शनिवार, जून १५, २०२४

कचरा आणि झाडू

                       कचरा आणि झाडू

              
      दक्षिण भारत जैन सभा ही या भागातील जैनांची शीर्ष संस्था आहे. जैनांच्या  सामाजिक व्यवहारात, त्यांच्या धार्मिक व्यवहारात, व एकूणच समाजाच्या अभ्युदयाकडे लक्ष देणारी ही संस्था आहे.
    आचार्य शांतीसागरांच्या आचार्य पदास शंभर वर्षे होत असल्याच्या निमित्ताने   भट्टारक संमेलन, विद्वत संगोष्टी, उपाध्ये संमेलन व युवक युवती संमेलन  होत आहेत हि चांगली गोष्ट आहे. या संमेलनात अलीकडे धार्मिक उत्सवात सर्रास पहायला मिळणाऱ्या अतार्किक गोष्टीं बद्दल चर्चा घडवून आणावी. मुळातच अधार्मिक असलेल्या व इतर समाजाच्या यात्रा जत्रा मिरवणुका पाहून अंधानुकरणातून केल्या जात असलेल्या  गोष्टींचा मुळातूनच फेरविचार करणे गरजेचे बनले आहे.
   या संबंधी काही अपेक्षा....

1) अलीकडील धार्मिक पंचकल्यानिके व वेगवेगळी पूजा विधाने या संदर्भात काही एक नियमावली तयार करावी लागेल.
      अ) त्यासाठी एक समिती स्थापन करून धार्मिक विधीतील अधार्मिक गोष्टींना   

आळा  बसवावा .
ब) ही नियमावली बंधनकारक मार्गदर्शक तत्वे म्हणून प्रत्येक पंचकल्याण पूजा व       

त्यासारख्याच पद्धतीने पार पाडल्या जाणाऱ्या पूजा विधीत अमलात आणावीत.
क) पंचकल्यानिके इत्यादी महोत्सव साजरे करण्यासाठी व त्या सामाजिक  

सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडल्या जाव्यात, यासाठी गावातील सर्व समाज

घटकांचे एक मार्गदर्शक मंडळ आग्रहाने स्थापन करावे.यातील सदस्यांना होता

होईल तेवढे कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करावे.

कार्यक्रमाला  समाज हिताची व गावाच्या विकासाची जोड देण्यासंबंधी

त्यांच्याशी चर्चा करून एक कृती कार्यक्रम ढोबळ मानाने आखून घ्यावा.

त्याच्या अंमलबजावणीसाठी पूजाकमिटी व हे मार्गदर्शक मंडळ

यांच्या  समन्वयातून कार्य सिद्धीस न्यावे.

 2) काय करता येईल... 

·         पहिला मुद्दा ....स्थानिक पातळीवर पर्यावरणीय विकासा संदर्भात वृक्षारोपण, पाणवठे करणे इत्यादीसाठी आर्थिक तरतुद व आराखडा आखणे .

·         दुसरा मुद्दा......स्थानिक पातळीवर सामाजिक व महिला विकासा संदर्भात इतर महिलांसोबतच विधवा महिलांनाही सर्व कार्यक्रमात वावरण्याची व कृतिशील सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहनात्मक कार्यक्रम आखणे व त्यासाठीची आर्थिक तरतूद करणे

·         तिसरा मुद्दा.... हा दक्षिण भारत जैन सभेने पुढाकार घेऊन पार पडवयाचा आहे. कोल्हापूर, सांगली ,बेळगांव जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी पंचकल्यानिके वा विधी महोत्सव होतात ,अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिलेल्या रकमेपैकी ठराविक टक्के रक्कम केवळ याच कामासाठी राखून ठेवण्याचे व ती रक्कम द.भा.जैन सभेकडे हस्तांतरित करण्याचा नियम आखून द्यावा.अनेक जैन ग्रंथ हे मूळ प्राकृत भाषेत आहेत. ही भाषा आत्ता न कोणाला येते ना कोणाला कळते. या संदर्भात अशा  दुर्मिळ ग्रंथांचे हिंदी/मराठीत अनुवाद करण्यासाठी जी आर्थिक तरतूद करावी लागते ती करून त्याचा एक फंड दक्षिण भारत जैन सभेच्या अंतर्गत उभारून जैन इतिहासा चे अभ्यासक मंडळ तयार करून त्यासाठी हा निधी वापरावा. संजय सोनवणी  सारखे तळमळीचे अभ्यासक निवडून त्यांना या अतिशय मोलाच्या कार्यास उद्ययुक्त करावे.

·         चवथा मुद्दा.....पंचकल्याण पूजे दरम्यान जैन धर्म पुरातन असण्याचा पुरावा म्हणून सर्व तिर्थंकरांचा कालावधी नमूद केलेला एक तक्ता प्रदर्शित करावा. त्यात समकालीन थोर व्यक्तींचेही उल्लेख असावेत. तसेच जे आचार्य होऊन गेले त्यांचा कालावधी व त्यांची रचना ,ग्रंथ व तो कोणत्या भाषेत लिहिला गेला व त्यावेळी त्या प्रदेशात कोणाची सत्ता होती असा एक आलेख असावा.

·         पाचवा मुद्दा.....या पूजे दरम्यान दररोज विचारवंतांची व्याख्याने झालीच पाहिजेत . निव्वळ साधूंच्या प्रवचनावर पूजा ओढून नेऊ नये. लोक बसत नाहीत हे कारण ऐकून घेऊ नये. साधूंच्या प्रवचनाला मर्यादा येतात, विचारांची घुसळण होत नाही. ती व्हायला हवी. साधू महाराज यांना आजच्या दररोजच्या जगण्यातील , ताण तणावात होणार्या ओढा-ताणातील, अपेक्षा आणि हतबलता यातील अंतरविरोधातील आणि परिस्थितीच्या रेट्याने नाविलाजने घ्याव्या लागणाऱ्या निर्णयातील धागे दोरे यांच्या वास्तवतेची कल्पना असण्याची शक्यता कमी असते. ती असावी अशी अपेक्षाही नाही. म्हणूनच त्यांच्या प्रतिपादनाला आजच्या जगण्याच्या प्रश्नाच्या सोडवणुकी संदर्भांत मर्यादा येतात.  या सर्व गोष्टींना सामोरे जाणाऱ्या समाजातील अभ्यासू विद्वानांना बोलावून त्यांचे विचार ऐकणे हे हिताचे ठरेल.
नाहीतरी कर्मकांडाला प्रखर विरोध करणारे व नको त्या गोष्टींना धर्मप्रभावणेतून बाजूला करून तो प्रवाह निखळ खळाळत ठेवणारे ,प्रसंगी समाजाला अधार्मिक गोष्टीं पासून दूर ठेवणारे नेतृत्व करण्याचे धैर्य व साहस किती जणांकडे असते हा प्रश्नच आहे. आम्हाला समाजात मान राहणार नाही, आम्हाला कोणी बोलावणार नाही या भीतीपोटी जर समोर घडणारे बघतच बसायचे असेल तर हे त्या संस्थेला समाजहिताचे निहित धार्मिक कार्य करण्यात सपशेल अपयश आले आहे असे मानले तर त्यात चुकीचे काय आहे?
   
      टेलिव्हिजन व सोशल मिडिया यांच्या जमान्यात ओघवती प्रवाही भाषा व जे सांगायचे आहे त्यातील आटोपशीर व नेमके मर्म आकर्षकरित्या मांडण्याचे कौशल्य जर नसेल तर तुम्ही काय सांगता हे ऐकायला कोणीही थांबणार  नाही. आरडाओरडा, विचित्र हावभाव व अतिरेकी हिंसक हातवारे टाळायला हवे.  प्रवचन हे धार्मिक व मूलभूत वचनांची , विचारांची फोड करून सामान्यांना समजेल अशा  कालानुरूप व आकर्षक भाषेत व्हायला हवे. पण ऐकणाऱ्याचा बुध्यांक कमीच असतो अशी समजूत करून  घेऊन बाळबोध पद्धतीत फसू नये. इंग्रजी भाषा कशी अशास्त्रीय आहे त्याची बाळबोध उदाहरणे देणे व तशा पद्धतीची दिशाभूल करणारी वक्तव्ये टाळावीत. इंग्रजी ज्ञानासंबंधी आधीच सगळा 'उजेड' असताना समाजाला उलट्या दिशेने नेण्याचे कारण काय ? कसल्या भ्रमात आणि कशासाठी हे करायचे?

·         सहावा मुद्दा..... पंचकल्याण पूजा विधी सारख्या कार्यक्रमात मुख्य गालबोट लागते ते वाजंत्रीमूळे. धार्मिक पूजाविधी हे काही जयंती मयंतीच्या मिरवणुका सारखे नाहीत. त्यामुळे बेंजो, डीजे व त्या सारख्याच, वाहनावर  आरुढ केलेली  ध्वनिवर्धक व्यवस्था व  डोळे दिपावणारी प्रकाश झोत फेकणारी व्यवस्था यांच्या वापरावर जाणीवपूर्वक बंदी घालावी.  पूजेमधले मंत्रोच्चार, विधी आणि बेंजो डीजे हे वाजवीत असलेले कर्कश्शय भोंगळ आवाजातील फिल्मी गाणे (किंवा फिल्मी गाण्यांच्या चालीवर आधारित गाणी) यांच्यात कसलाच समन्वय असण्याचे कारण नाही. ही दोन विरुद्ध टोके आहेत. याशिवाय ज्या ठेक्यात ही गाणी बजावली जातात तो तर अतिशय हिंस्र प्रकार आहे. आवाजाचे प्रकाशाचे तर प्रदूषण होतेच पण सांस्कृतिक हिडीसपणा त्यातून निर्माण होतो.

     या प्रकारच्या वाजंत्री ला पर्याय म्हणून सनई चौघडा सारख्या वातावरण प्रसन्न करणाऱ्या वाद्यांच्या ताफ्याचा विचार करता येईल. अर्थात हे नव्याने पुढाकार घेऊन करावे लागेल. आणि त्याला प्रतिष्ठा प्राप्त होईल हेही पाहावे लागेल. हे अवघड नाही. अनेक लग्न समारंभात अशाप्रकारची वेगवेगळी अनेक स्थानिक वाद्ये वाजविणारा लहान लहान संच पहायला मिळतो. आणि ती सुरावट मधुर ही वाटते.

3)    जगाला गुणात्मक पंचमरमेष्टी चा कोणत्याही एका व्यक्तीच्या नावाचा उल्लेख नसलेला णमोकर मंत्र देणारा जगाच्या पाठीवरील हा एकमेव धर्म आहे. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य यांनी युक्त धर्माची जोपासना करणारा;  अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रम्हचर्य व अपरिग्रह या पाच तत्त्वांनी आचरण सांगणारादेव ही संकल्पना नाकारणारा; या सृष्टीचा कोणीही निर्माता नाही, त्याचे संचालन करणारा ही कोणी नाही, त्याचे संरक्षण करणाराही कोणी नाही आणि त्याचा विध्वंस करणाराही कोणी एक व्यक्तिविशेष नाही ही भूमिका घेणारा हा धर्म आहे. ही सृष्टी पाच घटकांनी बनलेली आहे, जीव, अजीव, गती, स्थिरता,आकाश आणि काळ. या वैज्ञानिक कसोट्यांवर या विश्वाचे संचालन होत असते असे सांगणारा हा एकमेव धर्म आहे.

      पंचकल्यानिक ही तिर्थंकरांच्या जीवनातील पाच मुख्य घटनांचा उत्सव साजरा करण्याचे प्रतीक  आहे. शेवटच्या दिवसाचा मोक्षकल्याणक हा तर तिर्थंकरांना ज्ञान प्राप्त झाल्या नंतर मुक्ती मिळण्याचा दिवस आहे. हा आनंदाचा, समाधानाचा दिवस आहे. धांगडधिंगा करण्याचा वा स्वतःला मिरवण्याचा दिवस नाही. आपण निमित्तमात्र आहोत व प्रतीकात्मक आहोत याचे भान बाळगायला हवे.

 

 4)   निवडणुकांच्या राजकीय रणधुमाळीत ज्या प्रकारे नेत्यांच्या समोर आपले नाव व फोटो सतत दिसला पाहिजे म्हणून कार्यकर्त्यांची बॅनर च्या माध्यमातून चमकोगिरी चालू असते, तशीच चमकोगिरी, आपले अस्तित्व दाखवण्याचा खटाटोप करून, स्वागतोत्सुक म्हणून समाजातील तरुणांचे फोटो रस्त्याच्या दोन्ही बाजूस झळकवण्याचे अनुकरण करण्याचे प्रस्थ ही फार मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येते. हे कशासाठी करायचे याचे कसलेच उत्तर या तरुणांकडे नाही. इतर ठिकाणी असेच करतात याशिवाय त्याला कसलाही आधार नाही. यातून होते इतकेच की, अशा अर्थहीन चमकोगिरीची सवय भिनते आणि पुढे प्रत्यक्ष कर्तुत्वापेक्षा बॅनर च्या माध्यमातून प्रसिद्धीच्या मागे लागण्याची वृत्ती वाढीस लागते. सबुरीचे चारशब्द सांगण्याची कुवत व अधिकार असलेले  एक दोन लोक समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात पण पंडिता पासून ते युवकांपर्यंत सगळेच जण त्यां कडे दुर्लक्ष तरी करतात किंवा  बहुसंख्येच्या मताने टाळतात तरी. या संदर्भात फार तर पंच कमिटी, ग्रामपंचायत ( कारण पाच सहा दिवस गावाच्या यंत्रणेवर लोकांच्या गर्दीने ताण येतो ,या यंत्रणा कोलमडणार नाहीत याची दाखल घेत घेत त्या राबत्या ठेवाव्या लागतात) व दक्षिण भारत जैन सभा (जैनांची शीर्ष संस्था म्हणून) यांच्या नावेच फक्त दोन तीन बॅनर अधिकृतरित्या लावावेत. या ठिकाणी यावर नियंत्रण आणले नाही तर त्याला कसलाच ताळतंत्र राहणार नाही. समाजातील युवकांना कर्तुत्व संपन्न बनवायचे असेल तर  या प्रकारच्या चमकोगीरीच्या भुलभुलैय्या पासून त्यांना दूर ठेवायला हवं.

 

5)    पूजे दरम्यान दररोज संध्याकाळचे व दुसऱ्या दिवसाच्या मिरवणुकीचे सवाल बोलले जातात. हे सवाल बोलणारी ( ‘बोली सम्राट’ म्हणून यांची जाहिरात आमंत्रण पत्रिकेत ठळक पणे केली जाते.) मंडळी सर्वसाधारणपणे  नागपुरी किंवा उत्तर भारतीय तरी आहेत. त्या गाय पट्ट्यातील बहुत्वांशी संस्कार हे श्वेतांबर पद्धतीचे ढोल वाजवणारे नाच गाणे करणारे आहे. यातून एकूण परिणाम व चित्र उभे केले जाते ते आपल्या परंपरेशी फारकत घेणारे आहे. कोण काय व किती बोली बोलतोय हे यांच्या वाजंत्रीत ऐकूच येत नाही. समोर साधू महाराज बसलेले असताना त्यांच्याकडे पाठ करून कसलाही विधी निषेध न बाळगता गाणे व नाचणे चालू असते. हे निषेधार्ह वागणे कशासाठी खपवून घेतले जाते? कोणतीही कुठलीही पूजा घ्या हेच चित्र सगळीकडे दिसते.या उत्तर भारतीयांना इकडे संस्कृती संकर करण्याचे काम नेमून दिले आहे काय? यासंबंधी जागेपणे व जाणीवपूर्वक शोध घ्यायला हवा. हा जो काही वाजंत्री व नाच गाण्याचा कचरा निर्माण केला जातोय त्याचा एक भाग  व्यवसाय  असला तरी त्याच्यामागे दुसरे एक सूत्र दिसते ते डोळसपणे शोधायला व पाहायला हवे. पूजा व ‘विधी स्पेसिफिक’ धार्मिक संस्कारात या बाह्य वावटळी चे प्रयोजन कायपंडितांनी मंत्र उच्चारावेत त्या उच्चारांच्या ध्वनितच विधी झाले तर ते जास्त संयुक्तिक होईल. वाजंत्रीने या मंत्रोपचाराला खीळ बसते आणि फक्त ढण ढण आवाज तेवढा घुमत राहतो. मंत्र उच्चार ऐकू येत नाहीत आणि गाणे बजावणे मात्र सुरूच असते. यात मग करण्यासारखे एकच राहते ते म्हणजे टाळ्यांचा ठेका धरायचा. ते चालूच असते.. मजेत.

   यासाठी मुख्य सभा मंडपातून वाजंत्रीवाले व हे बोली सम्राट यांचे उच्चाटन करावे. बोली बोलण्यासाठी प्रत्येक गावात एकतरी असा उपयुक्त हरहुन्नरी माणूस असतोच, त्याला संधी द्यावी.

 

6)    या सगळ्यात पूजा विधी करणाऱ्या पंडितांची व समाज धुरिणांची भूमिका महत्वाची आहे. छुपेपणे  संघीय संस्कार आपल्याही नकळत प्रवेश करताहेत काय यावर बारीक लक्ष ठेवायला हवे. पद्धतशीरपणे लोकाना हाताशी धरून बेमालूमपणे काही वैदिक कर्मकांडांकडे ओढले जात आहोत काय हेही चाणाक्षपणे ओळखता यायला हवे. भव्य दिव्यतेचा सोस करताना कोणत्याही व्यवस्थेकडून, अशा प्रकारच्या प्रचारकी गनिमी काव्याला वेळीच रोखायला हवे.

   आपल्या श्रद्धास्थानाविषयी फेरतपासणी करण्याचा प्रसंग आला तर कोणताही समाज चिडनारंच. ते योग्य नसलं तरी समजून घ्यायला हवं. पण अशावेळी विचारवंतानी व धुरिणांनी जाहीरपणे विचार स्वातंत्र्याचा आग्रह धरायला हवा. तेही हा आग्रह धरणार नसतील तर आंधळ्या भक्तिभावनेला गोड फळे येतील याची वाट बघत बसण्यात काही अर्थ नसतो.

  शेवटी मांगल्याची आस ठेवायची तर  निखळ धार्मिकतेच्या प्रवाहा आड येणाऱ्या निकृष्ट कचऱ्याची विल्हेवाट लावून आपले घर आपणच स्वच्छ ठेवायला हवे.

 

                                         प्रा. पी. ए. पाटील,  

                                        papatils@gmail.com

समान नागरी कायदा आणि ‘जैन लॉ’

 

समान नागरी कायदा आणि ‘जैन लॉ’ 

भारतातील विविधता ही वेगवेगळ्या धर्म, जाती, जमाती, वंश, संस्कृती यांनी बनलेली आहे. वेगवेगळ्या संस्कृतींच्या पार्श्वभूमीचे जनसमूह, वेगवेगळे नियम व व्यवहार पाळत असतात. ही विविधता आपल्या कायद्या मधेही प्रतिबिंबित झाली आहे. त्यामुळे विविध जनसमुहासाठी वेगवेगळे वैयक्तिक कायदे आहेत, त्यात एक समानता नाही. देशभर एकच समान नागरी कायदा असावा व सर्वाना सारख्याच संधी प्राप्त व्हाव्यात, हे समान नागरी कायद्याचे ढोबळ मानाने उद्दिष्ट आहे. असे केल्याने व्यक्तीच्या कोणत्याही धार्मिक परंपरा पाळण्यास, वैक्तिकरीत्या तो मोकळा असेल, त्यावर कोणतेही बंधन असणार नाही. मात्र सार्वजनिक रीत्या त्याला, तो कोणत्याही धर्माचा असला तरी, देशात लागू कायद्यानुसारच न्याय मिळेल.

सध्या हिंदू,शीख,जैन व बौद्ध यांचे वैयक्तिक कायदे सारखेच आहेत व ते ‘हिंदू वैयक्तिक कायदा’ या नावाने ओळखले जातात. मुस्लीम, पारशी, ख्रिस्चन व ज्यू यांचे वैयक्तिक कायदे वेगळे - वेगळे  आहेत. गुन्हेगारीचा कायदा मात्र सर्वाना समानच आहे.

जो समान नागरी कायदा येवू घातला आहे, त्याचा कसलाही ड्राफ्ट अजून तयार झालेला नाही. फक्त तो तयार करत असताना, संस्था व व्यक्तींकडून त्याबाबतीत सुचना मागवल्या आहेत. त्यामुळे या समान नागरी कायद्यामुळे जैन व्यवहारावर काय परिणाम होतील हे आताच सांगता येणार नाही.

उत्तराखंड राज्याने नागरी कायद्या संबंधाने प्रक्रिया सुरु केली असून, ३० जून रोजी त्याचा ड्राफ्ट विधान सभेत मांडला जाईल असे दिसते. त्यात असलेल्या काही तरतुदी, सूत्रांच्या माध्यमातून समाज माध्यमात काही त्रोटकपणे प्रसिध्द केल्या जात आहेत. यांची अधिकृत पणे जाहीर वाच्यता सक्षम अधिकाऱ्याने केलेली नाही. जनमताची चाचपणी करण्यासाठी काही प्रमाणात प्रसिद्धी केली जात असल्याची शक्यता आहे. पण सध्याच्या राजकीय व्यवस्थेची कार्यप्रणाली लक्षात घेतली तर, सर्वसाधारणपणे त्याच कलमांची देशभरासाठीच्या समान नागरी कायद्यात ही अंतर्भाव केला जाईल असे वाटते.

१. बहुपत्नीत्व रद्द केले जाईल.

२. लग्नापूर्वी, पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करता यावे म्हणून, मुलींचे लग्नाचे वय वाढवणे.

३. संमतीने एकत्र राहायचे असेल (Live In Relationship) तर त्याची नोंद सरकार दरबारी करावी लागेल, आणि त्याची माहिती पालकांना दिली जाईल.

४. वारसा हक्कात मुलीना मुलांच्या बरोबरीने वाटा मिळेल.

५. दत्तक घेण्याचा हक्क सर्वाना लागू केला जाईल, त्यामुळे दत्तक घेण्याचा हक्क मुस्लीम स्त्री ला हि असेल.

६. लग्नाची नोदणी केली नसेल, तर शासकीय सुविधा मिळणार नाहीत.

७. पती व पत्नी दोघानाही समान कारणासाठी घटस्फोट घेण्याचा अधिकार मिळेल.

८. पतीच्या किंवा पत्नीच्या  मृत्युनंतर मिळणाऱ्या भरपाईत त्याच्या/ तिच्या  वृध्द आई वडिलांची उपजीविकेची जबाबदारी हि त्या भरपाईत अंतर्भूत असेल.

९. पती पत्नी यांच्या भांडनात त्यांच्या मुलांचा ताबा त्यांच्या आजी आजोबांकडे दिला जाईल.

१०. लोकसंख्या नियंत्रणा संबंधित कलमात, किती मुले असावीत याबाबत समानता असेल.

वरील मुद्य्यांची कसलीही अधिकृत घोषणा नाही. हे किती खरे–खोटे माहित नाही, मात्र त्यावरून दिशा समजून घ्यायला मदत होते. त्याचा मसुदा ज्यावेळी संसदेत मांडला जाईल, त्यावेळी त्याच्यातील कलमांचा उहापोह करता येईल. सध्या आपल्या हाती त्या मसुद्याची वाट पाहणे इतकेच आहे.

अशा परिस्थितीत हे वैयक्तिक कायदे आणि त्याची कलमे ठरवताना जो संघर्ष करावा लागला, प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली, अडचणी आल्या, त्याचा संक्षिप्त इतिहास पाहणे रंजक आहे.

इंग्रजी आमदनीत १८५८ सालापासून कायदे तयार केले जात होते त्यावेळी, सुधारकी व पुरोगामी जैन कायदे तज्ञांनी/वकिलांनी अँग्लो-हिंदू कायदे जैन समाजावर लादण्यास विरोध केला. त्यांनी आमच्या जैन सूत्र, नीती व शास्त्र वचनें यावर आधारित वैयक्तिक कायदा करावा यासाठी चिकाटीने मागणी केली. याचा उद्देश जैन समाज एक व्हावा, त्याचा राजकीय दबाव गट तयार व्हावा, व काळाच्या ओघात गडप झालेला मुळचा एकत्रित जैन कायदा अमलात यावा हे होते.

 

“आज जरी जैन एकसंध नसले, तरी भूतकाळात जैन स्त्री पुरुषांचा समाज एकसंध व एकरूप होता. त्यांचा स्वताचा एक कायदा होता. तो पूर्णपणे गायब झाला नाही, तर तो कायदा साहित्य व परंपरांच्या ओझ्याखाली दबला गेलाय. पण त्याचे अस्तित्व शाबूत असून त्याची दखल घ्यावी लागेल.जैन समाजा मध्ये प्रचंड प्रमाणात जाती, जमाती नाहीत व त्यामुळे विविध संस्कृतींचा,विविध धारणांचा वा पंथांचा एकत्रित केलेला तो गठ्ठा नव्हे. एक शिकवण-श्रद्धा,एक धर्म, एक संस्कृती व एक समाज हीच जैन परंपरा आहे.” असे प्रतिपादन करावे लागले.

हिंदू कायदा निर्मितीच्या वेळी, कोर्टाला,जैन कायद्यासाठी आवश्यक लिखित कागदोपत्री साक्षी पुरावे उपलब्ध नसल्यामुळे, जैन कायदे हे हिंदूच कायद्याचे भ्रंश रूप आहे असे मानले गेले. १८७९ पर्यंत जैन हा स्वतंत्र वेगळा धर्म आहे असेही मानले जात नव्हते. हर्मन जाकॉबी या पाश्च्यात्य अभ्यासकाने त्याच्या “Kalpsutra of Bhadrabahu” या ग्रंथात, प्राचीन बुद्ध वचनात ‘निर्ग्रंथ’ या अर्थाने जैन या स्वतंत्र धर्माचे वर्णन केले आहे, असे प्रथमच पुराव्यानिशी सिध्द केले. सरकारने १८८१ च्या जनगणनेत प्रथमता जैन ही अधिकृतपणे वेगळी वर्गवारी मान्य केली. 

विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकापूर्वी पर्यंत, समर्पक शास्त्रीय वा धार्मिक पुराव्यांचे सहज उपलब्ध होणारे लिखित आधार नव्हते.  फक्त ‘तज्ञ’ साक्षीदार हेच कोर्टासमोरचे  पुरावे असत. याचे कारण काही परंपरावादी सनातनी जैनानी एकच सर्वसमावेशक जैन कायद्याला विरोध केला. ‘आमच्या सामाजिक प्रथामध्ये मोठ्या प्रमाणात वेगळेपण आहे’ असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे पूर्ण देशासाठी एकच मार्गदर्शक व दिशादर्शक समितीलाही त्यांचा विरोध होता.१८९९ सालच्या हर्नाभ प्रसाद विरुध्द मंदिल दास खटल्यात, ‘एका प्रांतात असलेल्या जैन प्रथा, या दुसऱ्या प्रांतातही तशाच जैन प्रथा अस्तित्वात होत्या असे मानण्याला आधार ठरतात’ या म्हणण्याला प्रस्तुत ठरवून आखिल भारतीय जैन प्रथांना मान्यता दिली गेली व मग जैन कायदे निर्मितीला त्याचा आधार झाला.

