सृजनशक्ती साहित्य विचार मंच चिंचवाड व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई आयोजित,
१४ वे ग्रामीण युवा मराठी साहित्य संमेलन, मजले.(१२/१/२०२५)
संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. गोमटेश्वर पाटील यांचे भाषण
'मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या समृद्धीसाठी जागर व्हायला हवा’
"मराठी भाषेच्या अस्तित्त्वाचे पुरावे इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून आज उपलब्ध झाले आहेत. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि त्याचवेळी प्राकृत भाषेलाही हा दर्जा देण्यात आला. या प्राकृत आणि मराठीच्या अनुबंधाचा एक दुवा शोधला गेला आणि मराठी भाषेचे प्राचीनत्व सिद्ध झाले. मराठी भाषा संस्कृत उद्भव की प्राकृत्व उद्धव या प्रश्नातच मराठी या मराठीच्या अभिजातपणाचे भिजत घोंगडे दिसत होते. मराठी भाषेचा उगम हा महाराष्ट्री प्राकृत या भाषेतून झाला आहे. या दिशेने जेव्हा शोध सुरू झाला तेव्हा मराठी भाषा ही प्राचीन आहे यावर शिक्कामोर्तब झाले. मराठीची पूर्वभाषा म्हणून महाराष्ट्री अपभ्रंश आणि त्यापूर्वी महाराष्ट्री प्राकृत या भाषेचा शोध घेणे ही आता आपली जबाबदारी होऊन बसली आहे. मराठीची व्याकरण व्यवस्था जरी आपण संस्कृतच्या अनुकरणातून घेतली असली तरी मराठी भाषेची (महाराष्ट्रीची) तिची एक स्वतंत्र भाषिक व्यवस्था प्राचीन काळापासून विकसित झालेली आहे. या शोधाकडे आपण आता वळले पाहिजे. गुणाढ्याच्या बृहद कथेपासून ते हाल राजाने संकलित केलेल्या गाथा सप्तशतीमधील मराटी गाथा या मराठी आणि महाराष्ट्र प्रदेशाच्या संस्कृतीचे, इथल्या परंपरेचे इतिहासाचे अनेक दाखले आणि पुरावे देताना आढळतात.
महाराष्ट्री प्राकृतचा विकास हा इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून झाला त्यानंतर इथल्या जैन आणि बौद्ध परंपरेतल्या अनेक लेखकांनी या महाराष्ट्री प्राकृतमध्ये ग्रंथलेखन केले. पऊमचरिउ, वसुदेवहिंडी, कुवलयमाला येथपासून ते नवव्या- दहाव्या नव्या शतकातील अपभ्रंश महाराष्ट्री भाषेतील अनेक ग्रंथांचे पुरावे या मराठीचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. महाराष्ट्री अपभ्रंश भाषा ही मराठीचे पूर्वरूप होते. नाथ संप्रदायातील आणि जैन परंपरेतील अनेक ग्रंथ हे या अपभ्रंश महाराष्ट्री प्राकृतमध्ये लिहिले गेले. याच मराठीमध्ये अनेक लोकगीते आणि बोलीच्या अनेक परंपरा महाराष्ट्रात विकसित झालेल्या दिसतात. महानुभावियाच्या आणि वारकऱ्यांच्या लेखनाने मराठी भाषेला समृद्ध रूप प्राप्त झाले. मध्ययुगीन मराठीमध्ये