बुधवार, ऑक्टोबर ०१, २०२५

अंतरीक्ष पार्श्वनाथ

अंतरीक्ष पार्श्वनाथ गेली ४२ वर्षे, अंतरीक्ष पार्श्वनाथ यांची जी मूर्ती वादामुळे कुलुपबंद होती, ती २० जून २०२३ च्या सर्वोच्य न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे, सर्वाना खुली झाली आहे. दिगंबर आणि श्वेतांबर यांच्यातील वादामुळे ४२ वर्षे हि मूर्ती बंदितावस्थेतच होती. फक्त एका लहानशा खिडकी सदृश्य झरोक्यातून मुख दर्शन घेता येत होते. मालकी बाबतचा अंतिम निर्णय अजून होणार आहे. हा वाद नेमका काय आहे? आणि त्याचा घटनाक्रम कसा विकसित होत गेला, हे पाहण्यासाठी जेंव्हा आपण शोध घ्यायला सुरुवात करतो, तेव्हा बऱ्याच अंशी, प्रचारकी थाटाची एकांगी माहितीच समोर येते. संपन्न वारसा असूनही, दिगंबर अजूनही कसे झगडत आहेत, तेच यावरून दिसून येते. या लेखात आपण जाणीव पूर्वक दुर्लक्षिलेली वा बाजूला सारलेली, इतिहास व पुरातत्व खाते व शासकीय गॅझेट यातील माहितीपूर्ण नोंदीही पाहणार आहोत. पण हे करत असताना हि परिस्थिती, इतिहास व वारसा या अतिशय महत्वाच्या गोष्टीकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष हि नमूद करते. सोबत दाखवलेल्या याच मंदिरात (चित्र १.) इतर मुर्त्यांसहित वादग्रस्त मूर्ती तळघरात विराजमान आहे. यात एकूण १६ वेदी आहेत. पैकी १५ वेदीवर दिगंबर मूर्ती विराजमान आहेत. आणि एका मुख्य मूर्तीबाबत वाद आहेत. तीच अंतरीक्ष पार्श्वनाथ यांची मूर्ती. थोडक्यात एका वेदिवरील भगवान पार्श्वनाथांच्या मूर्तीबाबत वाद चालू आहे. उरलेल्या १५ वेदी वरील मूर्ती या निर्विवादपणे दिगंबर संप्रदायाच्या आहेत. बाजूचे छायाचित्र (चित्र २) हे भारतीय पुरातत्व खात्याने १९०२ साली जाहीर केलेल्या शिरपूर शिलालेखाची अधिकृत नोंद आहे. जी स्पष्टपणे असे दर्शवते कि हे मंदिर दिगंबर संप्रदायाचे आहे व ते मंदिर जगसिंम्हा याने बांधले आहे. १९०८ साली इम्पेरीयल गॅझेट ऑफ इंडिया प्रसिध्द केले गेले.(चित्र ३) ज्यात अंतरीक्ष पार्श्वनाथ मंदिर हे दिगंबर संप्रदायाच्या मालकीचे असून वादग्रस्त मूर्ती हि नदी किनारी सापडली होती असे निसंदिग्ध पणे नमूद केले आहे. मूर्ती हलत नव्हती आणि ती जमिनीपासून काही अंतरावर हवेत स्थिरावली होती. हा नमूद पुरावा भारत सरकारने प्रसिध्द केला होता. आणखी एक नोंद भारत सरकारने १९१६ साली प्रसिध्द केली आहे. ‘मध्य प्रांत आणि हैद्राबाद प्रांत यातील शिलालेख’ (चित्र ४) या नावाने प्रसिध्द नोंदी मध्ये सिरपूर मंदिर दिगंबर संप्रदायाचे असल्याचे संस्कृत भाषेतील शिलालेखावरून दिसत असल्याचे परत एकदा नमूद केले गेले आहे. एक गोष्ट समजावून घ्यावी कि हि सगळी कागदपत्रे भारत सरकारने मांडली आहेत. असे सांगतात कि मुघलांच्या आक्रमणा वेळी शिरपूर मधील दिगंबर समुदाय इतरत्र स्थलांतरित झाला. त्यावेळी मराठा सरदाराना विनंती केल्यावरून त्यांनी पोलकर कुटुंबाला पुजारी म्हणून नेमले व मंदिराची मुघल आक्रमकांपासून संरक्षण करण्यास व देखभाल करण्यास सांगितले. मुघलांच्या पराभवा नंतर ब्रिटीश काळात दिगंबर समुदाय परत आपल्या शिरपूर कडे वळले. या काळापर्यंत शिरपूर देवस्थानाची, लोकमाणसातील प्रसिद्धी खुप झाली होती. जमिनी पासून काही अंतरावर असलेली मूर्ती म्हणून अंतरीक्ष पार्श्वनाथ मंदिर पहायला व पूजा अर्चा करण्यास लोक लांब लांबून यायला लागले. त्याच वेळी व्यापाराच्या उद्देशाने गुजरात मधील श्वेतांबर समुदायाचे लोक शिरपूरला आले. हे १९०१ साल होते, ज्यावेळी शिरपूर मधील या मंदिरातील पूजा अर्चा पोलकर समुदायाचे लोक करत होते. एकूण मंदिराचे व्यवस्थापन व पूजा अर्चा याबाबत दिगंबर समुदाय समाधानी नव्हता. पोलकर, हे मंदिर व्यवस्थापन स्वताच्या मालकीचे असल्याच्या थाटात वागत आहेत व मंदिर व परिसर गिळंकृत करण्याच्या मार्गावर आहेत हे लक्षात आल्याने पोलकरांना तिथून हाकलण्याचे प्रयत्न सुरु झाले. याकाळी तिथे नुकत्याच आलेल्या श्वेतांबर लोकांनी मदतीचा हात पुढे केला. दोन्ही जैन समुदाय पोलकर यांच्या विरुध्द १९०१ साली एकत्र आले . आता मंदिराचे व्यवस्थापन दिगंबर व श्वेतांबर यांच्याकडे सामुदाईकपणे आले.(Excerpts from the case Manikchand s/o Pratapmal Baj & another v/s Sakarchand s/o Premchand Gujarathi & others) श्वेतांबरांनी केलेल्या मदतीचा दुष्परिणाम लवकरच दिसून येवू लागला. त्यांनी त्यांच्या पूजाविधी व पद्धतीनुसार मुख्य मूर्तीची उपासना करायला सुरुवात केली. दिगंबर समुदाय मूर्तीची पूजा हि वीतराग पद्धतीत करते. श्वेतांबर समुदाय वीतराग मूर्तीवर आभूषणे व अलंकार चढवून पूजा करतात.(चित्र ५) या भिन्न उपासना पद्धतीमुळे गोधळ सुरु झाला. यावर उपाय म्हणून १९०५ साली दोन्ही समुदायात एक बैठक झाली. त्यात दोनही समुदाय, अंतरीक्ष पार्श्वनाथ मुख्य मूर्तीची पूजा अर्चा, ठरवून दिलेल्या वेळा पत्रक नुसार (चित्र ६) करतील, असे ठरले. हि सर्वमान्य व्यवस्था १९०८ पर्यंत सुरु राहिली. १९०८ साली श्वेताम्बरांच्या प्रथेप्रमाणे मूर्तीवर नवीन लेप लावला गेला. कल्यानचंद लालचंद येवलकर या श्वेतांबरी अनुयायाकडे यासंबंधीची लेप करणाची जबाबदारी दिली गेली. असा आरोप केला जातो की, कल्यानचंद यांच्या मार्गदर्शनात ज्या कलाकाराने प्लास्टर चा लेप दिला त्याने अनधिकृत बदल केले व जास्तीचे, पूर्वी नसलेले घटक मूर्तीवर चढवले. हे सगळे जाणीवपूर्वक, मूर्ती श्वेतांबर समूहाची आहे हे सिध्द करण्याच्या हेतूने केले गेले. लेप केल्याने मूर्तीचे आयुष्य वाढते हे खरे असले तरी त्यामुळे मूर्तीच्या दृश्य परिमाणात फरक पडतो, हे इथे लक्षात घ्यायला हवे. (चित्र ५ दोन्ही मूर्ती बाबतच्या त्या त्या समुदायाच्या धारणा समजून घ्यायला मदत करते.) दिगंबर पूर्ण नग्न मूर्तीची उपासना करतात आणि श्वेताम्बरांच्या मूर्तीवर कडदोरा-कटिसूत्र व काचोटा-वस्त्र असते. कडदोरा,कटिसूत्र व काचोटा हे, मूर्ती वस्त्र सहित आहे व म्हणून ती श्वेतांबर समूहाची आहे हे दर्शवतात. ज्या कलाकारांनी अंतरीक्ष पार्श्वनाथ मूर्तीवर लेप लावण्याची प्रक्रिया केली त्यांनी हे बदल मूर्तीच्या कमरेवर कडदोरा व मूर्ती ज्या वेदीवर बसवली आहे त्या वेदीवर किंवा ज्या बैठकीवर बसवली आहे त्या बैठकीवर तीन रेषांच्या माध्यमातून वस्त्र दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या मूळ मूर्तीत केलेल्या बदलाच्या कारणामुळे दिगंबर समुदायाने मूर्तीची उपासना पूजा विधी करण्यास नकार दिला. कारण दिगंबर पूर्ण नग्न मूर्तीचे उपासक आहेत. वादाचे मूळ कारण हे आहे. १९१० साली श्वेतांबरांनी हरकचंद गुलाबचंद आणि इतर यांच्या नावे कोर्टात दावा दाखल करून पूर्ण अंतरीक्श पार्श्वनाथ मंदिर हे फक्त श्वेतांबर समुदायाचे आहे असे जाहीर करावे अशी मागणी केली. हा वाद त्यावेळच्या ब्रिटीश कारकिर्दीतील प्रीव्ही कौन्सिल मध्ये म्हणजे सर्वोच्य न्यायालयात गेला. दोन्ही समुदायांनी आपापसात सुसंवादी संबंध ठेवावेत व १९०५ सालच्या सर्वमान्य वेळापत्रका प्रमाणे(चित्र ६) पूजा अर्चा चालू ठेवावी असे प्रीव्ही कौन्सिल सांगितले. ही व्यवस्था १९५९ पर्यंत सुरु राहिली. आणि त्यानंतर एके दिवशी संप्रदायातील वादाचे अतिशय विकृत रूप समोर आले आणि जैन समुदायाला त्याला सामोरे जावे लागले. इथे हे नमूद करणे गरजेचे आहे कि पूर्वी श्वेतांबरांनी असा दावा केला होता कि, अंतरीक्ष पार्श्वनाथांची मुख्य मूर्ती हि दगडा पासून बनलेली नाही तर ती वाळू आणि ईतरपदार्थांपासून बनली आहे. दिगंबर मात्र सुरुवातीपासून, हि मुख्य मूर्ती दगडाची बनलेली आहे व वाळू आणि ईतरपदार्थांपासून बनलेली मूर्ती दिगंबर संप्रदायात उपासनेसाठी वापरली जात नाही, या म्हणण्यावर ठाम होते. १९५९ साली निवृत्त सत्र न्यायाधिश्यांच्या देखरेखीखाली व दोन्ही समूहांच्या दोन निरीक्षकांच्या सहित मूर्तीवर नवीन लेप चढवण्यापूर्वी आधीचा लेप काढण्यची प्रक्रिया सुरु झाली. एका ठराविक टप्प्यावर श्वेतांबरांनी जुना लेप काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे व आता नव्या लेपाची प्रक्रिया सुरु होईल असे जाहीर केले. दिगंबर मात्र, मूर्तीचे खरे मूळ स्वरूप उघड होईपर्यंत लेप काढण्याची प्रक्रिया पुढे चालू ठेवावी या मतावर आग्रही होते. श्वेतांबर म्हणतात तसे, मूर्ती वाळू वईतर पदार्थांपासून बनली नसून, पाषाणातून दिगंबर अवस्थेत कोरली गेलेली आहे, असे आग्रही प्रतिपादन दिगंबरांनी केले. या जुना लेप काढण्याच्या प्रक्रिये नंतरच्या समोर आलेल्या परिस्थितीने विकृत स्वरूप प्राप्त झाले. श्वेतांबर समूहाने भाड्याचे गुंड जमवून, मंदिराच्या परिसरात दिगंबरांनी प्रवेश करू नये म्हणून, त्यांना मारहाण केली (चित्र ७) व धमकावले असे आरोप दिगंबरांनी केले. या परिस्थितीत शासनाने हस्तक्षेप केला व मुर्तिभोवती जाळीचा पिंजरा उभा केला... देवतेला स्वताच्या अनुयायापासून वाचवण्यासाठी. ‘सत्यदर्शन’ नावाची एक पुस्तिका दिगंबरांकडून प्रकाशित करण्यात आली. त्यात गर्भवती महिलानाही मारहाण झाल्याची छायाचित्रे व जमिनीवरील रक्ताच्या डागाची छायाचित्रे दाखवली गेली. मुख्य मूर्ती तळघरात विराजमान आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी एकच चिंचोळे प्रवेश द्वार आहे. या प्रकारच्या अनागोंदी व गोंधळामुळे चेंगराचेंगरी व पळापळ घडून आली ज्यात अनेक स्थानिक मराठी दिगंबर जैन जखमी झाले. त्यानुसार गुन्ह्यासंबंधीच्या कायद्याच्या कलम १४५ अनुसार प्रक्रिया चालू करण्यात आली. त्यानंतर कायदेशीर लढाई चालू राहिली आणि मूर्ती कुलुपबंद केली गेली. चित्र८ एकदा प्रभावी श्वेतांबर मुनी कानजी स्वामी (चित्र ८) यांनी मंदिराला भेट दिली. श्वेतांबर धारणेमध्ये ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर तीर्थंकर सिंहासनावर बसतात, अंतरिक्षात रहात नाहीत तर दिगंबर धारणेत ज्ञान प्राप्तीनंतर, तीर्थंकर सिंहासनाला स्पर्श करत नाहीत तर ते सिंहासनापासून काही अंतर अंतराळात राहून संबोधन करतात. मूर्तीचे निरीक्षण केल्यानंतर, या व इतर धारणेप्रमाणे, त्यांनीही मूर्ती दिगंबर समुदायाची असल्याचे मान्य केले, त्याची मुद्रित ध्वनिफीत आहे असे सांगितले जाते. पण आता ते मुनीही अस्तित्वात नाहीत. २२ फेब्रुवारी २०२३ रोजी भारताच्या सर्वोच्य न्यायालयाने आपला अंतरिम आदेश दिला, ज्यानुसार, श्वेतांबर, मूर्तीवर लेप लावू शकतात आणि दोन्ही समुदाय त्यांच्या त्यांच्या उपासना पद्धतीनुसार पूजा अर्चा करू शकतात. हा अंतिम निकाल नव्हे. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी जी व्यवस्था कायम होती तीच पुढे चालू ठेवायची, या १९९१ च्या धार्मिक स्थानाबाबतच्या कलमानुसार दिलेला अंतरिम आदेश आहे. अंतिम लेप दिल्यानंतर मूर्ती कशी दिसते ते (चित्र ९) शेजारी दाखवले आहे. या काळात गेल्या वर्षभरात अनेक वादावादीचे प्रकार घडले. एकमेकाला मंदिरात जाण्यापासून रोखण्याचे प्रकारहि झाले. काही घटना मध्ये श्वेतांबर उपासक जखमी झाल्याच्या घटनेचे अतिरंजित वर्णन केले गेले. दिगंबर समूहाने शांततापूर्ण आंदोलने केल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या. मूर्ती चे मूळ स्वरूप हा परत एकदा दोन्ही पंथामधील प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. श्वेतांबर पंथातील काहींनी एक निवेदन जाहिरात (चित्र १०) प्रसिध्द केली आहे. त्यात जो कोणी, श्वेतांबर रिती रिवाज पाळायला तयार असेल व शिरपूर मध्ये राहायला तयार असेल, त्याने अर्ज करावा असे आवाहन केले आहे. त्यास एक फ्लॅट व १० लाख रुपये बक्षीस म्हणून दिले जातील. तसेच एक वर्षाचा सगळा खर्च हि करण्याचे आमिष दाखवले आहे. याला त्यांनी तीर्थ रक्षा असे नाव दिले आहे. त्याचे छायाचित्र दाखवले आहे.(चित्र १०) सकृत दर्शनी हि जाहिरात एक दयाळू योजनेचा भाग वाटते. शिरपूर मधील मोठया संख्येने असलेल्या दिगंबर लोकसंख्येला उत्तर म्हणून अशा प्रकारे श्वेतांबर लोकसंख्या वाढवण्याचा हा प्रकार वाटतो. यावेळी शिरपूर व आजूबाजूच्या परीसरा मधूनही श्वेतांबरांना विरोध होतो आहे. कारण, आता १९५९ साली दिगंबर लोकांवर झालेल्या हल्यासारखे हल्ले सहन करण्याच्या पलीकडे दिगंबर पोचल्याचे बोललेजाते.. ‘सर्वांनी सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा,’ असे श्वेतांबर म्हणत आहेत. कोणीच सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयाचा अनादर करणार नाहीत. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. सगळ्या शासकीय आणि पुरातत्व खात्याची कागदपत्रे व नोंदी या दिगंबरांच्या म्हणण्याचे समर्थन करणाऱ्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिमनिकाला नंतर शिरपूरचे मंदिर जेव्हा परत उघडले गेले तेव्हाही मंदिरातील खांब (चित्र ११) इतिहासाची मूळ कहाणीच सांगत उभे असल्याचे दिसते. काही समाज माध्यामि, ‘मंदिर दिगंबर आहे हे दर्शवण्यासाठी इतर सर्व १५ वेदि या नंतर निर्माण केल्या आहेत व इतर ठिकाणाहून मूर्ती आणून त्या या ठिकाणी बसवल्या आहेत’, असे सांगतात. भारत सरकारच्या अधिकारात एपिग्राफिक इडिया ने १९०७-१९०८ साली कागदपत्रे (चित्र १२) प्रसिध्द केली आहेत. त्यात शिरपूर जैन मंदिर हे दिगंबर जैन मंदिर असल्याचे स्पष्ट म्हंटले आहे. जेव्हा संपूर्ण मंदिरच दिगंबर मंदिर आहे तर मग त्यात एकच मूर्ती श्वेतांबर कशी असा प्रश्न निर्माण होतो. मंदिर, दिगंबर पंथीय आहे हा इतिहास दर्शवणारे, भारतीय पुरातत्व खात्याने प्रसिध्द केलेली आणखी दोन कागपत्रे (चित्र १३ आणि १४) व त्यातील नोंदी. क्रमवारघटना व त्यांची तपशीलवार माहितीसर्वांना व्हावी म्हणून......छायाचित्रे माहिती इंन्क्रेडीबल जैनिझम वरून पूर्वसंमतीने साभार. अधिक माहिती व विश्लेषणासाठीपहा......https://incrediblejainism.com/blogs/f/antariksh-parshwanath-dark-side-of-sectarian-war

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ

ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ सगळ्याच तीर्थंकरांचा उपदेश एकसारखाच असेल का...