स्त्रिनिर्वाण व त्याची परंपरेतील मांडणी.
स्त्रियांचे धार्मिक व्यवस्थेमध्ये स्थान काय? या वरून त्या त्या धर्मांचा
पुरोगामीपणा ठरवता येतो. या कसोटीवर खरे उतरणारे धर्म, किंवा
धार्मिक व्यवस्था यात स्त्रियांच्या बाबतीत कसा
कसा विचार केला आहे हे पाहणे मनोरंजक ठरेल. मूळ व्यवस्था व कालांतराने
त्यात रूढी,परंपरा, भीती, दमन, व पूर्वापार चालत आलेला
पुरुषी वर्चस्ववादी विचार, यांचे प्रतिबिंब स्त्रियांचे
स्थान ठरवताना दिसून येते. म्हणजे अगदी आमचा धर्म वैज्ञानिक पायावर उभा आहे असे
म्हणणारे देखील पुरुषी मक्तेदारीबद्दल सोयीस्करपणे मौन राहतात. त्याच-त्याच
कालबाह्य झालेल्या शुद्धतेच्या, शुचितेच्या उदाहरणांचे दाखले देत राहतात.
वैदिक व्यवस्थेमध्ये स्त्रियांना नगण्य स्थान दिले आहे आणि जैन
व्यवस्थेमध्ये स्त्रि ही अध्यात्मिक ज्ञान
व मुक्ती मिळवण्या करीता स्वतंत्र व समर्थ आहे असे प्रतिपादन केले आहे. तरीही ढोबळ
मानाने तिला ‘मोहाचा सापळा’ किंवा मोहाला बळी पडण्यास भाग पाडणारी असेच समजले
गेल्याचे दिसते. कौटुंबिक जबादारीचे भान देत, त्याचाच भारा तिच्या डोक्यावर सतत
ठेवला गेला आहे. पतिव्रता धर्माचे पालन करणारी, पतीच्या सेवेतच मोक्ष आहे असे
प्रतिपादन करणारी, त्याच्यासाठी मुले प्रसवणारी व त्याला त्याच्या पूर्वजांच्या
ऋणातून मुक्त करणारी, त्याच्या सगळ्या कुटुंबाची सेवा करणारी असेच तिचे स्वरूप
वर्षानुवर्षे मानले गेले आहे. पावित्र्याच्या वेडगळ कल्पनांचा अतार्किक डोलारा उभा
करून स्त्री ला धार्मिक उच्च्य स्थानापासून बाजूला केले गेले आहे.
परंपरेने चालत आलेल्या भारतीय इतिहासातील मुलभूत आणि प्रचंड परिणामकारक
अशी धार्मिक, शास्त्रीय, व प्रमाणित साहित्यिक ग्रंथ संपदा, यांच्या मधून मांडलेल्या
विचारातून व अभ्यासातून वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या सिद्धांताना हवा मिळत
गेल्याने त्यांचा बागुलबुवा तयार झाला किंवा केला गेला असे दिसते. संस्कृतीच्या इतिहासात
तर्काला तिलांजली देत, अविवेकी श्रद्धेच्या माध्यमातून उभी ठाकलेली काही गृहीतके,
आजही समाजाला मागे नेणारी आहेत. त्यात लिंगभेद आणि लैन्गीकता आणि त्याचा स्त्रिया
आणि त्यांचे जीवशास्त्रीय शरीर यावर होणारा परिणाम, या बाबत
पुष्कळ लिहिले गेले आहे.
स्त्रीच्या शरीर रचणेमुळे
पुरुषांच्या तुलनेत त्यांच्या कडून जास्त हिंसा होते, आणि सूक्ष्म जीव जंतूंची निर्मिती स्त्री च्या अवयवा मध्ये होते व
स्त्री ही कधीही लिंगविशिष्टतेच्या विचारा
मधून बाहेर पडत नाही, त्यामुळे तिच्या अध्यात्मिक प्रगतीत अडथळा निर्माण होतो, असे आचार्य कुंदकुंद यांनी आगमाच्या हवाल्याने मांडले आहे. (काहींच्या
मते इसवी सन १ले शतक,) [‘सुत्तप्रभर्त
आदिसंग्रह’ या पन्नालाल सोनी यांनी संपादित केलेल्या व १९२० साली प्रकाशित
केलेल्या ग्रंथात त्यांनी, सुत्तप्रभर्त
किंवा प्राकृत मधील ‘सुत्तपाहूड’या ग्रंथातील कुंद कुंद यांची वचणे दिली आहेत.]
याशिवाय मूळ अडथळा हा कपड्यांच्या बाबतीत येतो. नग्नता ही मोक्ष मिळवण्यात प्रमुख अट असल्याने स्त्री
नग्न झाली तर तिच्यावर लैंगिक हल्ले होतील, त्याच बरोबर पुरुषांच्या अध्यात्मिक
प्रवासात स्त्रीच्या नग्नतेने अडथळे निर्माण होतील, अशीही भीती व्यक्त करण्यात आली
आहे.
पण असेही दिसते कि, स्त्रियांना मोक्ष बंदी हि
खुप नंतरची गोष्ट आहे. “असिलीका” या प्रवाहाने, कपडे परिधान करणाऱ्या साधुना निर्ग्रंथ (नग्न)
मुनींचा दर्जा मिळत नाही, व त्याच कारणाने त्यांना मोक्ष हि मिळत नाही, असे सांगितल्याचे म्हटले जाते. या म्हणण्या
नुसार जसे नग्नते शिवाय मुनी पदाच्या
उच्च्यतम शिखरापर्यंत पोचता येत नाही तसेच पूर्ण नग्नते शिवाय स्त्रियांनाही पूर्ण
साध्विपदाला पोचता येत नाही. याच्याच पर्यायाने तिला मोक्ष सुद्धा मिळत नाही. आणि
मग स्त्रीचे नग्नत्व पुरुषांच्या साधनेमध्ये अडथळा निर्माण करेल असे प्रतिपादले.
हे म्हणणे क्षीण छोट्याश्या प्रवाहाच्या स्वरुपात काही लोकसमूहात अस्तित्वात
होते. त्याचाच आधार कुंद कुन्दानी घेतला असावा व काळाच्या ओघात त्यालाच काही
कारणाने – समाजाच्या धारणा, त्यावरचा पगडा, लैन्गीगता, शरीराची ठेवण यांच्या
परंपरागत समजुती, पाप पुण्य इत्यादिना खत पाणी मिळत जाऊन, हि विचारधारा काळाच्या
ओघात पुरेशी समर्थ होऊन कुंद कुन्दांच्या काळापर्यंत उभी राहिली असली पाहिजे, असे
म्हणण्यास वाव आहे.
स्त्री
ला साधूंची व्रते अंगीकारणे वा पार पाडण्यास लायक न समजण्याच्या कुंद कुंद यांच्या
प्रखर मांडणी नंतर, वाद विवाद झाला असणार. पण याला खरे व्यासंगी व अभ्यासाने
परिपूर्ण उत्तर हे ९ व्या शतकाच्या मध्यात
दिल्याचे दिसते, ते “स्त्रीनिर्वाणप्रकरण” यातून. यात ५० श्लोक आहेत ज्यात
सर्वस्वी मोक्षप्राप्तीसाठी स्त्री कडे असलेल्या गुणांचा परिपूर्ण बचाव केलेला
आहे. पण हा बचाव श्वेतांबरांकडून नव्हे तर फारसा प्रसिध्द नसलेल्या ‘यापनीय’
पंथाकडून केलेला आहे. ज्या “साक्तायन” यांनी हे विवेकी प्रतिपादन केले त्यांचे नाव
दोन्ही पंथामध्ये साधू म्हणूनही नोंद नाही.पण दोघांनी त्यांचा थोर व्याकरणकार
म्हणून उल्लेख केला आहे. पण दिगंबर पंथातून वेगळा झालेला व कालांतराने नामशेष वा
परावर्तीत झालेला आहे. त्या संबंधी
भट्टारक संस्था चा उगम हा या “यापनीय” पंथात मानला जातो.
“स्त्री
हि वस्तू नाही. कधीच मोक्ष साध्य करता येणार नाही असे प्राक्तन घेऊन ती जन्माला
आलेली नाही. किंवा तिला सम्यक दर्शन होणारच नाही असे काही नाही. ती मानवच आहे
अमानवी जीव नाही. किंवा ती प्राण्यांचा चेहरा व मानवी शरीर असलेली म्लेंच्छ हि
नाही. ती अगणित आयुष्य जगणारी नाही. किंवा
ती सातत्याने क्रूर मनाची नाही. तिच्या उत्कट भावना तिला नियंत्रित करताच येत नाहीत असेही
नाही. तिची वर्तणूक व चारित्र्य कधीच पवित्र नसते असेही नाही. किंवा तिचे
जीवशास्त्रीय शरीर नेहमीच अपवित्र असते असेही नाही. तिच्यात ९ व्या गुनस्थाना
पर्यंत पोचण्याचा अभाव आहे वा ती योगशक्ती मिळवण्यात सक्षम नाही असेही नाही.
किंवा ती
अनिष्ट-अशुभ जीवांची जन्मदात्री आहे असेही नाही कारण तिच्याच पोटी तिर्थंकर जन्म
घेतात. तेव्हा ती मोक्ष प्राप्ती करू शकत नाही असे कसे म्हणता येईल?”
वरील उधृत ‘यापनीय’ तंत्रातील सूत्रा वरून
असे दिसते कि, दिगंबरांचे सुरुवातीचे वैचारिक व सैन्धान्तिक विरोधक हे श्वेतांबर
नसून “यापनीय” होते. आणि त्यांनीच ‘स्त्री ला मोक्ष प्राप्त करता येत नाही’ हे म्हणणे प्रथमता तर्काधारित, विवेकपूर्ण
पद्धतीने, खोडून काढल्याचे जाणवते.
समाजाच्या
५० % लोकसमुहास (स्त्री) पुरुषांच्या बरोबरीचे स्थान देण्यास विरोध
कशाकरता केला गेला हे समजत नाही. ज्या स्त्री च्या जीवशास्त्रीय शरीराचे उदाहरण
देताना सूक्ष्म जीव जंतूंची निर्मिती होते असे सांगितले गेले, त्या वेळी
पुरुषांच्या शरीराची मात्र चर्चाच टाळली. म्हणजे संयम सुटेल म्हणून भीती पुरुषाना
वाटली आणि त्याची शिक्षा मात्र स्त्रीला दिली गेली. यावरून काही करून स्त्री ला
मोक्ष मार्गापासून दूर ठेवण्याचाच प्रयत्न केला गेल्याचे दिसते. वस्त्र, शरीर
रचना, या बाह्य वस्तूरूप गोष्टी आहेत. तप आणि साधनेत भाव शुद्धी असेल तर
तपश्चर्येच्या माध्यमातून व्यक्ती ज्ञानप्राप्तीचे अंतिम साध्य प्राप्त करू शकते.
यात भाव शुद्धीला अनन्य साधारण महत्व आहे. लिंग भेद, उच्च्य नीचता,जाती, धर्म या
कशाचाच अडथळा हे अंतिम साध्य प्राप्त करण्यात येत नाही. ते लक्षात घ्यायला हवे. या
निमित्ताने समाजाच्या मनात जे ग्रह-पूर्वग्रह असतात त्यांची निर्भय चिकित्सा आपण
करायला हवी.
स्रिनिर्वाणाबाबत आपले पूर्वसुरी इतके
कठोर का झालेत?
आजूबाजूच्या कोणत्या सामाजिक वातावरणाचा परिणाम त्यांच्यावर झाला? कि त्याच्यावर एनकेन प्रकारेन दबाव आणून त्यांना असे लिहायला भाग
पाडले गेले? कि हिंसक व कत्तलिंच्या घमासानीत सामाजिक क्षय रोखण्यासाठी त्यांनी
स्वतःच ही भुमिका घेतली? कि त्यांच्या पश्चात हे सर्व
त्यांच्या नावावर खपवले गेले? कि वैदिक व ब्राम्हणी वर्चस्व
मान्य करत त्याला बळी पडले? कि इतर धर्मश्रद्धांना वैचारिक समांतरता
ठेवण्याशिवाय त्यांना पर्याय उरला नसेल?........
कसेही असले तरी नेमके काय झाले? स्त्रियांना तपश्रर्येचे अंतिम
साध्य व मोक्श मिळवता येत नाही याची कारणे देताना ते इतके अतार्किक, कठोर व एकांगी का झालेत?...... हे गुंतागुंतीचे, सलणारे व छळणारे प्रश्न निर्माण होतात.
प्रा. पी. ए.
पाटील,
संदर्भ...1. Gender and Salvation… Jaina debates
on the spiritual Liberation
of
Women…..Padmanabh S. Jaini.
2.
South Asian History and culture. Chastity and desire:
representing women in Jainism ….Manisha Sethi .
३.
अष्टपाहुड....पं. धन्यकुमार गं. भोरे.