महाराष्ट्रातील अनेक संत महात्मे आणि धर्मसंप्रदाय यांचे योगदान महत्त्वाचे आहे. मराठी भाषा समृद्ध करण्यामध्ये चक्रधरांसारख्या दूरदृष्टीच्या विचारवंताने मुद्दामहून मराठी भाषेचा उपयोग आपल्या संप्रदायाच्या प्रसारासाठी केला. अनुयायांना सांगितले की, 'कन्नड देशा तेलंग देशा न वसावे : महाराष्ट्र असावे :' यातूनच मध्ययुगीन भक्तीसंप्रदायांना आणि धर्मसंप्रदायांच्या प्रसारासाठी महाराष्ट्र भूमी ही पोषक होती हे आपणास दिसून येते. महाराष्ट्रातील या पोषक वातावरणामध्येच वारकरी संप्रदायासारखा वटवृक्ष विस्तारला. नामदेव-ज्ञानेश्वर यांनी मराठी भाषेतून या संप्रदायाचे विचार पेरले. महाराष्ट्राची एक स्वतंत्र भक्ती परंपरा, विचार परंपरा आणि सामाजिक समतेची परंपरा याच वारकऱ्यांनी महाराष्ट्राला दिली. पुढे अनेक संप्रदायाच्या प्रेषितांना आपला विचार मांडण्यासाठी मराठी भाषाच आवडू लागली. चौदाव्या शतकामध्ये दत्त संप्रदाय, जैन धर्मियांचे साहित्य आणि पंधराव्या शतकामध्ये ख्रिस्ती आणि मुस्लीम धर्मियांनीसुद्धा मराठी भाषेचाच वापर आपल्या ग्रांथिक लेखनासाठी केलेला दिसून येतो.
भारतात आलेल्या ख्रिस्ती मिशनऱ्यांनासुद्धा या मराठी मराठीची मोहिनी पडलेली दिसते. फादर स्टीफनसारख्या ख्रिस्ती मिशनऱ्यानेसुद्धा मराठी भाषेची तुलना रत्नाशी केलेली आहे. इस्लामी राजवटीच्या प्रभाव काळात उर्दू आणि फारसीने मराठी प्रांतात मुसंडी मारली असली तरी याच काळात एकनाथांनी मराठीचे लोन महाराष्ट्रभर पुन्हा पसरवले. एकनाथांनी ग्रांथिक रचनेपासून ते लोकपरंपरेतील गीते आणि भारुडे मराठीतून पुन्हा आणली. या काळात राज्यव्यवहाराची भाषा उर्दू, फारसी असली तरी या काळात मुस्लिम कवी, जैन कवी, वीरशैव कवी, संत एकनाथ यांनी मराठी भाषेवर केलेले उपकार महत्त्वाचे आहेत.
शतकात शिवकाळामध्ये परत मराठीला उभारीचे दिवस आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः तयार करून घेतलेला राज्यव्यवहार कोश, लेखनकल्पतरू अशा ग्रंथामुळे आणि राज्यव्यवहाराची भाषा सक्तीने मराठी केल्यामुळे पुन्हा मराठीला ऊर्जितावस्था आली. याच काळात पंडित कवींनी दिलेले योगदानही महत्त्वाचे आहे. शाहिरांनी देशभर मराठीचा पोवाडा आणि लावणी पोहचविली आणि मराठीच्या सौंदर्यामध्ये अधिक भर घातली. ओवी, अभंग, गवळण, भारुड, लावणी, पोवाडा, फक्कड, कटाव, फटके, पाळणा, टिपरी, लबलखोटा, ढवळे, भवातर गीते, फाग गीते, फुगडी गीते, गोंधळ, भारुड अशा अनेक रचना प्रकारांनी मराठी साहित्य आणि मराठी परंपरा मध्ययुगीन काळात समृद्ध झालेली दिसते. संत, पंडित आणि शाहिरांनी मराठी साहित्य समृद्ध केले.
आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास सुरू झाला. ब्रिटिश राजवटीने वसाहतवादी समाज रचनेचा प्रारंभ झाला. विस्कटलेली भारतीयाची आणि संस्थानिकांची राजवट एकत्र बांधण्याचे काम ब्रिटीशांनी केले. प्रारंभी ब्रिटीश राजवट हि एक दैवी आणि प्रेषिताची राजवट आहे असा समज भारतीयांचा झाला. भारतीय परंपरेच्या इतिहासाची उलथापालथ झाली ब्रिटिशांचा एकछत्री अंमल सुरू झाल्यानंतर मराठी भाषा आणि साहित्याचे रूप पालटले. पारंपरिक मराठी ओवी, अभंग, लावणी, पोवाडा, गवळण आणि भारुड या छंदातून मराठी साहित्य मुक्त झाले. संत आणि पंडिती वळणाचे साहित्य मागे पडले. मराठी गद्याची पुन्हा पहाट झाली. महाननुभावीय गद्य साहित्यानंतर बखर गद्यापर्यंत मराठीची समृद्ध गद्य परंपरा असली तरी ब्रिटिशाच्या वसाहतवादी समाजरचनेनंतर मराठी गद्याचे वेगळे रूप आपणास पहायला मिळाले. निबंध, नाटक, कथा, प्रवास वर्णन, कादंबरी अशा नव्या साहित्य प्रकारांचा परिचय भारतीय समाजाला झाला. कादंबरीसारख्या नव्या गद्य वाङ्मय प्रकाराने मराठी साहित्याची दिशा बदलून. टाकली. नाटकांनी प्रबोधनाची आणि स्वातंत्र्यलढ्याची कास धरली.
या वसाहतवादी राजवटीनंतर नव्या समाजरचनेचे खरे प्रणेते महात्मा फुले होते. महात्मा फुले यांनी अनेक नव्या लेखनप्रकारांनी मराठी साहित्याचे रूप पालटून टाकले. कुळवाडीभूषण शिवाजी महाराजांचा पोवाडा, शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी, अखंड तृतीय रत्न अशा त्यांच्या लेखनाने मराठी साहित्यामध्ये प्रबोधनाची नवी दृष्टी निर्माण केली. सावित्रीबाईंनी आपल्या 'काव्यफुले' मधून मराठी कवितेची नवी पहाट सुरू केली. पुढे केशवसुतांची तुतारी महात्मा फुले यांच्या समतेचे विचारच फुंकणारी होती असे लक्षात येते. हरिभाऊ आपटे यांनी तत्कालीन विधवांचे दुःख 'पण लक्षात कोण घेतो' या कादंबरीत मांडले आणि मराठी सामाजिक कादंबरीचा एक मोठा प्रवाह मराठी साहित्यात विस्तारित झाला. आण्णासाहेब किर्लोस्करांपासून सुरू झालेली नाट्यपरंपरा देवल, खाडीलकरांच्या विचाराने विस्तारित झाली. पुढे अत्र्यांपासून मामा वरेरकर आणि राम गणेश गडकऱ्यापर्यंतचे नाटककार मराठी रंगभूमीचा इतिहास घडवत गेले. मराठी चित्रपट मराठी चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर या नाटकाचे महत्त्व मराठी साहित्यात अनन्यसाधारण आहे. हरी भाऊंपासून सुरु झालेला सामाजिक कादंबरीचा इतिहास वामन मल्हार, श्रीधर केतकर, विश्राम बेडेकर, ग. त्र्यं. माडखोलकर, ना. सी. फडके, वि. स. खांडेकरांच्या कादंबऱ्यांनी विस्तारित केले. फडके, खांडेकर यांनी मराठी कादंबरीत स्वताचे युग निर्माण केले.
स्वातंत्र्यानंतर मराठीत अनेक साहित्यप्रवाह निर्माण झाले ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी, जनवादी अशा अनेक समुहातील लेखकांनी आपल्या जीवन जाणीव मांडायला सुरवात केली. महाराष्ट्रभर अनेक जनसमुदायातील आणि वंचित घटकातील लेखक लिहू लागले. स्वातंत्र्योत्तर काळात विशेषतः ग्रामीण कथा, कादंबरी आणि दलित आत्मकथनांची चर्चा साहित्याच्या केंद्रस्थानी आली. लघु नियतकालिके, अनियतकालिके यांनी नव्या साहित्यिकांना प्रस्थापित प्रवाहात स्थान दिले. पारंपारिक साहित्यशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र या शिवाय दलितांचे आणि ब्राह्मणेतर साहित्यशास्त्र आणि सौंदर्यशास्त्राची चर्चा होऊ लागली. याचवेळी साठोत्तर काळात भालचंद्र नेमाडे यांनी मराठी कादंबरी विश्वात क्रांती घडवली. कोसलाने मराठी साहित्याचे आणि कादबरीचे निकष मोडून टाकले. पारंपरिक साहित्य तपासणीच्या आणि समीक्षेच्या मोजपट्ट्याही मराठी साहित्याला यामुळे बदलाव्या लागल्या. कोसलाच्या प्रभावात मराठी कादबरीकारांची एक पिढीच निर्माण झाली. अगदी नेमाडेंपासून संगनाथ पठारे, राजन गवस यांच्यापासून अलीकडे लेखन करणारे कृष्णात खोत, प्रवीण बांदेकर, किरण गुरव, सुशील धसकटे अशा एका नेमाडपंथी कादंबरीपरंपरेचा विकास मराठी साहित्य आणि समीक्षेत होऊ लागला. पाश्चात्य समीक्षेने विकसित झालेला मराठीतला गेल्या दीडशे वर्षातला समीक्षा व्यवहारही काही समीक्षकांनी मोडीत काढला. आनंद पाटील, अशोक बाबर, भालचंद्र नेमाडे अशा समीक्षकांनी येथील भारतीय आणि देशी परंपरेच्या पार्श्वभूमीवर आपली समीक्षा ठळक केली.
पाश्चात्य सौंदर्यशास्राचे आणि रुपवादी समीक्षेचे जोखड घेऊन आजही मराठी समीक्षा त्याच वर्तुळात झुंजते आहे. इथल्या देशी परंपरेची आणि भारतीय संस्कृतीच्या व्यामिश्र पटलावरची मराठी समीक्षा अद्यापही मूळ धरू शकली नाही अथवा विस्तारित झाली नाही. भारतीय साहित्यशास्त्र, भारतीय काव्यशास्त्र आणि तसेव इथल्या प्रादेशिक साहित्य परंपरेचा आधार घेऊन भारतीय समीक्षा आजही विकसित का होऊ शकत नाही हा अभ्यासाचा विषय आहे. इंग्रजी अभ्यासकांनी मराठीत मांडलेली समीक्षा व पुणे मुंबईच्या विद्यापीठातून निर्माण झालेले समीक्षक हेच मराठी समीक्षेचे आजही आदर्श आहेत.
१९८० नंतर महाराष्ट्राच्या भूमित अर्धनागर आणि अर्धग्रामीण समाजव्यवस्था विकसित होत गेली. ग्रामीण, दलित, आदिवासी असे समूहदर्शक साहित्यप्रवाह आपोआपच खंडित झाले. या साहित्याचे आणि समीक्षेचे पुढे करायचे काय हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला दिसून येतो, आज अस्पृश्यता नाहीशी झाली. शोषण वंचितांचे जगणे आणि भटक्यांचे जगणे संपुष्टात आले. आदिवासी समूहाचे तुटलेपण संपले मात्र नवी जातीव्यवस्था, नवे आर्थिक स्तरीकरण यांनी आपल्या देशात नवा स्तरीकरणाचा भेद असलेला समाज निर्माण केला. स्वातंत्र्यपूर्व काळात साहित्यात मांडले गेलेले प्रश्न वेगळे होते. स्वातंत्र्यानंतर शेती शेतकरी आणि त्यांचे शोषण इथेपर्यंतचे प्रश्न वेगळे होते. मात्र १९८० नंतर महानगरीय प्रश्न आणि अर्धनागर समाजाची मानसिकता साहित्यामध्ये टिपण्यासाठी काही लेखक प्रयत्न करत आहेत. दुष्काळ, शेतकऱ्यांची आत्महत्या, ग्रामीण जीवनाची झालेली पडझड, आपल्या कृषी संस्कृतीची झालेली पीछेहाट, नात्यांमधील दुरावा, कृषी यांत्रीकीकरणाचे परिणाम, ग्रामीण सहकारी संस्था, साखर कारखानदारी, दुध, साखर आणि शिक्षण या परिप्रेक्ष्यात मराठी साहित्यविध विस्तारित झाले. ग्रामीण आणि पारंपरिक साहित्यविश्वात रमलेली लेखकांची नोस्टेल्जिक पिढी कशीबशी २० व्या शतकाच्या अखेरपर्यंत लिहू शकली. या सर्वांची मराठी साहित्याने नोंद घेतली आहेच.
२१ व्या शतकात आज आपल्यापुढे वेगळीच समाजव्यवस्था येऊ घातलेली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या पुढे जाऊन आज आपण ए आयच्या जगात अडखळत आहोत. समाजातील जातीयता, समाजातील स्तरीकरण, गरिब-श्रीमंतातील दरी, उचित घटक, शोषितांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांचे दुःख घेऊन रडणारे कवी, लेखक यापुढे अशा विषयांवर लिहू शकेल की नाही हे सांगणे कठीण आहे. आज समाजातले प्रश्न वेगळेच होऊ घातले आहेत. या प्रश्नाला भिडण्याची ताकद आजच्या साहित्यिकांमध्ये येईल की नाही हा मोठा प्रश्नच आहे. संशयग्रस्त भवताल, संभ्रमात सापडलेला समाज आणि समाजातील ढासळती पारंपरिक मूल्यव्यवस्था, समाजाचे नेतृत्व करणारी सुमार दर्जाची पिढी यातून साहित्यिकांच्या हाताला काही लागेल याची शक्यता वाटत नाही. आजच्या साहित्यविश्वासह शास्त्रज्ञांपर्यंत सुमारांच्या टोळ्या समाजात प्रबळ होत असताना दिसत आहेत, खलवृत्तीचे लोक तरुणांचे आदर्श आहेत. सामाजिक नैतिक मूल्यावर व संविधानिक मूल्यांवर निर्माण केलेल्या व्यवस्थांची आवश्यकता नष्ट करण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरु आहेत. राजकीय पक्ष आणि त्यांची नैतिकता याची धुळधान झाली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आता बाजूलाच राहिलेले आहेत. शेतकरी ज्या समाजव्यवस्थेमध्ये केंद्रस्थानी होता तो आता परिघाबाहेर पडला आहे. समाजात अनेक प्रश्न आहेत पण त्या प्रश्नांचे दृश्य चेहरे मात्र दिसत नाहीत. चेहरा नसलेले प्रश्न, चेहरा नसलेली माणसे, चेहरा नसलेली व्यवस्था आणि बिन चेहऱ्याची वैचारिक आंदोलने यामुळे आजच्या साहित्यामध्ये सुद्धा हा गोंधळ पकडायचा कसा हा लेखकांसमोर मुद्दा आहे. जेव्हा समाजातील व्यापक प्रदेश, समाज, कालखंड शब्दात पकडता येत नाही तेव्हा समाजाला लघुकथेमध्ये समाधान मानावे लागते. आता त्याही पुढे जाऊन काहीच शब्दात पकडता येत नाही म्हणून की काय अतिलघुकथा हा साहित्यप्रकार उदयास येत आहे.
मराठी कवितेतील भावनाशीलता आणि सौंदर्यात्मकता संपुष्टात आली असून विस्कळीत समाजातील सौंदर्य पकडता येत नाही म्हणून मराठी कविता गद्याचे रूप घेत आहे. कवितेचा आत्माच मुळात पद्य असतो आणि हजारो वर्षांच्या भारतीय परंपरेत या पद्याच्या विविधरचना आणि रचनाप्रकार विकसित झालेले आहेत. गावोगाव आणि भारताच्या कोणत्याही प्रदेशात त्या त्या प्रदेशाची एक गद्य संस्कृती हजारो वर्षे चालत आली होती ती नष्ट होत गेल्याने मानवी जगण्यातले सौदर्य नष्ट झाले आहे. समकालात पद्यरचनेचा कोणताही नवा प्रकार भारतीय साहित्यात निर्माण होताना दिसत नाही. गद्य कवितेत मानवी भावना पकडणे ही गोष्ट कठीण होत चाललेली आहे.
आजच्या युवकांना आणि युवा साहित्यिकांना सर्जनाची शक्यता असणारी क्षेत्रे शोधावी लागणार आहेत. गावोगावच्या युवा साहित्य संमेलनामध्ये साहित्याच्या चर्चेचे विषयसुद्धा राजकीय आणि सामाजिक झालेले आहेत. त्या चर्चेमध्ये साहित्य चर्चा बाजूला पडून कवी संमेलन आणि कथाकथन हाच त्या साहित्य संमेलनाचा महत्वाचा भाग होऊन गेलेला आहे. साहित्यबाह्य चर्चा केद्रवर्ती आल्याने साहित्य आणि समीक्षेचा बोजवारा उडाला आहे. साहित्य संमेलनाची उद्घाटने राजकीय पक्षाचे प्रमुख करत आहेत. ज्यांच्या साहित्याशी काडीमात्र संबंध नाही अशा राजकारणी लोकांची गर्दी अखिल भारतीय साहित्य संमेलनात दिसत आहे. त्याचेच अनुकरण छोट्या मोठ्या साहित्य संमेलनातून होत आहे. ग्रामीण भागात अशा छोट्या छोट्या साहित्य संमेलनानी या मोठ्या संमेलनांचे कोणते अनुकरण करावे हा मोठाच प्रश्न उपस्थित झाला आहे.
अशा परिस्थितीत नवे प्रश्न, नव्या सामाजिक समस्या आणि नव्या पिढीच्या मानसिकतेच्या आणि चेहरा नसलेल्या समाजातल्या परिस्थितीचे चित्र साहित्यामध्ये युवकांनी कसे पकडावे. आजही आपल्या परंपरा कित्येक वर्षांपासून सुदृढ होत्या आणि आहेत. त्याचे चित्रण अद्याप साहित्यात होत नाही. पुण्या-मुंबईमध्ये मान्यता मिळालेले साहित्यिक म्हणजेच महाराष्ट्रातले साहित्यिक, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे आज साहित्य वर्तुळात होत असते. मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये आजही प्रामाणिकपणे आपल्या भावना अभिव्यक्त करणारे लेखक होते, आहेत. आपल्या आसपासच आपल्या परंपरा बघितल्या तर त्या परंपरेतील सहिष्णुता, सामूहिकता आणि माणुसकी जपण्याचे साहित्याचे प्रयत्न याचे संकलन झालेले नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर ज्या गावांमध्ये हे साहित्य संमेलन होत आहे त्या मजलेपासून बाजूला असणारे बाबूजमाल हे १६ व्या शतकात एक मोठे सुफी संत कवी होऊन गेले आहेत. त्यांचा अभ्यास कोणीही केला नाही. याच गावामध्ये धर्मसागर मुनी गुफांमध्ये राहत त्यांनी अनेक शाहिरी कवणे लिहिली आहेत. १९३० च्या दरम्यान नाना रामचंद्र नाग यांनी या गावच्या सामाजिक आणि धार्मिक परिस्थितीचा उल्लेख करणारे आत्मचरित्र लिहिलेले आहे. आज आपल्या परिसरामध्ये गावोगाव भरणारे उरूस, या उरसाच्या ठिकाणी असणाऱ्या समाध्या आणि त्या समाधीतले पुरुष हे अनेक लेखक साहित्यिक आणि समाजसुधारक होते. यांच्या साहित्याचे उत्खनन अद्याप झालेले नाही. आपल्या आसपास अनेक करबल मेळे होते. अनेक नाटक पार्त्या होत्या. अनेक मेळे होते. यांचे संकलन झाले नाही. गावोगाव चालणाऱ्या महाराष्ट्रातील नाटकाचा इतिहास अद्याप कोणी लिहिलाच नाही. केवळ पुण्याच्या थिएटरमध्ये चालणारी नाटके हीच आज साहित्याच्या अभ्यासात मध्यवर्ती आहेत. आपल्या आसपास दरवर्षी गावागावांत, यात्रांमध्ये आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये होणारी नाटक शेकडों हजारोंनी लिहिली गेली आहेत. यांचा समग्र इतिहास, संकलन आणि त्यांच्या अभ्यास होत नाही. या भागात अनेक अस्तंगत होत चाललेल्या लोककलांचे ऐवजीकरण होणे गरजेचे आहे. त्याचवेळी गावोगाव असणाऱ्या नव्या सर्जनशील लेखकांना बळ देण्याचे कामही आपणास करावे लागेल.