१९०४ मध्ये ‘ऑल इंडिया जैन असोसिएशन’ व ‘दिगंबर ऑल इंडिया जैन महासभा’ यांच्या सदस्यांनी हिंदू कायद्यांच्या धर्तीवर, प्राचीन जैन शास्त्रामधून, कायदे  तयार करण्या संबंधात आवश्यक साधन सामुग्री जमवून संगाहित करण्याचे ठरवले. १९१० साली महासभेने, सर्व जैन समूहासाठी सामाईक, कायदेशीर नियम-निर्बंध ठरवण्यासाठी व नव्या विधानसभेत हक्क व अधिकार यांचा आपला दावा मांडण्यासाठी  ‘जैन लॉ कमिटी’ स्थापन केली. बॅरीष्टर जगमंदर लाल जैनी(१८८१-१९२७) यांनी ‘भद्रबाहू संहिता’ याचे केलेले भाषांतर हा मैलाच्या दगडासारखे मार्गदर्शक ठरणारा ग्रंथ प्रकाशित झाला. १९१७ साली, जैनांना एकात्मिक राजकीय प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी, ‘जैन पॉलिटीकल असोसिएशन’ स्थापन करण्यात आले.  

१९१९ साली हरी सिंग गौर यांनी ‘द हिंदू कोड’ प्रकाशित केले. त्यानंतर ‘जैन मित्र मंडळ दिल्ली’ या दिगंबर संघटनेने बॅरीष्टर जगमंदर लाल जैनी आणि चंपत राय जैन (१८६७-१९४२) यांच्या नेतृत्वाखाली ‘हिंदू कोड’ मधील जैनांच्या बद्दल चुकीच्या धारणांचे खंडन करण्यासाठी ‘जैन लॉ सोसायटी’ स्थापन केली. “या हिंदू कोड नुसार हिंदू कायदे जैनांना सुद्धालागू होतात असे समजणे बेकायदेशीर आहे” असे जैनी यांनी मांडणी केलेली दिसते. या नुसार ‘हिंदू कोड’ च्या दुसऱ्या आवृत्तीत चुकीची दुरुस्ती करण्यात आली. सोसायटीने ठराविक काळात शास्त्रांचा अभ्यास करून जैन कायद्यांना निश्चीत स्वरूप देण्याचे ठरवले. या सगळ्या प्रयत्नांचा भाग म्हणून चंपत राय जैन यांचा ‘जैन लॉ’ हा  ग्रंथ  निर्माण झाला. श्वेतांबार व दिगंबर लेखकांच्या प्रयत्नातून सिद्ध झालेला, हा वैयक्तिक कायदा परिणामकारक झाला. ‘गाटेप्पा विरुध्द इराम्मा’ या खटल्यातून जैन हे हिंदूंच्याच मतभेदी पंथातील नाहीत, तर ते स्वतंत्र धर्माचे अनुयायी आहेत असा निष्कर्ष दिला गेला. जैन कायद्यांचा मुख्य स्त्रोत हे श्वेतांबर व दिगंबर यांच्या प्राकृत भाषेतील ‘आगम’ किंवा ‘सिद्धांत’ मधील वचणे व त्यावरील टीका, विश्लेषणे यावर आधारित  आहेत.

‘जैन लॉ’ त्याच्या व्यापक अर्थाने, जैन श्रद्धा व व्यवहारातील प्रथा, व्यक्त करतात. विशेष करून हे जैन ‘व्यवहार’ व ‘व्यवस्था’ यावरून तयार केलेले नियम आहेत. आधुनिक भारतीय न्याय व्यवस्था जैन वैयक्तिक कायद्यांच्या संबंधित उहापोह करते. १९५५ साली जैन वैयक्तिक कायदया चा अंतर्भाव ‘हिंदू कोड’ मध्ये केला गेला.

                                          प्रा. पी. ए. पाटील

                                          papatils@gmail.com

ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ

ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ सगळ्याच तीर्थंकरांचा उपदेश एकसारखाच असेल का...