बुधवार, सप्टेंबर ०६, २०१७

आरक्षणाच्या कुबड्या

 

                                   आरक्षणाच्या कुबड्या

प्रमोशनमधील राखीव जागांच्या संदर्भात, आरक्षणाचा मुळातूनच वेगळ्या दृष्टीकोणातून विचार होणे गरजेचे आहे. वर्षानुवर्षे ज्या जाती जमाती उच्च वर्गीयांनी पिळवणूक केल्यामुळे किंवा इतर कारणांनी मागास राहिल्या त्यांना देशाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतूने स्वातंत्र्यानंतरच्या काळात नोकऱ्यांमध्ये राखीवजागा बहाल करण्यात आल्या. सुरूवातीला दहा वर्षांसाठी ही योजना सुरू राहणार होती. त्यानंतर क्रमाक्रमाने या राखीव जागांची बहाली काढून घेण्यात यावी अशी योजना होती. म्हणजे समाजातील विविध घटकांमध्ये भेदभाव, ऊच्चनिच असा फरक राहणार नाही, एकमेकाबद्दल दुःस्वास वाटणार नाही, अठरा पगड जाती-जमाती, धर्म, वंश यात विभागलेला सगळाच समाज एकसंध राहील. सर्वांना कामाच्या समान संधी मिळतील व केवळ प्राविण्याच्या जोरावर संधी देऊन नोकरी व्यवसायामध्ये,प्रगतीची दारे सर्वांनाच खुली होतील. समाजाची सर्वांगीन प्रगती होईल. राखीव जागांच्या कुबड्या वापरून कोणताच समाज फार काळ स्पर्धेच्या युगात तग धरू शकणार नाही,प्रगती करू शकणार नाही.एखादी सवलतीची योजना सदासर्वकाळ सुरू ठेवली तर नंतर नंतर समाजांना ती योजना म्हणजे त्यांचा हक्कच वाटण्याची भिती निर्माण होते, एकाला दिलेली सवलत हे दुसऱ्याला दिलेलं आव्हान असतं, याची जाणीव दृष्ट्या नेत्यांना होती. त्याचा विचार करूनच राखीव जागांची दिलेली सवलत काही मर्यादित काळासाठी ठेवली होती, सार्वकालीक नव्हे.

      पण जे घडू नये तेच घडत गेले. नेत्यांचे दृष्ट्येपण कमी कमी होत गेले. सामाजिक भविष्याचा वेध घेणे बाजूला पडले व तत्कालीन  राजकारणातील मतदारसंघीय लाभच विचारात घेतले गेले. स्वताःच्या स्वार्थासाठी नेत्यांनी आणि त्यांना साथ देणाऱ्या इतरांनी मागास जाती जमातींचं कायमंचं नुकसान करून ठेवले. कुबड्या काढून घेईपर्यंत, स्वतःच्या पायावर ऊभे राहण्याचे सामर्थ्य त्या त्या समाजात असते, ते ऊदयास येत नाही. आणि कोणाच्यातरी दयेवर सामाजिक जगणं सुरू राहतं. यामुळे माणूस सवयींचा गुलाम होतो आणि ती नकळत लावलेली सवयच आपला हक्क आहे ही समजूत निर्माण होते. या समजूतीतूनच कुबड्या काढूनही आपल्याला वाटचाल करता येईल  हे विसरायला होतं आणि मग कायमंचं अपंगत्व माथी येतं. याला  जबाबदार नकळत  लावलेली व लावून घेतलेली सवय असते  हे समजेपर्यंत जग खुपच पुढे गेलेलं असते आणि आपण मात्र अजूनही कुबड्या घेउनच चालतो आहोत याचं वैषम्य वाटायला लागतं,पण व्हायचा तो ऊशीर झालेलाच असतो....

मागास समाजांना कायमंचं मागास (दुसऱ्यांवर अवलंबून) ठेवण्याचं षडयंत्र बेमालूमपणे रूजवलं जातेय ते ओळखायला हवं..  आता वेळ आलेली आहे स्वतःहूनच कुबड्या फेकून देउन स्वसामर्थ्यावर आम्ही वाटचाल करू शकतो हे दाखवून देण्याची.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ

ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ सगळ्याच तीर्थंकरांचा उपदेश एकसारखाच असेल का...