मराठी सर्जनशीलता खुंटण्याचे अनेक कारण म्हणजे मराठीला हद्दपार करण्याची षडरचना आज वरिष्ठ पातळीवरून सुरू आहे. कारण आपली भाषा हीच आपल्या सर्जनाचे मूळ स्तोत्र असते. तीच भाषा आपण हद्दपार करून गावोगाव इंग्रजी माध्यमांचे आणि ब्रिटिश युरोपीय आणि पाश्चात्य शिक्षण प्रणालीची व्यवस्था वाढीस लावत असू तर हे धोकादायक आहे. पाश्चात्य देशातले भावनांचे स्तर आणि महाराष्ट्रीयन आणि भारतीय भूमीतल्या भावना यातील संबंध आणि सामाजिक व्यवस्था याच्यामध्ये कमालीचे अंतर आहे. या मातीतल्या सगळ्या भावनिक, सामाजिक आणि मानसिक नातेसंबंधासाठी इथल्या भाषांनी केलेले कार्य अत्यंत महत्त्वाचे होते. या भाषा जर हद्दपार झाल्या तर भारतीय भावना, भारतीय समाजव्यवस्था आणि भारतीय मानसिकता संपुष्टात येईल. झपाट्याने गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही इतका बदल गेल्या पन्नास वर्षात झालेला आहे. हा बदल इथल्या संस्कृती समाज व्यवस्था आणि इथल्या परंपरेच्या मुळावर आहे. यासाठी आपली भाषा ही मध्यवर्ती कशी येईल. मग ती शिक्षणात असो किवा प्रशासनात असो. तिला मध्यवर्ती आणणे ही फार महत्त्वाची गरज आहे.
महाराष्ट्राच्या परंपरेत या मराठी भाषेला मध्यवर्ती आणण्यासाठी चक्रधरांनी प्रयत्न केले. ज्ञानेश्वर, नामदेव यांनी प्रयत्न केले. त्यानंतर एकनाथांनी प्रयत्न केले. हे सांप्रदायिक प्रयत्न होतेच पण त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या दूरदृष्टीच्या राजाने मराठीला मध्यवर्ती आणण्यासाठी महत्त्वाचे प्रयत्न केलेले दिसून येतात. त्यानंतर राजश्री शाहू महाराज किंवा इथल्या भाषा सुधारकांच्या चळवळी असतील त्यांनी मराठी भाषेला मध्यवर्ती आणण्यासाठी थोडा थोडा प्रयत्न केलेला होता. मात्र आज मराठीला मध्यवर्ती आणण्यासाठी जे दुबळे प्रयत्न आहेत ते आपल्या साहित्य आणि संस्कृतीला घातक आहेत. अशा छोट्या संमेलनातून या मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या समृद्धीसाठी जागर नसेना का पण दिवा लावण्याचा तरी प्रयत्न होत आहे. याबद्दल इथे समाधान वाटत आहे."