‘घरी पाठवा’ हा अग्रलेख व ‘प्रसादातून विषबाधा हा दैवी दहशतवादच’ यातील सडेतोड
विवेचन योग्यच.(लोकसत्ता २८ मार्च) केंद्रिय सत्ता कमजोर झाल्यावर धेडगुजऱयांनाही
कृतिशिल व्हावे वाटते.जो तो उच्चरवात मखलाशी करित सुटतो.तशीच अवस्था ‘त्या’ अनादी अनंत
आकाशास्थित केंद्रिय सत्तेचे ( देव, दैव वगैरेचे) झाले आहे काय कोण जाणे. ‘त्या’ चे परिस्थितीवर
काहीच नियंत्रण राहिल्याचे दिसून येत नाही. ‘त्या’ चे दर्शन करून आपापल्या गावी परतणाऱयाना वाटेतच भिषण
अपघाताला तोंड द्यावे लागते. ‘त्या’ च्याच नावाने दिल्या जाणाऱया प्रसादातून विषबाधा होते. ‘त्या’ च्याच नावाने
भरवल्या गेलेल्या यात्रेत-जत्रेत चेंगराचेंगरी होऊन भक्तांना मृत्यूमुखी पडावे
लागते. ‘त्या’ लाच खुष
करण्यासाठी मुक्या प्राण्यांची हत्या आणि बालकांचाही नरबळी द्यावा लागतो. देवदासीत
नावच फक्त देवाचे सोय तिसऱयाचीच. आता तर देवाचीही चोरी झालीय. सोन्याचा देवच
कुणीतरी पळवून नेला. पोलिसांना काही त्याच्या ठावठिकाण्या बाबत तो साक्षात्कार देत
नाही. तलवार- बिलवार राहू दे पण पत्ता तरी सांगायला काय हरकत आहे. मग जातीलच पोलिस
तिथे, सोडवतीलच
चोरांच्या तावडीतून देवाला आणि करतील परत प्रतिष्ठापना. आता बाकी काही नसलं (कामाच्या
दामाचं...) तरी देव थँक्यू तरी देईलच की.
आता देवानंच
त्याच्या मुळस्वरूपात सशक्त व्हवं आणि त्याच्या नावावर स्वतःचे उद्योग चालवणाऱया
लोकांना घरी पाठवावं. सत्तेच्या दलालापासून शासन व्यवस्था मुक्त करायची तर लोकपाल
जसा गरजेचा वाटतो तसे देवाच्या–धर्माच्या दलालांपासून लोकमानस मुक्त करायचं तर अंधश्रद्धा
निर्मुलन करयलाच हवं. लोकपालाचा कायदा व्हायला हवा मात्र अंधश्रद्धा निर्मुलनाचा कायदा नको असे कसे? म्हणजे मग आपण
कोणाच्या पंक्तित ते आपणच ठरवावं.