समाजनेता
प्रगतीचा अंक वाचला. सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या कार्य कर्तृत्वाचा आलेख सुरेखपणे त्यात उधृत झाला आहे. अलीकडे समाजांचा विकासआणि प्रगति कशी साकार होत जाते या संबंधी थोडा धांडोळा घेत होतो.त्यात हा अंक समोर आला. आणि एका अर्थाने कर्मठ, आपल्याच कोषात राहणाऱ्या, पूर्व सुरीनी सांगितलेल्या मार्गानेच चालणाऱ्या , रुढीप्रिय, परंपरेचे ओझे खांद्यावर सांभाळत चालणाऱ्या, तर्क,आचार विचार यांना प्रागतिकतेचा फारसा स्पर्श होऊ न देणाऱ्या समाजाला खऱ्या अर्थाने खंबीर नेतृत्वाची गरज असताना त्या समाजाला रावसाहेब पाटील यांच्या सारखे नेतृत्व योग्य वेळी मिळाले हे त्या समाजाचेही भाग्यच असते की काय असा प्रश्न विचारांचे क्षेत्र चाळवू लागला. यातील दोन मुख्य लेख.. एक.. संपादकीय व दुसरा रावसाहेब यांचे स्वतःचे मनोगत हे दोन्ही रावसाहेब यांच्या व्यक्तिमत्त्वाला झळाळी देणारे आहेत.
प्रत्येकवेळी समाजाला मानवेल कि नाही याचा काथ्याकुट करत ठोस अशी प्रागतिक भुमिका घेण्यापासून पळ काढल्याने समाज स्थितिशील बनतो.आणि जी काही थोडीफार सारासार विचारांच्या जिवंतपणाची धुगधुगी काही लोकांत असते तिलाही ओहोटी लागते.समाज कधीच स्वतःहून परंपरांच्या बेड्या झुगारून देण्याची मानसिकता बाळगत नसतो. त्याला खंबीर नेतृत्वाची साथ आणि त्या नेतृत्वाने निर्माण केलेला प्रागतिकतेचा रेटा समाजमनाला काही अंशी रूढीप्रियतेचे जोखड मानेवरून उतरवायला मदत करतो. हा रेटा नसेल, नेतृत्व भविष्याचा वेध घेणारे नसेल, तर समाजमन भुतकाळातच रममाण होण्यात धन्यता मानत असते.
विकासाची प्रक्रिया ही सामाजिक बदलाची प्रक्रिया असते. बदलत्या आधुनिक काळानुसार आधुनिकतेची आस लागणे स्वाभाविक असते.त्यासाठी संघटन करणेही गरजेचे भासते. आपल्यासमोर आव्हाने काय आहेत व संधी कुठल्या आहेत हे समजून घेऊन विकास साधावा लागतो. ही आव्हाने व संधींचे रूपांतर विकासात करण्यासाठी, विचारांच्या व भौतिक पातळीवर लागणारी साधनसामग्री एखादा समाज किती परिणामकारकपणे सुनियोजित करतो यावर त्या समाजाचे आधुनिकीकरण कसे होते हे अवलंबून असते. नव्या विचाराला कल्पनेला आणि त्याच्या व्यवहारातील वापराला व त्याचे सवयीत रूपांतर होण्याला नेहमीप्रमाणे विरोध होतो .
विकास म्हणजे आर्थिक विकास अशी धारणा समाजात रूढ असते. पण खरे तर हा विकास राजकीय,सामाजिक,आर्थिक, वैचारिक व तंत्रज्ञान या क्षेत्रात समाजाची गती किती यावर मोजायला हवा. समाजात भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्या आणि त्याच्या निराकरणासाठी स्वतंत्र हॉस्पिटल, शिक्षण संस्था, शासकीय तसेच इतर कामासाठी लागणारी माहिती तंत्रज्ञानात मदत करणारी IT संस्था, धार्मिक व्यवस्थेतील हिन ते काढून टाकण्याची व ते नेमके कोणते, हे ठरवण्याची व्यवस्था, याची कोणती सोय केली आहे हेही पाहाणे महत्त्वाचे ठरते. बाहेरच्या जगातील आव्हाणांचे संधीत रूपांतर करून युवकांना त्याची दारे खुली करणे याचे कौशल्य नेतृत्वात असेल तर नव्या विचारांची एक पिढी तयार होते.
समाजाच्या वाटचालीत जुन्या धुरिणांनी सुरुवातीच्या काळात निर्माण केलेल्या वाटा हमारस्त्यामध्ये रूपांतरित करण्याचे महत्त्वाचे काम नंतरच्या नेत्यांना करायचे असते. आधीची वाट अधिक स्वच्छ करणे आणि जाणीवपूर्वक त्याचा मार्ग अधिक रुंद करणे म्हणूनच महत्त्वाचे आहे. यासाठी विशेष प्रकारच्या नेतृत्व गुणांची, कौशल्यांची गरज असते. रावसाहेब पाटील यांनी त्यांच्या हयातीत वरील गोष्टींना अनुसरून जेव्हढे शक्य ते केले. ठोस आणि स्वच्छ भूमिका घेणे हे त्यांचे वैशिष्ठ्य होते. त्यांच्या पश्चात त्यांनी दाखवून दिलेल्या वाटेने मार्गक्रमण करणे हे मोठेच आव्हान नव्या अध्यक्षांना श्री भालचंद्र पाटील यांना पेलावे लागणार आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा