक्रारी कमी होतील. त्यामुळे दवाखाण्याचा खर्च वाचेल.

     

 

 

 

 

 

 

 

हा इतका सगळा विचार या धान्यापासून दारू तयार करण्यामागे आहे म्हणूनच मग अशी दारू तयार करणाऱया  कारखान्यांना अनुदान दिले तर बिघडले कुठे ? हे कारखाने मंत्री-संत्री यांचे सगेसोयरेच चालवितील व तेच हे अनुदान लाटतील हा कोता विचार झाला. जनतेने कसा सर्वांगिण विचार करावयास हवा. आपली सेवा करण्यासाठीच आपण लोकप्रतिनिधींना निवडून देतो. लोकप्रतिनिधीं आपल्या सगळ्या सग्यासोयऱयांसहित जनतेच्या सेवेला लागल्याचे सुखद चित्र आपणास पहायला मिळाले तर ते वाईट कसे मानायचे.

इतक्या सगळ्या आमुलाग्र बदलांची सुरूवात दारू ने होणार असेल तर काय हरकत आहे धान्याचा वापर झाला म्हणून. शेवटी शासन तरी जनतेचे अहित कसे करणार हो ? ते तुम्हास मायबाप म्णते. पाच वर्षातून एकदा का होईना हात जोडून तुम्हाला नमस्कार करते, मताची भिक मागते. अर्थात त्यासाठीही तुम्हाला पैसे वाटतेच की.(काय नाही म्हणता राव) ते तुमचे असे कसे वाईट करेल ? शासनावर बरिक विश्वास ठेवा. विनाकारणच आरडाओरड करण्याची सवय जरा बदला. मग बघा शासन तुमचे कसे कोटकल्याण करते ते. धान्य प्या- सुखी समाधानी रहा.

संत महंत सांगूनच गेलेत.....चित्ती असू द्यावे समाधान

शनिवार, जुलै ०३, २०२१

मेरी मॅलन

 

 “आपत्ती च्या काळात मानवी जीवन वाचवण्यासाठी माणुसकी सोडून द्यायची काय?”.

अमेरिकेतल्या लॉंग आयलंड भागात सन १९०० च्या सुरुवातीस एक विचित्र गोष्ट घडत होती. तिथल्या रहिवास्यांना अनाकलनिय पद्धतीने टायफॉइड ची लागण होत होती. सर्वसाधारणपणे घाणीचे साम्राज्य व गरिबीशी निगडीत असलेल्या या  आजाराची साथ  अतिशय उच्चभ्रू व  नीटनेटक्या, साफ - सुथऱ्या  श्रीमंती  भागात झाल्याने तिथली आरोग्य व्यवस्था खडबडून जागी झाली. आरोग्य विभागाचे अभियंता श्री जॉर्ज सोपेर यांना याचा छडा लावण्याच्या कामावर नेमण्यात आले. त्यांनी असा निष्कर्ष काढला कि, ज्याना टायफॉइड ची लागण झाली त्यातील किमान आठ कुटुंबात ‘ मेरी मॅलन’ या मध्यम वयाच्या आयरिश स्वयंपाकिन बाईने काम केले होते. मेरी मॅलन स्वत: पूर्णपणे निरोगी होती. मात्र कुटुंबात टायफॉइडची लागण झाली कि, प्रत्येक वेळी  ती  तिथले काम सोडून दुसऱ्या कुटुंबात कामास जात असे. जॉर्ज सोपेर ने तिचा माग काढायचा ठरवले.  ती कुठे राहते हे शोधले. तिच्यावर ती टायफॉइड पसरवण्यास कारणीभूत ठरलेली आहे असा आरोप ठेवला. जेंव्हा तिने सहकार्य करण्यास व आरोग्य तपासणी करून घेण्यास नकार दिला तेंव्हा पोलिसांना सांगून तिला अटक केली.

सोपोर ने मग निव्वळ अंदाजा वरून मेरी मॅलन चे रक्त, युरीन व मल तपासणी, तिच्या इच्छेविरुद्धच करवून घेतली. त्यात “Salmonella Typhi” हा टायफॉइड पसरवणारा बॅक्टेरिया असल्याचे निष्पन्न झाले. आणि मग त्या टायफॉइडच्या साथीचे सगळे खापर मेरी वरच फोडण्यात आले. काही वेळा निरोगी व्यक्तीत या रोगाची लक्षणे दिसत नाहीत मात्र त्यांच्यात रोग पसरवणारे पॅथोजेन हे विषाणू असतात.  ही व्यक्तीच टायफॉइड ची “निरोगी वाहक” आहे हे सिद्ध केल्याबद्दल जॉर्ज सोपोर चा सन्मान करण्यात आला. सगळा दोष तिच्यावर लादून मेरी मॅलन ला बदनाम करण्यात आले. आणि ती “टायफॉईड मेरी” नावाने इतिहास जमा झाली. अनेक दशके या बदनामीच्या ज्वराला तिला तोंड द्यावे लागले. खरे तर ती एक गरीब, अशिक्षित, निर्वाशित पण उत्कट व्यक्ती होती. तिच्याकडे  उत्तम स्वयंपाक करण्याचे देवदत्त देणे होते. पण तिथल्या आरोग्य व्यवस्थेने व वर्तमानपत्री मिडीयाने तिला कलंकित ठरवले. तिला रोगाची वेगवान प्रसारक -super spreader- ठरवले. तिच्यामुळे  जवळपास ५१ लोकांना संसर्ग झाल्याचे मानले गेले त्यातील तिघांचा मृत्यू झाला, पण निशित संख्या काही निष्पन्न करता आली  नाही.

मेरी मॅलन चे  २६ वर्षे एका निर्जन नदीकाठच्या दवाखान्यात अलगीकरण- quarantine करण्यात आले. तिथेच तिचा १९३८ मध्ये मृत्यू झाला.

त्याच्या ६३ वर्षानंतर २००१ साली तिने  ज्याच्याकडे स्वयंपाकिन म्हणून काम केले होते अशा Anthony Bourdain यांनी तिची बाजू समजावून देणारे अतिशय भावनात्मक पद्धतीने तिचे निर्दोषपण सांगणारे पुस्तक लिहिले,-“Typhoid Mary : An Urban Historical .

न्यूयॉर्क ला  टायफॉईड ची साथ हि काही नवी नव्हती. पण मेरीला लोकांची शत्रू असल्यासारखी वागणूक देण्यात आली, वेगळे करण्यात आले. शिक्षा देण्यात आली तीही रोगापेक्षाही भयंकर पद्धतीने. असलाच तर तिचा एकच गुन्हा असेल,- गरिबी किंवा श्रीमंती, जाती-जमाती, धर्म, गरिबांच्या वस्त्या काय किंवा श्रीमंतांच्या लकाकणाऱ्या वस्त्या काय, विषाणू अशाप्रकारचा कोणताही भेदभाव करत नाहीत हे दाखवून  देण्याचा गुन्हा तिने केला असेल.

माणूस आणि विषाणू यांचा परस्पर संबंध ही उत्क्रांतीच्या एकमेकाशी बंधनाची कथा आहे. निसर्गातील विषाणूंना जगायचे असते, वाढायचे असते. माणसांच्या पेशीत शिरून विषाणू आपले अस्तित्व टिकवतात, आपल्या संखेत वाढ करून घेतात. माणसाना मारले तर विषाणूंचाही विनाशच. त्यामुळे कालांतराने हा झगडा टाळून  निसर्गातील हे दोन्ही घटक सह अस्तित्वाने जगत राहतात. माणसाने हे यापूर्वीही साध्य केले आहे व कोरोना संदर्भातही साध्य होईल.

साथीच्या महामारीत जीवशास्त्रीय सह-अस्तित्वाचा हा मंत्र, माणूस, सामजिक परिणामांच्या बाबतीत मात्र पाळताना दिसत नाही. कोणताच रोग सामाजिक पसंती, उच्च्य-निच्यता जाणत नाही. आणि विषाणू जात,धर्म,श्रेणी,लिंग किंवा इतर ओळखी यात फरक करत नाही. पण इतिहास असे दाखवून देतो कि, रोग पसरवणाऱ्या महामारीच्या प्रत्येक वेळी माणसात खोलवर दबा धरून बसलेले  सामाजिक पूर्वग्रह, त्यांच्या सगळ्या विनाशकारी परिणामा सहित वर उफाळून येतात.  

१३४८ सालच्या प्लेग च्या साथीत, कॅथॉलिक चर्चने हि साथ म्हणजे ज्यू लोकांनी  ख्रिश्च्यानीटी विरुद्ध केलेले कट-  कारस्थान आहे अशी आवई उठवली. ज्यूं चे हाल हाल करण्यात आले, व त्यांच्याकडून जबरीने माफीनामे लिहून घेण्यात आले, त्यांना जिवंत जाळण्यात आले.

“रोमा” लोकच रोग निर्मित करतात व साथी  पसरवतात अशी समजूत करून घेऊन १४९३ ते १७८५ या काळात इटलीत “रोमा” लोकांना “झींगारी” अशी संज्ञा लावून त्यांच्या हालचालीवर प्रतिबंध घातले गेले.

मध्ययुगीन युरोपात प्लेगच्या महामारीचा सगळा दोष  पारंपारिक औषधांचा व्यवसाय करणाऱ्या लोकांवर थोपवून  त्यांना चेटकीण समजून शिक्षा देण्यात आली. पारंपारिक औषधांचा व्यवसाय करणाऱ्या अशा किमान ९०,००० लोकांना यमसदनी पाठवण्यात आल्याची नोंद आहे. निशित संख्या समजत नसली तरी त्याचा मोठा आघात हा स्त्रियांनी सोसल्याचा अंदाज आहे.

राजकीय आणि सामाजिक धर्म, जात-पात यांचा पूर्वग्रह दाखवणारा चष्मा काढून ठेवला आणि सुक्ष्मदर्शकाच्या  पारदर्शक नितळ काचेतून पाहिले तर विषाणू माणसाने निर्माण केलेल्या जाती पातीचे बंधन पाळत नाही हे दिसेल. विज्ञानाच्या अभ्यासाने खरे तर विषाणूला फक्त माणसाचे उबदार, ओलसर व प्रथिनांनी भरपूर असे शरीर हवे असते हे समजायला हवे होते - अतार्किक समजुती, अंधश्रद्धा, या पासून माणसाची सुटका व्हायला हवी होती.

महामारीने निर्माण केलेली  ही  घुसळण बराच काळ टिकणार आहे. मेरी मॅलन शिवाय हे आणखी कोण सांगू शकेल? तिच्या आयुष्याचा जवळपास निम्मा काळ तिने अलगीकरणात - quarantine मध्ये घालवला, तरी अजूनही तिचे नाव रोगांशी जोडले जाते.

मेरी मॅलन ने विचारलेला प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे,..

 “आपत्ती च्या काळात मानवी जीवन वाचवण्यासाठी माणुसकी सोडून द्यायची काय?”.

 आपल्याला या प्रश्नाला सामोरे जायचे आहे.

“The Hindu”तीन एप्रिल  मधला अमितान्षु आचार्य यांच्या लेखाचा आधार...स्वैर भावानुवाद


ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ

ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ सगळ्याच तीर्थंकरांचा उपदेश एकसारखाच असेल का...