आपण नेमके कुठे आहोत?
समाज कोणत्या दिशेने जात आहे हे पहायचे तर ठराविक कालावधीनंतर त्याच्या वाटचालीची तपासणी करायला लागते. त्याचे साधन संख्याशास्त्र आहे.आणि ते जनगणनेच्या माध्यमातून उपलब्ध आकडेवारीतून मिळते.
२०११ च्या जनगणनेनुसार,(२०२१ची जनगणना झालेली नाही) जैन समाजाची साक्षरता ९४% आहे. त्यात पुरुषांचे प्रमाण ९७% व स्त्रियांचे प्रमाण ९०% आहे.मात्र जैन स्त्रियांचे काम, नोकरी धंदा, करण्याचे प्रमाण केवळ ९% आहे. इतर धार्मिक समुहांपेक्षा शिक्षित महिलांची संख्या जैन समूहात जास्त आहे. मात्र नोकरी धंदा करणाऱ्या जैन पदवीधर शिक्षित महिलांची संख्या खूपच कमी आहे. २०११ च्या जन गणने नुसार जैन महिला- पुरुष यांच्यात, टक्केवारीत, इतर धार्मिक समुहांपेक्षा, शिक्षित पदवीधरांचा वाटा सर्वात जास्त आहे.जो हिरव्या रंगात दाखवला आहे. तो 1 पर्यंत पोचला आहे.मात्र याच आलेखात नोकरी धंदा न करू पाहणाऱ्या महिलांची संख्या ही 1 पर्यंत पोचल्याचे (निळी रेष) म्हणजे जास्तित जास्त दिसते.
समूह निहाय आकडेवारीचा आढावा घेतला व त्याला आलेखिय स्वरूप दिले तर तो खालील आलेखात दर्शवण्यात आलाय. त्यात डाव्या बाजूला 0 -1 प्रमाण दाखवले आहे. 0 म्हणजे संख्येने कमी प्रमाण. आणि 1 म्हणजे जास्तीत जास्त प्रमाण . या आधारे हा ग्राफ बघावा. (Positive corelation for womenआलेख लाईव्ह मिंट मधून साभार)
Work participation rateTable.. from distribution of population by religion drop in article on census no.4 मधून साभार)
बाल संगोपणाच्या सोयीसुविधाविणा वाढणारी शहरे हा एक अडथळा या संबंधात सांगितला जातो. पण ते फारसे खरे नसल्याचे जागतिक बँकेच्या त्री सदस्यीय समितीने स्पष्ट केले आहे.घरातील कामाचा बोजा ,कामाचे विभाजन न करता ही कामे महिलांनीच करायची परंपरा रूढी, यामुळे घरातील कामे, बाल संगोपन, घरातील वृद्धांची सुश्रुषा यातून तिला बाहेर पडू दिले गेले तरच ती नोकरी काम धंदा करू शकेल. प्रगत समाज, महिलांच्या शिक्षणाकडे, स्त्री पुरुष अशा लिंगभेदाच्या दृष्टिकोनातून पहात भेदभाव करत नाहीत.भारतीय धार्मिक समाजातील, शिक्षण आणि नोकरी\व्यवसाय यातील व्यस्त प्रमाण हे भारतीय समाजात असलेल्या पुरुष सत्ताक व्यवहारांचे प्रतिबिंब आहे हेच तर हा ग्राफ जास्त उघडपणे दाखवतोय. बाल संगोपनाची सुविधा महिलांना उपलब्ध करून देणे महत्त्वाचे काम यापुढे करावयास लागणार आहे. तसेच कामाच्या रगाड्यातून तिला मोकळे करायला हवे आणि यासाठी पुरुषांनी स्वतात बदल करावयास हवा.शिक्षणात इतर भारतीय धार्मिक समाजापेक्षा प्रगत असल्याचा एक फायदा म्हणजे महिलांना मोकळा अवकाश निर्माण करून देणे फारसे अवघड जाणार नाही. पुरोगामी पणाला पूरक असणारी शैक्षणिक परिस्थिती आहे,फक्त इच्छा शक्ती हवी.हे झाले तर पुरोगामित्वाचा पुढाकार घेतल्यासारखे होईलच पण अल्पसंख्य असल्याची खंत बाळगण्याचे ही कारण उरणार नाही. याच जनगणनेत एक आकडेवारी अशीही आहे की, २० ते २९ वयोगटात अविवाहित राहिलेल्या जैन स्त्रीयांचे प्रमाण इतर समुहांच्या तुलनेत सर्वात जास्त म्हणजे १९% इतके आहे. या वयोगटातील अविवाहित स्त्रियांची राष्ट्रीय सरासरी मात्र ८.४ %आहे.
महाराष्ट्र, राजस्थान,गुजरात, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांत एकूण जैन लोकसंख्येच्या८६% लोक राहतात. दिल्ली आणि उत्तरप्रदेश यांचा समावेश त्यात केला तर ९४% लोक या भागात राहतात. बहुतांश जैन तीर्थंकर जिथे राहिले, विहार केला, उपदेश केला,त्या बिहार आणि इतर पूर्वेकडील राज्यात जैन लोकसंख्या किती? इथून लोकांनी पश्चिम भारतात स्थलांतर का केले? हे आश्चर्यकारक व विलक्षण स्थलांतर कोणत्या कारणाने झाले आहे ,याला राजकीय अर्थशास्त्राचा काही आधार मिळतो काय हे पाहायला हवे.(खालील तक्ते..pew research and TOI research मधून साभार)
शहरी भागात राहणाऱ्या ८० % लोकसंख्येमुळे काही प्रश्न ही निर्माण झाले आहेत.शहरातील उपवर मुली, खेड्यात वडिलोपार्जित घर असणाऱ्या मुलांबरोबर लग्न करण्यास तयार होत नाहीत. अलीकडील भौतिक सोयी सुविधांनी आणि कष्टहिन व सुखासीन जीवन पद्धतीच्या भुरळीने हे प्रश्न निर्माण झालेत काय याचाही सांगोपांग विचार व्हायला हवा. समाज संख्येने लहान आहे. जाती उपजातीत वाटला गेलेला आहे. जाती उपजातीतच लग्न करण्याची रूढी, विधवा विवाहाकडे बघण्याचा पूर्वग्रह दूषित विचार, बाल दिक्षांचे पेव फुटणे व त्याचे गौरविकरण करणे, पितृसत्ताक पद्धती व त्याचा महिलांच्या नैतिक व सामाजिक स्थानावर झालेला परिणाम, युवकांच्या मानसिक स्थितीवर व्यसनाचे व सुखासीन आयुष्याचे कर्तुत्वहिन अधिराज्य कशामुळे आहे आणि या गोष्टींचा समाजहितावर काय परिणाम होतोय याचा समाजशास्त्रीय व मानसिक अभ्यास होणे गरजेचे आहे.
पूजा, लग्न सोहळे यांचा थाट, व्यापारी आणि उद्योगपती यांची समाजातील संख्या, यावरून समृद्ध अल्पसंख्यांक म्हणुन या समाजाकडे पाहिले जाते. भारताच्या पहिल्या संसदेत ३६ जैन लोकप्रतिनिधी होते. राजकीय इच्छाशक्ती व राजकीय ताकद नसल्यामुळे समाजाचे प्रश्न नीटपणे हाताळता येत नाहीत. हे लक्षात घेऊन२००७ साली आखिल भारतीय जैन महासभा स्थापन झाली पण त्यातूनही फारसे काही निष्पन्न झाले नाही. समाजाला जसे राजकीय व सामाजिक नेते लागतात तसेच किंबहुना त्याहूनही जास्त वैचारिक व बुद्धिवादी नेतृत्व करणारेही लागतात. या दृष्टीने सध्याचा काळ हा हलाखीचा काळ आहे असे म्हणावे लागेल. म्हणजे वैचारिकता केवळ जवळ असून उपयोग नाही, तर वेळोवेळी, विविध प्रसंगी परखडपणे त्याचा उच्चार करीत राहायला हवे.मध्यंतरीच्या काळात एकाचवेळी हा वसा अनेक लोकांनी सांभाळला. आण्णासाहेब लठ्ठे, ए. एन्. उपाध्ये, यांनी पुढाकार घेतला.त्यानंतर विलास संगवे, मंगुडकर,निर्मलकुमार फडकुले, जी. के. पाटील, ऍड. प्रदीप शहा, सुभाषचंद्र अक्कोळे हे व यासारख्यांच्या व्यक्त विचारांनी सुधारणेची जी चळवळ उभी केली त्याला अलीकडच्या काळात खीळ बसली आहे. स्थितिशिल समाजात विचार प्रवर्तनाचे धक्के सतत दिले नाहीत तर रूढी प्रियता वाढते. विचार आणि विवाद यांना अवकाश मिळाला नाही तर कोंडी होते. आणि काय करावे काय करू नये याचे भान राहत नाही. आर्थिक समृद्धी नको तिकडे वाहत राहते.आम्ही उत्सव तेवढे वाजत गाजत साजरे करतो.विचारांचा जागर होत नाही.उत्सवांना विचारापासून तोडल्यामुळे ते पोरके होतात.दिसते ते फक्त नाच गाणी,ढोल ताशे, जेवणावळी आणि गर्दी. त्याने कर्मकांड फोफावते.यात प्रामुख्याने महिला वर्ग बळी पडतो. म्हणजे समाजातील ५०% जनता रूढी परंपरा यात अडकते.अंधश्रद्धा ग्रस्त होते. हे टाळायचे तर जाणीवपूर्वक तिच्यावरचे घर कामाचे ओझे कमीत कमी करून तिला बाहेर पडू दिले पाहिजे.
एक समाज म्हणून देश विदेशातील निर निराळ्या समाजात हर घडी घडणाऱ्या घटनाविषयी आपली भुमिका काय याचा पत्ताच लागत नाही. अलीकडील विशिष्ठ कालखंडात (गेल्या दहा एक वर्षात) ध्रुवीकरणाचे प्रयत्न मग ते समाजाच्या पातळीवरचे असोत की विचार सरणीच्या पातळी वरचे असोत खूप जोमाने आणि ठराविक उद्देशाने होत आहेत.ध्रुवीकरण हे फक्त विचारांच्या पातळीवर रहात नाही.ते व्यक्तीच्या मनात झिरपत झिरपत त्याच्या बोलण्या वागण्यात , विचार करण्याच्या पद्धतीत आणि प्रत्यक्ष व्यवहाराच्या सवयी मध्ये कधी घुसले हे समजत नाही. युवा वर्गात हे ध्रुवीकरण झटकन पसरते कारण ते चटकदार, चमकणारे,आटोपशीर केलेले असते.हा युवकांना मानवणारा आचार विचारांचा पट लगेच आत्मसात केला जातो कारण तो आकर्षक असतो. आपल्या युवकांना अशाच प्रकारच्या चटकदार विचारांच्या पखाली जाणीवपूर्वक कोणीतरी पुरवत नाही ना हे पाहायला हवे.याला युवक बळी पडणार नाहीत अशी व्यूह रचनाही करायला हवी.ती दोन्ही पातळीवर...विचारांच्या आणि आचारांच्या ( व्यवहारातील सवयींचा पातळीवरही.) कर्मकांडाच्या नादी या समाजाला परत एकदा लावायचे नसेल तर 'वॉचडॉग' ची भुमिका पार पाडावी लागेल.
देशात घडणाऱ्या महत्त्वाच्या कोणत्याही घटनेबद्दल राजकारण विरहित अशी जाहीर भूमिका घेत राहायला हवे, तरच समाज म्हणून काही एक सामाजिक स्थान निर्माण करता येईल. त्याचा उपयोग नंतरच्या काळात व्यवस्थेवर दबावा सारखा करता येईल. मात्र त्याची पायाभरणी आज करावी लागेल. १.राजकारणातील गलिच्छ भाषा २. वेगवेगळ्या चळवळी व आंदोलने ३. महिलांवरील अत्याचार ४. देशातील शिक्षणाचा स्तर ५. संविधाना बद्दल ची भूमिका ६. व्यवस्थेकडून घडत असलेल्या अत्याचारांचा उहापोह ७.समाजा समाजातील धाग्यांचा पूल. या व अशा सद्यस्थितीत आपल्यासमोर उभे ठाकलेल्या प्रश्नावर आधारित,भगवान महावीर व्याख्यानमाला आयोजित करायला हवी. यासाठी देशातील प्रख्यात विचारवंतांना बोलावले गेले पाहिजे.( उदा. रामचंद्र गुहा, जावेद अख्तर, गणेश देवी, संजय नहार, योगेंद्र यादव, पी. साईनाथ, प्रताप भानू मेहता, रविश कुमार, सुनिता नारायण,राजेंद्र सिंह )या सारख्या उपक्रमातून समाजाला 'व्हॉईस' मिळेल.वक्त्यांचे थेट जीवनाला भिडणारे विचार, त्यांची जीवनदृष्टी,विचार व्यूह आणि जीवन निष्ठा यांनी विचार विश्व ढवळून निघायला हवे.
आज अशी परिस्थिती आहे की समाजाला 'व्हॉईसच' नाही. अधिकृत भूमिका नसणे वा त्याची वाच्यता न करणे यामुळेच आज आपण अडगळीत पडलेलो आहोत. कृती पासून दूर राहणे हा आपला दोष आहे.आपल्याला संकटात पडायला नकोय. झंझट नकोय. वादा पासून चार हात दूर राहणेच आपण पसंत करतो. कशाला? आपला काय संबंध? ही घातक वृत्ती आपण जोपासतो. ...आपण असे का आहोत? ...याला 'व्हॅल्यू नुट्रल' असे संबोधले जाते. पण त्यामुळे सामाजिक विकृतीला मोठा अवकाश प्राप्त होतो. म्हणून आपलं समाजकारण आपण जास्त सजगतेने करायला हवे. कारण संपूर्ण देशातील एकूण जैन लोकसंखेच्या ३२% जैन महाराष्ट्रात राहतात. सुधारणेच्या चळवळीला महाराष्ट्रातून सूरूवात नाही करायची तर कुठून?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा