आदर्श व्यक्तिंची
नावे द्या.
स्थानिक
स्वराज्य संस्थांनी केलेली बांधकामे ही जनतेने भरलेल्या कररूपी पैशातून ऊभी केली
जातात. अशा बांधकामांना काहीतरी नाव देण्याचा प्रघात आहे. ही नावे देताना त्या
नगराच्या मुळ स्थापनेत – ऊभारणीत दूरदृष्टी दाखविलेल्या कतृत्ववानांचे नाव द्यावे अशी प्रथा
आहे.यामुळे त्या व्यक्तिचे नाव ,त्याचे कतृत्व, विचारांचा वारसा यांना उजाळा
मिळतो.तरूणांसमोर आदर्शांचे एक तरी चित्र ऊभे रहावे असा वास्तूंना नाव देणयामागचा
शुद्ध हेतू असतो, किमान तसा तो असावा.
अलिकडे अशा
बांधकामांना नावे देताना स्वतःच्या गटा-तटातील एखाद्याचे नाव दिले जाते. शासनातील
एखाद्या मंत्र्याचे किंवा स्थानिक
स्वराज्य संस्थेत ज्याची सत्ता आहे त्या पक्षाच्या ‘वजनदार’ व्यक्तिचे नाव अट्टाहासाने दिले जात आहे. गावाने विरोध केला, इतर सर्व
पक्षांनी मिळून नापसंती दर्शविली तरी
आपलाच हेका खरा ठरवून मुद्दाम तेच नाव दिले जाते.एखाद्या मंत्र्याने बांधकामासाठी
निधी मंजूर केला की त्याचे नाव देण्याचा अव्यापारेषू व्यापार केला जात आहे. मंत्र्याने
काही स्वतःच्या खिशातून पैशे दिलेले नसतात.जनतेने भरलेल्या करातूनच हे पैसे दिलेले
असतात.त्यामुळे अशा मंत्र्यांचे आभार जरूर मानावेत पण त्यांची हुजरेगिरी करणे वा
त्यांचे मिंधे होण्याचे अजिबात कारण नाही. विस्मृतीत जाऊ पाहणाऱया शाहू महाराज,
विठ्ठल रामजी शिंदे,महर्षी कर्वे, कर्मवीर भाउराव पाटील, बाबा आमटे अशा कतृत्ववान
माणसांची नावे सार्वजनिक बांधकामांना द्यावीत, जेणेकरून राजकारण्यांच्या बजबजपूरीत
काही आदर्शांची नावे नजरेसमोरतरी राहतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा