बुधवार, डिसेंबर ३१, २०२५

ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ

ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ सगळ्याच तीर्थंकरांचा उपदेश एकसारखाच असेल काय? काळानुरूप समाजात जे प्रश्न निर्माण झाले असतील त्या प्रश्नांच्या अनुषंगाने ऊहापोह करीत त्या प्रश्नावर उपाय सुचवले गेले असतील. लोकांची मानसिकता आणि परिस्थितीचे गांभीर्य पाहून त्यातून बाहेर पडण्याचे दिशा दर्शन केले गेले असेल. त्यामुळे एका तिर्थंकरांचा उपदेश हा त्याआधीच्या वा त्यानंतरच्या तीर्थंकरांच्या उपदेशासारखाच तंतोतंत असेल असे समजण्याचे कारण नाही. मूळ तत्वे तीच राखून कालपरत्वे दोष आणि त्या दोषांचे परिणाम दाखवून देऊन त्यातून वस्तूंच्या स्वभावाचा धर्म सांगितला गेला असेल. हे जर तीर्थंकरांच्या बाबतीत घडत असेल तर त्या नंतरच्या आचार्यांच्या बाबतीतही घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाजाचे गुण,माणसांची वृत्ती, सवयी, कालपरत्वे आचरणात आलेले दोष, आक्रमणे आणि नैसर्गिक आपत्ती या कारणांमुळे माणसाला बदलावे लागतेच. कारण कठीण परिस्थितीत समस्यांशी झुंजत टिकून राहणे हा माणसाचा स्वभाव आहे. त्यामुळे अस्तित्व आणि आपत्ती यांच्या झगड्यात अस्तित्व टिकवण्यासाठी धर्माच्या काही मुलगुणांना मुरड घालने क्रमप्राप्त होते. अशा परिस्थितीचा विचार काळानुरूपच करावा लागतो. त्या त्या काळातील माणसाची बुद्धी, बुद्धीवर विविध कारणांनी चढलेले गंज, आचरणात कारणपरत्वे आलेले शैथिल्य या गोष्टी नजरेसमोर ठेवून ऐकणारा- विचार करणारा -प्रेक्षक -गृहस्थ आणि त्याची मानसिक अवस्था लक्षात घेऊन त्याला उपदेश करणे भाग असते. काळानुरूप ज्या गोष्टी सामान्य गृहस्थाच्या बाबतीत घडतात त्या, त्या काळात कार्यरत असलेल्या उपदेशकाच्या बाबतीतही घडणार हे ओघाने येते . गुरु, उपदेशक, साधू,आचार्य या सर्वांच्याच बाबतीत ही गोष्ट घडत असते. आणि त्याचे प्रतिबिंब त्यांच्या प्रवचनातून, उपदेशातून आणि रचनेतूनही उमटत राहणार. या सगळ्या व्यामिश्र परिस्थितीतून समाजाला बाहेर काढून मूळ धर्माचाराकडे परत आणायचे तर त्यासाठी धर्माचाराची विविध रूपे , मुलगुणात केले गेलेल बदल, तात्विक विचारांच्या मांडणीत झालेले बदल हे सगळे या पार्श्वभूमीवर समजून घेतले पाहिजे. हा भेद समजून घेतला तर वस्तुस्थितीचे यथार्थ दर्शन व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे अधिकच्या संशोधनास चालनाही मिळते. मतभेद असणे ही काही सर्वथा चुकीची गोष्ट नाही. महावीरांच्या नंतर जे अनेक आचार्य झाले त्यांनी, महावीरांचा उपदेश लोकांपर्यंत पोचविण्याचे काम केले. श्रुतज्ञानाच्या माध्यमातून सुरुवातीला एकाकडून दुसऱ्याकडे हे ज्ञानाचे हस्तांतर केले गेले. हे करत असतानाही सगळेच आचार्य काही त्या हस्तांतर प्रक्रियेला असामान्य आणि तंतोतंत करण्याएवढे प्रज्ञावंत असतीलच असे नाही.कारण काळाचा महीमा त्यांनाही लागू होणारच.त्यामुळे पुढच्या पिढीकडे हे ज्ञान हस्तांतरित करताना काही महत्त्वाच्या गोष्टी निसटून गेल्या असतील.काही सांगण्या ऐकण्याच्या प्रक्रियेत चुकीने काही वेगळेच नोंदवले गेले असेल. माणसांचे स्वभाव, त्याच्या मनाची चंचलता, परिस्थितीवश आलेले अवगुण,अभिमान आणि अहंकार,आणि श्रेष्ठत्वाची भावना हे कुणालाही चुकलेले नाही. यातील काही अवगुणांच्या कारणाने लहान सहान बदल घडले नसतीलच असे समजण्याचे कारण नाही. आक्रमणे व कत्तलीच्या घमासानीत दबावाने काही गोष्टी बळजबरी मांडल्या गेल्या असणार हेही मध्ययुगाच्या काळाच्या पार्श्वभूमीवर पहिले तर दिसेल.त्यासाठी कुणाला दोष देऊन किंवा त्याचा दुस्वास करून किंवा व्यक्तिगत व सांप्रदायिक कट्टरता बाळगून, किंवा वाद निर्माण करून काही कळणार नाही. समजून घ्यायचे असेल तर सगळी झापडे बाजूला करून मोकळ्या मनाने घटना, काळ आणि परिस्थिती यांचा मागोवा घ्यावा लागेल. जैन दर्शनात मुनींच्या साठी मुलगुन आणि उत्तर गुण यांचे प्रतिपादन आहे तसेच गृहस्थांसाठीही गुणांचे प्रतिपादन केले आहे. या मुलगुणांचे आचरण साध्य झाले की उत्तर गुणाचे आचरणही सहज साध्य होते. श्रावकांसाठी मुलगुणाची संख्या आठ आहे. 'रत्नाकरंडक श्रावकाचार' यात आचार्य समंतभद्र यांनी या गुणांचे प्रतिपादन खालील प्रकारे केले आहे. ‌ 'मद्यमांसमधुत्यागैः सहाणुवरतपंचकम् । अष्टौ मूलगुणानाहूर्गृहिणां श्रयणोत्तमाः ॥ मद्य, मांस,मध, यांच्या त्यागासहीत पाच अनुव्रतांचे पालन केल्यास त्यांना गृहस्थाचे अष्टमूलगून म्हणतात. पाच अनुव्रतात स्थूल हिंसा,खोटेपणा, चोरी, कुशील, आणि परिग्रह या पाच गोष्टीपासून मुक्त होण्याचे प्रयोजन आहे. श्री जिनसेन आचार्य यांनी जे आदिपुराण लिहिले त्यात, आचार्य समंतभद्र यांनी वर प्रतिपादलेल्या अष्टगुणापासून फारकत घेऊन बदल केला आहे. त्यात जिनसेन यांनी मधुत्याग हटवून त्याठिकाणी द्युतत्याग समाविष्ट केले आहे. पं. आशाधरजी यांनी सागारधर्मामृतमधे मूलगुणांचं वर्णन करतेवेळी जिनसेनाचार्यांचा खालील श्लोक उद्धृत केलाय. हिंसासत्यस्तेयादब्रह्मपरिग्र हाच्च वादरभेदात् । द्यूतान्मांसान्मद्याद्विरतिर्गृहिणोऽष्ट सन्त्यमी मूलगुणाः ॥ जिनसेन यांनी असे का केले हे समजायला मार्ग नाही. तज्ञांच्या मते हा श्लोक आदिपुराणाच्या काही प्रतींमधे आहे आणि काही प्रतींमधे नाही. दक्षिणेत ज्या प्रदेशात या आचार्यांचा निवास होता त्या प्रदेशात द्यूत जास्त प्रमाणात प्रचलित असणार व त्यामुळे समाजाचे होणारे भयंकर नुकसान व व्यसनांधता वाढली असण्याचा संभव आहे. त्यामुळे असा बदल करणे गरजेचे झाले असण्याची शक्यता आहे. मधुत्याग तसेच ठेवून जास्तीचे द्यूत त्याग वाढवल्याने आठ या संख्येस बाधा येऊ नये म्हणून मधू त्यागाला वगळावे लागले अशीही शक्यता आहे. किंवा काही आणखीही कारण असेल. इतर कोणत्याही प्रधानआचार्यांनी अष्ट मुलगुन यांचे प्रतिपादन करताना मधू त्याग वगळलेले दिसत नाही किंवा द्यूत त्यागाचा समाविष्ट मुलगुन यात केल्याचे दिसत नाही. 'यशस्तिलक' चे कर्ते श्री सोमदेवसूरी हे, तीन मुलगून- मद्य, मांस, मध यांचा त्याग- असलेले समंतभद्र यांचे प्रतिपादन स्वीकारतात. मात्र त्याच वेळी समंतभद्र यांच्या पाच अनुव्रतांना श्री सोमदेवसूरि मूळ गुण मानत नाहीत, स्वीकारत नाहीत. त्याऐवजी पाच औदुंबर फळांचा समावेश त्या ठिकाणी करतात. आणि लिहितात की आगमात या प्रमाणे गृहस्थाचे आठ मुलगुन सांगितले आहेत. " मद्यमांसमधुत्यागाः सहोदुम्बरपंचकैः । अष्टावेते गृहस्थानामुक्ता मूलगुणाः श्रुते ॥ 'पंचाध्यायी' चे कर्ते आचार्य यांचीही हिच भूमिका आहे. या आठ मूलगूणांशिवाय श्रावक होता येत नाही असे त्यांनी म्हटले आहे. मद्यमांसमधुत्यागी त्यक्तोदुम्बर पंचकः । नामतः श्रावकः क्षान्तो नान्यथापि तथा गृही ॥ २-७२६ ॥ P 'पुरुषार्थसिद्ध्युपाय' चे कर्ते श्री अमृतचंद्रसुरि हे ही या मताला पोषक आहेत. पण त्यांनी अहिंसा व्रताचा उल्लेख करताना याचे प्रतिपादन केलेले आहे, त्याला मुलगुन अशी संज्ञा दिली नाही. या आठ गोष्टींचा त्याग केल्यानेच शुद्ध बुद्धी लोक जीनधर्म पाळण्यास पात्र असतील असे म्हटले आहे. मद्यं मांसं क्षौद्रं पंचोदुम्बरफलानि यत्नेन । हिंसाव्युपरतकामैर्मो क्तव्यानि प्रथममेव ॥ ६१ ॥ अष्टावनिष्टदुस्तरदुरितायतनान्यमूनि परिवर्ज्य I जिनधर्मदेशनाया भवंति पात्राणि शुद्धधियः ॥ ७४ ॥ वरील तिन्ही ग्रंथांच्या मधील जी अवतरणे दिली आहेत त्यातून हे स्पष्ट होते की या आचार्यांनी 'पाच अनुव्रत' च्या ठिकाणी 'पाच उंबरिय फळांचा त्याग' असे म्हटले आहे. त्यामुळे या आचार्यांचे प्रतिपादन समंतभद्र आणि जिनसेन यांच्या भूमिकेपेक्षा वेगळे आहे हे जाणवते. पाच अनुव्रतांचा भाव आणि पाच औदुंबर फळांच्या त्यागाचा भाव याची मुल्यांच्या दृष्टिकोनातून तुलना होऊच शकत नाही. पाच प्रकारच्या औदुंबर फळांचा त्याग हे मांस त्यागाच्या अंतर्गत येतेच.कारण या फळात सहज डोळ्यांना दिसणारे जीव जंतू यांची हालचाल स्पष्ट होते. यांच्या भक्षणात मांस भक्षणाचा दोष आहे. अशा परिस्थितीत मांस त्यागाचे मुलगुन असताना वेगवेगळ्या पाच फळांचे परत वेगळा उल्लेख करण्याने व त्यांना पाच मुलगुणांच्या बरोबरीने मानण्याचे काय प्रयोजन होते हे समजत नाही. पण ही विलक्षण गोष्ट आहे हे नक्की. अशा प्रकाराचा बदल हा काही साधारण बदल नसतो. याचा काही विशेष अर्थ असतो. मात्र यामुळे मुलगुणांचे वजन अतिशय हलके केले गेले हे जाणवत राहते.आणि त्याचवेळी मूलगूणांची व्याप्ती व आवाका वाढल्याचे दिसते. हे करून श्रावक वा जैन गृहस्थ या संज्ञेला पात्र असलेल्यांची संख्याही वाढते. अमूक एक, श्रावक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा हा सोपा मार्ग शोधला गेल्याचे दिसते. वेगवेगळ्या विचारप्रवाहांच्या आणि वादविवादाच्या जमान्यात ज्यावेळी मुळ गृहस्थ धर्माची, श्रावकाची मूलगूणं अडचणीची ठरु लागली असतील, त्यावेळी सगळ्याच लोकांना जैन श्रावक या एकाच झेंड्याखाली एकत्र आणण्याच्या उद्दिष्टाने मुळ मूलगूणांचे स्वरुप बदलणे ही काळाची गरज ठरली असणार. आणि सर्वसाधारण मूलगूणांचे प्रयोजन झाले असेल. व्रती आणि अव्रती या दोघांनीही ही सर्वसाधारण मूलगूणं पाळावीत हा सोपेपणा आणला गेला. 'पंचाध्यायी' मधील खालील पद्यावरुन तरी असेच दिसून येते. " तत्र मूलगुणाश्चाष्टौ गृहिणां व्रतधारिणां । क्वचिदव्रतिनां साक्षात् सर्वसाधारणा इमे ॥ २-७२३ ॥ 'उपासकाचार' चे कर्ते श्री अमितगति आचार्य यांनी मूलगूनात 'रात्री भोजन त्याग' या आणखी एका गुणाचाही समावेश केला आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत..... बंधनं ढिली करुन बौद्ध धर्मासारखे लोकसंख्येने समाज वृद्धी करणे, समाजाची संख्या वाढवणे हा एक उद्देश्य काळानुरुप ठरवून घेतल्या सारखे हे सगळे दिसते. दृष्टी, अपेक्षा,विषय,संख्या आणि तत्वे मांडण्याची पद्धत या सगळ्याच बाबतीत यांच्यात भेद दिसून येतात. त्यामुळे हे सगळे महावीरांच्या वाणीचे प्रतिपादन आहे असे समजणे अतिशयोक्त होईल. त्या त्या काळात आणि प्रदेशात निर्माण झालेले प्रश्न, शिष्यांची बौद्धिक आणि मानसिक प्रकृती व योग्यता नजरेसमोर ठेवून अशाप्रकारचा उपदेश- मांडणी-रचना केली गेली असे समजता येईल. अशा प्रकारचे भेद प्रशस्त- अप्रशस्त , सोपे-अवघड, अल्पकालिन- दूरगामी परिणाम करणारे अशा मुद्द्यांवर वेगळे काढता येतील व त्याची तुलनाही होऊ शकेल. त्याचवेळी या भेदांच्या अनुषंगाने, आचार्यांची वैचारिकता व त्या आचार्यांच्या, तत्कालीन विचारांवर असलेल्या भरवशावरही प्रकाश पडतो. संदर्भ - १.जैन हितैषी. ‌२.रत्नकरंडश्रावकाचार- ६६. ३.श्रावक के मूलगुणोंकी अवधारणा..डॉ.ऋषभचंद्र जैन,वैशाली इन्स्टिट्यूट रिसर्च बुलेटिन.

शनिवार, डिसेंबर २०, २०२५

आहार आणि लोकसमूह

                                                             आहार आणि लोकसमूह

भारतीय संस्कृती ही वेगवेगळ्या समाज समुहांनी मिळून बनलेली आहे. त्या त्या समुहांच्या परंपरा आणि रीती रिवाज यांनी त्याला जटिल बनवले आहे.   त्याची केवळ शाकाहारी समाजसमूह इतकीच ओळख नाही. भारतात प्राचीन काळापासून मांसाहारी आणि शाकाहारी समाज आपापल्या श्रध्दा पाळताना दिसतात. आपली श्रध्दा श्रेष्ठ असल्याची भावना प्रत्येक समाजात बाळगली जाते. त्याला धार्मीक कंगोरे आणि पारंपारिक प्रथा यांचे कोंदण आहे. मात्र या एका पद्धतीच्या समर्थनार्थ आणि दुसऱ्या पद्धतीच्या विरोधी भूमिका घेण्यासंबंधी अलीकडे धार्मिक, राजकीय, सामाजिक स्तरावर  हमरी तुमरीवर येत वादाचे प्रसंग निर्माण केले जात आहेत. विविध समाजात देवादिकांना मांसाचा नैवेद्य दाखवून मग त्याचे भक्षण माणूस करत आला आहे. अनेक शतके काही समाजांच्या आहारातून काही कारणाने  मांस हद्दपार झाल्याचे दिसते,मात्र त्याला धर्म हेच एकमेव कारण आहे असे नाही.

भारतातील साम्राज्यशाह्यांच्या काळात काही कारणाने जमीन वापराचे अधिक्रम बदलत गेले, शेतीची प्रारूपं बदलली, व्यापाराची प्राथमिकता बदलली,आणि अनेक वर्षे दुष्काळ पडल्यामुळे शेतीतील उत्पन्न कमी झाले. आणि भात, तांदूळ व डाळी चे आहारातील प्रमाण कमी कमी होत गेले. खाणे पिणे आणि आहाराच्या सवयीत कालानुरूप आवश्यक बदल झाले.

गंमत म्हणून किंवा खेळ म्हणून प्राण्याची हत्या करणे या कल्पनेकडे ज्यावेळी आपण पाहतो तेंव्हा एक नैतिक असमाधान जागे होते.  पण जेव्हा जेव्हा टेम्पो सारख्या वाहना मधून कोंबड्या उलट्या टांगून नेल्या जात असतात, त्यांचे डोके खाली लोबकळत असते, आणि त्या जिवाच्या आकांताने केकाटत असतात  तेव्हा तेव्हा मांसाहार आणि त्याच्या कायदेशीरपणाच्या प्रश्र्नाशी न झगडता सोडून देणे अवघड होते. त्यांच्या त्या ओरडण्यात असते ती आपण आता मारले जाणार आहोत याची जाणीव . आपले अनमोल जीवन आता संपणार आहे याची जाणीव त्यांना होते आहे.ज्याकडे दुर्लक्ष करणे अवघड जाते. त्यांचे मारलेले कलेवर चीवडताना, त्यावर ताव मारताना हे सगळे विसरता येते?...
....हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. आणि त्याचे निखळ उत्तर देणे अवघड आहे. मानवी समूहाने ज्ञात इतिहासाच्या सुरुवातीपासून प्राण्यांची शिकार अन्नासाठी केली आहे. त्यामुळे  शाकाहाराला ऐतिहासिक नैतिक मूल्य म्हणून मान्य करणे अवघड दिसते. शिकारीचा, खेळ  म्हणूनही विकास झाला आणि त्यातही अनेकांनी महारथ मिळवली. आपल्या शस्त्रांच्या सहाय्याने व त्याचे वर्चस्व सिध्द करण्यासाठी केलेल्या अनेक प्राणिमात्रांच्या खुनाचे मात्र कसलेच समर्थन करता येत नाही. 

फर ची टोपी घालने पाप ठरवले जाते आणि गाई गुरांचे कळप बंदिस्त जागेत कोंडून मांस विक्रीसाठी पाळून  विकले जातात त्याला  उद्योग म्हटले जाते. सिंहाच्या छाव्याला मारणे जास्त दुःखदायक मानतात आणि इतर लुप्त होत असलेल्या प्राणिमात्रांच्या हत्या या तुलनेने कायम दुर्लक्षिल्या जातात.  वाघ वाचवण्याच्या चळवळी चालू केल्या जातात आणि अस्तंगत होत चाललेल्या अनेक बेडकांच्या प्रजातींकडे कानाडोळा केला जातो. उग्र जनावरे मारून खाणे अभिमानाने साजरे केले जाते आणि कुत्र्याचे मांस खाणे रानटी.  

उत्क्रांतीच्या काळात वेळोवेळी  मानवी स्वभावाच्या पसंतीला जे उतरले त्याने प्राधान्यक्रम ठरत गेले आणि त्याच सांस्कृतिक परंपरांचे पालन पुढे घडत गेले असे दिसते. या प्रक्रियेत  आपल्या गरजांना  अनुकूल होतील असे युक्तीवाद जन्माला घातले गेले आणि त्याच वेळी गैरसोयीच्या सत्याकडे साफ दुर्लक्ष केले गेले. या प्रक्रियेतच  कोणाला मारायचे नाही आणि कोणाला मारायचे , कुणाचा वियोग दुःखदायक आणि कुणाची शिकार नियोजनपूर्वक अंमलात आणायची, कुणाला खाणे अभिमानास्पद आणि कुणाचे मांस निषिध्द या सगळ्या प्रश्नांची उत्तरे  सांस्कृतिक दृष्ट्या सोयीने ठरवलि गेली. 

सण, पर्व,उत्सव काळात "मांसाहार  बंदी"च्या चर्चा या जीवनाच्या आदरातून कमी आणि संस्कृती आणि सत्ता या मुद्द्यावर जास्त भर देताना दिसतात. आपल्या जात समूहांना पाठीशी घालायचे व मांस खाणारे "ते" आणि शाकाहारी "आम्ही" अशी विभागणी करायची असा खेळ आहे. सांस्कृतिक शुध्दता दुषित  होऊ नये म्हणून  आणि पावित्र्य राखण्याच्या  नादात या शाकाहार आणि मांसाहार च्या संकल्पना उदयाला आल्या. सांस्कृतिक ओळख ठरवणारे घटक म्हणून हे गरजेचे मानले गेले . वैश्विक माणुसकी च्या दृष्टिकोनातून पाहिले तर याचा पाया खूप भक्कम असल्याचे दिसत नाही.

शाकाहारी असणे हे केवळ शाकाहारी कुटुंबात जन्माला आल्यामुळे वा नव्या आरोग्य चळवळीच्या स्वरूपात असलेल्या श्रद्धेला अनुसरून वा स्वतःच्या वेगळे असण्याच्या गरजेतून निर्माण झालेले तत्व आहे की इतर जिवांच्या जीवन जगण्याच्या मूलभूत अधिकारा बाबत जागृत असण्याची कृतिशील भूमिका म्हणून आहे हे स्पष्ट व्हायला हवे. दुसऱ्याला इजा पोहोचू न देण्याची इच्छा, ही एका जीवना पेक्षा दुसऱ्या जीवनाला कमी किंवा अधिक लेखण्याच्या विरूध्द असलेली भूमिका आहे.  पण मग सगळी अन्न साखळी ही कोणत्या ना कोणत्या जिवानेच संपन्न झाली आहे त्याचे काय करायचे?

“आज शाकाहाराचा जो प्रश्न चर्चेत आहे तो माणुसकीच्या आदर्श तत्त्वावर आधारलेला नसून,आपल्या सध्याच्या चाली रितीचं समर्थन करण्याच्या भावनेतून निर्माण झाला आहे. तो आक्रमक हस्तक्षेप असून, सुसंस्कृत व सभ्य वैचारिक आदर्शाचे रूपांतर, लोक समूहात विभागणीची बिजं निर्माण करणाऱ्या  तीक्ष्ण हत्यारांच्या स्वरूपात करण्यात येत आहे. याची मूळं, दुसरा जो अपवित्र व पावित्र्य नष्ट करणारा मानला गेलाय, त्याचा तिरस्कार करण्यात रुजलेली आहेत.  आम्ही म्हणतो तेच बरोबर व योग्य आहे, ही वृत्ती भेदभाव निर्माण करणारे शास्त्र म्हणून वापरले जाते”,असे काहींचे म्हणने आहे. शुध्दता व पावित्र्य याचे आवाहन हे, मांसाहारामुळे शाकाहारिंचे सांस्कृतिक वातावरण अशुध्द होते, या दाव्यावर आधारलेले आहे.

 अन्न ही संस्कृती-संस्कृती मध्ये द्वेषाचे हत्यार म्हणून धोकादायक ठरणार आहे. भावनेच्या आधारावर वा भावना  दुखावतात म्हणून, मांस विक्री व व्यवहार बंदी करणे, वा करा म्हणणे, म्हणजे दुसऱ्याचे स्वातंत्र्य नाकारण्यासारखे होईल.

घटनेचे कलम १९(१)(g)  नुसार आपली राज्यघटना, व्यापार आणि विक्री चा अधिकार, हा मूलभूत अधिकारात देते. मात्र यातील कलम १९(२)(६)अनुसार माफक बंधणे,ती ही वाजवी व हलक्या प्रमाणात, कायदेशीर रीत्याच घालता येतात. सरसकट बंदी घालता येत नाही. नगराध्यक्ष किंवा महापौर यांनी दिलेले आदेश हे कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश असतात  ते पुरेसे नसतात. तर ते कायद्याच्या चौकटीत असतील तरच ते कायदेशीर ठरतात. अशा बंदीला जरी वैधानिक पदावरील अधिकाऱ्याचा पाठिंबा असला तरी ही बंदी राज्य घटनेतील सुवर्ण त्रिकोणाच्या (कलम १४,१९,२१) कक्षेच्या कसोटीत पाळली गेली असेल तरच ती कायदेशीर मानली जाते. दिलेला आदेश या तिन्ही कलमानुसार वाजवीपनाच्या सर्व घटकांची कसोटी पूर्ण करायला हवा. कारण घटनेने दिलेली समानतेची हमी ही जुलमिपणाच्या विरूध्द दिलेली हमी आहे.या संदर्भात कलम १४ ची कसोटी पार पाडणे महत्त्वाचे आहे.

कलम २१ हे वैयक्तिक निवडीचे स्वातंत्र्य, मूलभूत हक्काने देणारे कलम आहे. त्यामुळे विशिष्ट आहार निवडण्याचे स्वातंत्र्य हे व्यक्तीचं स्वातंत्र्य व व्यक्तीचे स्वायत्तपण जपणारे आहे.

कलम ५१(A)(e) हे सर्व जाती, धर्म,भाषा,प्रांत आणि प्रादेशिक व विभागीय समुदायात परस्पर सामंजस्य ठेवण्याचे मूलभूत कर्तव्य सांगते. 

भारतात अल्पसंख्य असलेल्या वेगवेगळ्या धर्माचे व श्रध्देचे लोकसमुह मोठ्या प्रमाणात राहतात. यातील प्रत्येकाच्या चाली रिती आणि कृतिशील व्यवहार  भिन्न आहेत.  विविध जाती, धर्म आणि भिन्न समाजाकडून, आपल्या श्रध्दा व व्यवहार यांची सक्ती इतरांच्या वर लादल्याने इतर धर्मश्रद्धावर अतिक्रमण केल्यासारखे होईल.त्याने कलम २५ चा सगळा पायाच उद्ध्वस्त होईल. भारतासारख्या विविध जाती, धर्म, श्रद्धा असलेल्या देशात त्याने वेगळेच युद्ध सुरू होण्याचा धोका निर्माण होईल.  

नवरात्रीत किंवा पर्युषण पर्वात काही लोक स्वतःहून मांसाहार वर्ज्य करतात.पण दुसऱ्यांच्या आहारातील मांस बंदीला ते पाठींबा देत नाहीत कारण त्यांना दुसऱ्यांना त्यांच्या अन्नापासून वंचित ठेवायचे नसते. अशा प्रकारच्या वैचारिक कृतिनेच तुमचा समाज, सण आणि धर्म याबद्दल आदर वाढायला मदत होईल. भारतात जिथे ७०% लोक मांसाहार करतात तिथे काही दिवस वा आठवडे सरसकट मांस बंदी करणे हे जनतेत क्षोभ निर्माण करणारी कृती ठरेल.

उत्सव काळात काही अन्नपदार्थावर घातलेली बंदी असो कि विशेष काळात केलेली दारू बंदी असो,किंवा अनुचित वाटणारे माध्यमातील बातमी किंवा म्हणणे असो  अशा प्रकारच्या बंदीने फारसे काहीही चांगले, दिलासादायक उत्साहवर्धक किंवा विधायक झाल्याचे दिसत नाही.याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अनुभव सारखेच आहेत. ते म्हणजे ज्यावर बंदी घातली आहे ते राजरोसपणे भूमिगत होते आणि त्याचा  खप सर्वसामान्य परिस्थितीत असतो त्याहून जास्त वाढतो. त्यामुळे उत्सव काळात वातावरण शांततामय रहावे म्हणून केलेली मांस बंदी किंवा दारू बंदी खरोखरच वातावरण शांततामय ठेवायला मदत करते काय हा प्रश्न निर्माण होतो.

दुकान लवकर बंद करून  विक्रीची वेळ कमी करणे याचा काही फायदा होईल? दुकान ठराविक काळच उघडे राहणार आहे हे कळल्यानंतर लोक जास्तीची खरेदी उघड्या वेळात करतील.... कदाचित जास्तच. आणि हि बंदी विक्रीवर आहे खाण्यापिण्यावर  नाही. 

निर्बंध आणि बंदी यामुळे  ‘कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहील’ आणि ‘स्वच्छता राखली जाईल’? याउपर, ‘भक्तांची सुरक्षितता’ आणि ‘सोय’ कशी काय निर्माण होईल ते देवच जाणोत. 

नेहमीच एका ठिकाणची दारू आणि मांस बंदी ,शेजारच्या दुसऱ्या ठिकाणाहून होणाऱ्या पुरवठ्याच्या काळाबाजारात मुरून जाते.  त्यामुळे उत्सव काळात आहारावरून, राजकिय व कट्टर संघटना, व्यक्ती यांच्या भडक विधानांमुळे आपली डोकी भडकावून न घेता सौहार्दाच्या वातावरणात सण,उत्सव, पर्व साजरे करणे हे प्राचीन भारतीय संस्कृतीला साजेसे ठरेल.             

गुरुवार, डिसेंबर १८, २०२५

हरणारी माणसं आणि जिकणाऱ्या व्यवस्था...आंतरविवाह.

                             हरणारी माणसं आणि जिकणाऱ्या व्यवस्था...आंतरविवाह.


भारतीय लग्न संस्था, ही, इथली समाज व्यवस्था आणि सामाजिक उतरंड , परंपरा आणि रुढी यांच्यावर आधारलेली आहे. अर्थातच अशा रुढीप्रिय व्यवस्थेत आंतरजातीय,आंतरधर्मीय,आणि वेगळ्या आर्थिक स्तरांतील मूला मुलींची लग्ने ( आंतरविवाह) पचायला अवघड जातात. आंतरविवाहाचे कायदे होऊन पन्नास वर्षे झाली तरी अशा जोडप्यांना असमंजस नातेवाईक आणि तथाकथित संस्कृती रक्षक हे भीती घालण्याचा प्रयोग सातत्याने करीत असतात. गेल्या काही वर्षात अशा विवाहांच्या मुळे कुटुंब आणि समाज यांच्या इभ्रतीला काळीमा फासला,याचे कारण उभे करीत ऑनर किलिंग चे  हजाराहून जास्त प्रकार उघडकीस आले आहेत. नवी पिढी सावकाशपणे आपले स्वातंत्र्य घेत आहेत .जुनी पिढी मात्र  जुन्याच विचारांचा आग्रह धरत आहे.
 
शिक्षणाचा प्रसार, मुलींचा शिक्षणातील वाढलेला टक्का,गुणवत्तेतही मुलींची झालेली सरशी,त्यांना नोकरी करण्याची चालून आलेली संधी, त्यानिमित्ताने कार्यालयात जाणे येणे, प्रवास, प्रवासादरम्यान समाजातील विविध घटकात मिसळणे, कार्यालयात सहकाऱ्यांशी मिळून काम करणे या व अशा प्रगतीच्या माध्यमातून मुली स्वतंत्रपने विचार करू बोलू लागल्या. स्वतःची निवड मग ती घरापासून दूर राहण्याची गोष्ट असेल,शहरात एकटीने इतर सहकाऱ्यांच्या बरोबर राहणे असेल,कामाच्या ठिकाणी करावी लागणारी धावपळ, निर्णय घेण्याची क्षमता आणि ते निभावून नेण्यासाठी लागणारी मानसिक तयारी याने आलेला जबाबदारपना व आत्मविश्र्वास याने त्यांचे जीवन उजळून निघते आहे.अनेक नव्या क्षितिजांना हाक घालण्याची तरुणाईची झेप त्यांना खुणावत असते. हे सगळे स्वाभाविक, गरजेचे आणि तरुणाईला साजेसे. यात काही ठिकाणी यश आणि काही ठिकाणी अपयश हे तर ठरलेलेच. जोडीदाराची निवडही स्वतंत्र विचाराने व स्वतःच्या अपेक्षेने करणे हा त्या सगळ्या प्रक्रियेचाच पुढचा भाग.यातही यश अपयश आलेच. मात्र ते इतर सर्व निर्णयात आणि इतरत्रही सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच सहन करावे लागते. आंतरविवाहाच्याच बाबतीत ते होते असे नाही.

भारतिय वैवाहिक जीवनात जोडीदाराने केलेले गैरवर्तन (हिंसा,मारपिट, अपशब्द वापरून अपमानित करणे..इ. ) क्वचितच समाजासमोर येते. कोरोना काळात नोंदवल्या गेलेल्या अशाप्रकारच्या दर दहापैकी सात प्रकरणात शाब्दिक व शारीरिक हिंसेची वारंवारता वाढलेली दिसते. आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह केलेल्या महिलांची परिस्थिती तर त्याहून बिकट. ज्या महिलांनी कुटुंब आणि समाजव्यवस्था यांच्या पारंपारिक बंधनातून मुक्त होत स्वतःच्या वैवाहिक जोडीदाराची निवड स्वतःच केली अशा मुली आणि महिला यांना तर कौटुंबिक हिंसेच्या परिस्थितीत कसलेच पाठबळ शिल्लक राहिलेले नसते. त्या अशाप्रकारच्या कोणत्याही  पाठिंब्याच्या शिवाय  अतिशय एकटेपणा अनुभवत असतात.

नॅशनल  हेल्थ अँड फॅमिली सर्वे नुसार ९८% महिला ज्या लैंगिक हिंसाचाराच्या बळी आहेत त्यांनी कोणतीही वैद्यकीय किंवा कायदेशीर मदत मिळवायचा प्रयत्नही केला नाही असे समोर आले आहे. याचे कारण या संस्थांच्या कार्यपद्धती व अशा गोष्टींकडे पाहण्याची वकील, पोलिस व न्यायालये यांची दृष्टी तारतम्याची व सकारात्मक कमी आणि हिंसाचाराच्या व्याखेतच अडकून बसलेली असे आहे. अशावेळी या हिंसाचाराची व गैरप्रकारांची पहिली बोलणी ही आपल्या आई वडिलांशी केली जाते .यात ज्यांनी कुटुंबाचा विरोध असतानाही स्वतःच्या मनाने  आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय जोडीदार निवडले त्यांच्या बाबतीत कुटुंबाकडून मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक तर नसतोच उलट 'भोग आता आपल्या कर्माची फळे' अशा अप्रत्यक्ष टोमण्यांच्या प्रतिक्रियेचा असतो. अशा स्थितीत आधार मिळवण्याची खटपट अतिशय खडतर बनतेच पण पोलिस यंत्रणेची, तिथला खाक्या आणि पद्धतीविषयी भीती वाटून, त्या लफड्यात पडायला नको वाटते.

'आम्ही तुला सांगितलं होतं' किंवा 'तू निवडलं आहेस आता बघ तुझं तू' अशाप्रकारचं पालुपद मित्र आणि कुटुंबाकडून ऐकवलं जातं. कुणाची मदत मिळवायची, तर पुरूषसत्ताक  समाज आणि तशाच संरक्षक व्यवस्था यांच्यामध्ये पारंपरिक विचारांच्या प्रभावाने काम करणारे  गट आणि स्वयंघोषित संस्कृती संरक्षकांच्या टोळ्या यांनी निर्माण करून ठेवलेला आणि जातीयतेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्ट बघण्याच्या विवेकहिन पद्धतीने जे अवडंबर माजवले आहे त्याने मदत दूरच राहते आणि नको त्या विषयाकडे सगळा झोत वळतो. मूळ प्रश्न आणखी बिकट होतो.आणि मग फक्त लव्ह जिहाद वरच सगळी चर्चा स्थिरावते.

या प्रकारच्या घटना वाढू लागल्यानंतर सरकारने अशा आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहितांची माहिती गोळा करायला परवानगी देणारा कायदा आणला . यात अशा सर्व विवाहित लोकांची वैयक्तिक माहिती, त्यांच्या कुटुंबाची माहिती पत्ते आणि फोन नंबर गोळा करण्याची मुभा शासकीय यंत्रणेला मिळेल आणि त्याचा दुरुपयोगही होईल हे लक्षात घेतले गेले नाही. ही माहिती जर स्वयंघोषित संस्कृती रक्षकांच्या  हाती  लागली तर त्याचे घातक परिणाम समोर येतील अशी आधार भीतीही व्यक्त केली गेली. यातून मानवी हक्कांची आणि वैयक्तिक गोपनीयतेचे हक्क डावलले जाण्याचीच भीती समोर आली. त्याचे दुष्परिणाम वेगळेच. यातून आणखी एक गोष्ट प्रकर्षाने पुढे आली आणि ती म्हणजे अशा प्रकारची कौटुंबिक हिंसा ही फक्त स्वतःच्या निवडीने केलेल्या विवाह संबंधात निर्माण होते अशी समजूत करून घेणे.

सर्व गटात आणि सर्वच थरात महिलांवर होणारे शारीरिक व मानसिक अत्याचार हे तसेही सर्वसाधारणपणे वाढतेच आहेत.वेगवेगळ्या संस्थानी निरीक्षणे करून जे निष्कर्ष काढले ते खाली वाढत्या अत्याचारांचे आलेख पाहिले तर सहज समजून येईल.

आलेख १. महिलांवर वाढत चाललेले वर्ष निहाय अतिप्रसंगाचा आहे.
आलेख २. २०१८  ते २०२२ या काळात १२.९ टक्के इतकी महिला विरोधातील हिंसाचाराची टक्केवारी आहे.
आलेख ३. वेगवेगळ्या प्रकारे महिलांवर २०२२ च्या आकडेवारीनुसार गुन्ह्यांची   झालेली नोंद दर्शवतो.

त्यामुळे आंतरविवाहाच्या संदर्भातील हिंसाचाराकडे वेगळ्या दृष्टीने पाहने अर्थहिन आहे. समाज माध्यमातला बटबटीत प्रचार आणि राजकिय हेतूने प्रेरित केलेली वक्तव्ये,आणि पसरवलेला फोबीया तर दुर्लक्ष करण्यासारखाच.

आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहाची नोंद करण्याचे ज्यांनी प्रयत्न केले त्यांना त्या प्रोसेस मध्ये झालेला मनस्ताप आणि अनुभवाला आलेले मानसिक धक्के यामुळेही प्रत्यक्ष हिंसेची तक्रार करण्याचे धाडस करताना हा आधीच भोगलेला  ताप नजरेसमोर आणून, नको ती तक्रार असे वाटले तर नवल नाही.या संस्थांकडे नोंदणी करताना तुमचे कुटुंब सोडून विजातीय जोडीदाराबरोबर विवाह संबंध प्रस्थापित करताना वारंवार विचारणा,उलट तपासणी, दुसऱ्या जातीत धर्मात जात आहात याचे अनेकवेळा स्मरण करून दिले जाते. पोलिसांसमोर जवळपास उलटतपासणीच केली जाते. एकदा हे केल्यानंतर त्याच जोडीदाराविरुद्ध गैरवर्तणूकीची, हिंसेची तक्रार त्याचं संस्थांकडे करावी लागते. आणि या संस्था अशाप्रकारच्या 'सर्व समान आहेत' या शिकवणुकीच्या ट्रेनिंगला मुकलेल्या असतात. त्यामुळे हेच होणार होते हे आधी समजले नाही काय,कसलीही तक्रार असणार नाही हे तुम्ही लिहून दिले आहे किंवा तत्सम विधाने तोंडावर मारली जातात. मग तक्रार  घेऊन जायचे कुठे हा प्रश्न निर्माण होतो.यात खरी गरज आहे ती  अडचणीच्या काळात कुटुंबीयांनी खंबीरपणे अशांना आधार देण्याची,मदत करण्याची, होता होईल तेवढे गोष्टी सुरळीत कशा होतील हे पाहण्याची; ही वेळ आकांडतांडव करण्याची नसते.  
 
कायदेशीर, आरोग्यविषयक,आणि संरक्षण देण्यासाठी म्हणून निर्माण केल्या गेलेल्या संस्था या संवेदनशील आणि सहानुभूतीपूर्ण राहून गाऱ्हाणे ऐकून घेण्याच्या त्यांच्या मूलभूत कामापासून कोसो दूर राहतात. समोर आलेली परिस्थिती  निवळण्यासाठी काय करता येईल ज्यामुळे दोघांचे वैवाहिक जीवन वीना अडथळा सुखरूप पुढे सुरू राहील यासाठी समजूतदारपणा दाखवण्याची किमान अपेक्षा बाळगून त्यासाठी प्रयत्न करण्याचे या संस्थांचे कार्य होताना दिसत नाही. किंबहुना उलट्या दिशेनेच सगळा व्यवहार असतो.

आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह केलेल्या व्यक्तीचे असे प्रश्न हाताळून त्यांचे पुनर्वसन जवळ जवळ अशक्य होते. अत्याचार जुलूम ही गोष्ट काही फक्त अशा प्रकरणात घडते असे नाही. त्याचे ताणे बाणे हे सर्वसाधारणपणे समाजाच्या सर्वच थरात सर्वच ठिकाणी सारख्याच तीव्रतेने अनुभवाला येतात. या ठिकाणी त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहणे एकूण समस्येला भलतीकडेच नेणारे ठरते. व्यक्तीची वैयक्तिक ओळख, त्याचा सन्मान आणि निवडीचे स्वातंत्र्य असलेले आयुष्य जगण्याची मुभा या मूलभूत हक्कांवर गदा आणली जाते आणि मानसिक स्वास्थ्यच हरवून जाते. मग विवाह या संस्थेविषयीच शंका उपस्थित व्हायला लागतात व नको ते लग्न या निष्कर्षाला व्यक्ती पोहोचते. समाजातील लग्ना विषयीच्या पारंपरिक श्रद्धा आणि सामाजिक उतरंड,जाती व्यवस्था हे सगळे तोडल्याची खंतच फक्त मनात घर करून राहते. या गोष्टीची सामाजिक आणि कायदेशीर सोडवणूक करता येत नाही हे समोर येते. आणि व्यक्ती तुटायला लागते. हे तुटणे वेगवेगळ्या प्रकारचे असते. आहे ते, समोर आले आहे ते, सहन करीत रहा,स्वतःलाच दोष देत रहा,एकलकोंडे बना आणि शेवटी सहन करण्यापलीकडे गेल्यावर सगळे जिवनच संपवण्याच्या विचारांनी ट्रान्स मधे जा हेच नशिबी येते. याला जबाबदार इथल्या व्यवस्था आहेत. पण त्यामुळे माणसं थकून जातात. माणसांचं व्यवस्थेपुढे थकून जाणे हे त्या व्यवस्था किती कुचकामी आहेत आणि माणसाच्या स्वतंत्र निर्णय घेण्याच्या मूलभूत अधिकाराच्या, स्वतंत्र व्यक्ती म्हणून आयुष्य जगण्याच्या उर्मि ला काळीमा फासणाऱ्या आहेत हेच दिसून येते. परंपरेच्या बेड्या मात्र आणखीच घट्टपणे कसल्या जातात.







माणसं हरतात आणि व्यवस्था जिंकतात; हे काही प्रगतीशील समाजाचे चांगले लक्षण नव्हे.

बुधवार, डिसेंबर १०, २०२५

महिला दिनाच्या निमित्ताने ...

                                                            महिला दिनाच्या निमित्ताने ...

         स्त्रियांच्या बाबतीत अलीकडे दोन घडामोडी महत्त्वाच्या ठरत आहेत. एक आहे ते पहिल्या महायुद्धातील महिलांच्या  अतुलनीय कामगिरीवरील नवे पुस्तक आणि दुसरे  अफगाणिस्तानात काबूल च्या रस्त्यावर आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी उतरलेल्या निदर्शनकारी स्त्रिया. पहिल्यांदा एका पुस्तकाची गोष्ट.
               महिलांकडे पाहण्याचा जगभरातील पुरुषी दृष्टिकोन काही नवा नाही. ताकत, बुध्दी, कौशल्ये, सारासार विचार,प्रवास, नोकरी , धाडस या सगळ्याच बाबतीत  त्यांना पुरुषांपेक्षा सर्वच क्षेत्रात कमी लेखले गेले. एकविसाव्या शतकात हळू हळू यात फरक दिसू लागला. आणि थेट सैन्य दलात ही त्यांची नेमणूक होवू लागली. सैन्यात लढाई, संघर्ष,युद्ध, इत्यादी कामात त्यांची मदत घेतली जाऊ लागली.लढावू विमानांची फायटर पायलट, युद्धातील सैनिक, इत्यादी कामात जिथे आत्यंतिक धाडस, तातडीने अचूक निर्णय घेण्याची क्षमता यांचा कस लागतो अशा अतिशय मोक्याच्या कामात त्यांना सामावून घेतले जावू लागले. त्यापूर्वी आधुनिक युद्ध प्रसंगात सहाय्यक म्हणून त्यांना घेतले जात असे.नर्सेस, डॉक्टर्स, रुग्ण वाहिकेचे चालक आणि सैनिकी मुख्यालयातील सचिव पदावर त्यांची नेमणूक होत असे.  विसाव्या शतकात झालेल्या दोन्ही महायुध्दात  महिलांची कामगिरी लक्ष वेधक होती.त्यामुळे महिलांच्या हक्कांविषयी आणि त्यांच्या आकांक्षा विषयी पश्चिमेत जागृती होत गेली.आणि त्याला कायदेशीरपणाचे कोंदण लाभले. "आय एम नॉट अफ्रेड ऑफ लुकिंग इंटू द रायफल" हे पुस्तक त्याच आवेशाचे प्रतिबिंब आहे. पहिल्या महायुध्दात जर्मनीने अंकित केलेल्या  बेल्जियम आणि फ्रान्स इथे जर्मनां विरूध्द लढणाऱ्या दोस्त राष्ट्रांच्या  सैनिकांना सहाय्य करण्यासाठी मदतीस येणाऱ्यांची संघटना उभारून लढणाऱ्या, अशा आठ महिलांच्या धाडसाची आणि त्यांनी सोसलेल्या हाल अपेष्टांची कहाणी यात मांडली आहे.
           या महिला वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या आहेत.  अनेक अडचणी समोर ठाकल्यानंतर व्यक्ती जरी महिला असली तरी ती काय करू शकते हे मला समोर आणायचे होते असे लेखक म्हणतो. हे करताना त्यांनी आपल्या समोर ठेवलेली उच्च नैतिक मूल्ये पाहिली तर अचंबित व्हायला  होते.  या सगळ्या महिलांना त्यांनी निवडलेल्या मार्गामधले धोके पक्के माहित होते.पुढे पंचवीस वर्षातच जग आणखी एका महायुद्धाला सामोरे गेले.त्यातील महिलांची मोलाची ठरू शकणारी धाडशी कृत्यांची ही झलकच म्हणायला हवी. इतकी मोलाची कामगिरी पहिल्या महायुध्दात महिलांनी केली आहे. अनेकजणी या कार्यात पकडले गेल्यानंतर , तुरुंगात टाकल्यानंतर, तर काही जणींना मृत्युदंड देताना या महिलांना जर्मन सैन्याने अतिशय क्रूर वागणूक दिली. गब्रीएल पेटी या दोस्त राष्ट्रांच्या अतिशय महत्त्वाच्या महिला गुप्तहेरांने तिला शिक्षा देण्यापूर्वी तिने उच्चारलेल्या शेवटच्या वाक्यावरून या पुस्तकाचे नाव घेतले आहे.  ही पूर्वी एका दुकानात सहाय्यकाची  आणि हॉटेल मध्ये वेटर म्हणून काम करत होती. जर्मनीने अंकित केलेल्या बेल्जियम मध्ये रेड क्रॉस ची सहाय्यिका म्हणून काम करत असताना दोस्त राष्ट्रांची गुप्तहेर म्हणून काम करू लागली. १९१५ मध्ये तिची भरती करून घेवून तिला लष्करी सैन्या संबंधी माहिती कशी गोळा करायची याचे  प्रशिक्षण दिले गेले. यात तिने प्रावीण्य सिध्द केले. बेल्जियन सैन्याला हर तऱ्हेची मदत तिने केली. भूमिगत वर्तमानपत्र वितरण प्रणालीने आणि त्यातील उपहासात्मक लिखाणाने तिने जर्मन सैन्याची दिशाभूल ही केली.१९१६ ला तिला अटक झाली. मृत्युदंड झाला.त्यातही तिने आपल्या मात्रूभुमिशी प्रामाणिक राहत जिवंतपणाचा आदर्श घालून दिला. हाल अपेष्टा सहन करूनही तिने आपल्या सहकाऱ्यांची नावे सांगितली नाहीत. किंवा दयेची मागणी करणाऱ्या पत्रावर तिने सहीही केली नाही. शेवटी मृत्यूदंड देण्यापूर्वी, तिच्यावर गोळ्या झाडल्या जात असताना ते प्रत्यक्ष  बघणे होणार नाही म्हणून, धर्मोपदशकाने तिला डोळ्यावर पट्टी बांधायला सांगितले . तेव्हाचे तिचे उत्तर होते," शिक्षा देताना माझ्यावर झाडलेल्या बंदूकिकडे बघण्याची मला खंत वाटत नाही." "आय एम नॉट अफ्रेड ऑफ लुकिंग इंटू द रायफल" युद्ध संपल्यानंतर तिच्या शुरपणासाठी तिचा सन्मान केला गेला आणि तिचे स्मारक ही उभारले गेले.
                  एडिथ कॅवेल ही अशीच इंग्लिश नर्स.जर्मनीचा रणगाडा क्रूरपणे बेल्जियम वरून फिरल्यानंतर बेल्जियम मध्ये पूर्वी कधीकाळी तिने नावारुपास आणलेली नर्सिंग संस्था आणि तिथे केलेल्या कामामुळे ती दोस्त सैन्याला मदतीच्या कामात गुंतली. सैन्यातील जखामिंची सुश्रुषा करून, बरे करून, त्यांना हॉलंड ला पाठवायचे काम तिने केले. त्यावेळी ती पन्नाशीत होती.जर्मनांनी तिला अटक केली.मृत्युदंडाची शिक्षा  झाली. शिक्षा सुनावणीच्या वेळी नर्स चा युनिफॉर्म घातला तर तुझी शिक्षा थोडी सौम्य होईल या तिच्या सहकाऱ्यांचे म्हणणे तिने ऐकले नाही. पण पुढे तिच्या हत्येने जर्मन सैन्याची बदनामीच खूप झाली. आणि जर्मन सेनाधिकाऱ्याने, "मला विचारल्याशिवाय कोणत्याही महिलेची शिक्षा अमलात आणायची नाही", असा हुकूम जारी केला. या निर्णयाने त्याकाळात पकडल्या गेलेल्या अनेक महीला गुप्तहेरांचे हाल सुसह्य झाले. त्यांच्या मृत्युदंडाची शिक्षा जन्मठेपेत बदलली गेली.
                 मार्था नोकर्ट हिला तर जर्मनीनेच नर्स म्हणून भरती केले होते. जखमी सैनिकांशी बोलता बोलता तिने त्यांच्या लश्करी धैर्याबद्दलची व क्षमतेबद्दलची अतिशय संवेदनशील माहिती गोळा केली. जर्मन सैन्य गॅस मास्क आणि अवजड लोखंडी काळे सिलिंडर्स ट्रक मधून उतरवत असल्याची माहिती गोळा करून तिने तिच्या उच्च पदस्थाकडे  पाठवली होती. पण त्याकडे दोस्त सैन्याचे दुर्लक्ष झाले आणि दोस्त सैन्याला क्लोरीन गॅस चा सामना करावा लागला. हा युद्धातला पहिला रासायनिक अस्त्रांचा उपयोग होता.
                प्रिन्सेस मारी डे क्रॉय  हीचा, ती राहत असलेल्या खेड्यातील वाडा, जर्मन सैन्याने प्रादेशिक कमांड हेड क्वार्टर म्हणून वापरला होता. इमारतीच्या वरच्या भागातील एक गुप्त खोली,  दोस्त सैन्यातील काही सैनिकांना डच बंदरा पर्यंत पोचवण्यापूर्वी लपविण्यासाठी म्हणून वापरण्याचे अचाट धाडस तिने केले. एक वर्षानंतर तिचे हे कृत्य उघडकीस आले आणि तिला तुरुंगवास झाला. तिच्यासोबत कौंटेस बेलेविले  हिने दोस्त सैन्याला जर्मनांच्या तुरुंगातून पळून जायला मदत केली. तेही जर्मन सैन्याने डच सीमारेषेवर पळून जायला प्रतिबंध करणारे विजेरी तारांचे कुंपण घातले असतानाही.
                आणि आता आपल्या शेजारील अफगाणिस्तानात रस्त्यावर उतरूण निदर्शने करणारऱ्या महिलांची गोष्ट.....परवाच तालिबानच्या जुलामाला  कंटाळून भारतात आश्रयास आलेल्या एका अफगाण स्त्रीचे हे मनोगत.. अलीकडेच तालिबानने अफगाणिस्तानात मुली व स्त्रियांनी सार्वजनिक जागेत ,परिसरात, मोकळ्या जागेत जोराने बोलणे किंवा मोठ्या आवाजात प्रार्थना करणे यावर बंदी घातली आहे. शिवाय स्त्रीने सार्वजनिक ठिकाणी पूर्ण अंगभर कपडे परिधान करून स्वताला झाकून घेण्याचे फर्मान ही काढले आहे. अशाप्रकारे स्त्रियांचे दमण केल्याने त्यांना क्षुल्लक लेखता येते व दुय्यमपणा त्यांच्या माथी मारता येतो आणि त्यांच्याकडे निव्वळ शारीरिक दृष्टीनेच पहाता येते असे नाही तर आजूबाजूच्या वातावरणापासून त्यांना वेगळे करता येते.त्यांचे अस्तित्वच आजूबाजूच्या परिसरातून नगण्य केले जाते. आणि मग त्या रिकाम्या जागी पुरुषांना संधी उपलब्ध होते.आजूबाजूच्या वातावरणातून त्यांना निष्कासित केले जाते, आणि दमनाची ही एक परंपराच होवून जाते. पण मग ही अतीव दडपणाची भूमिका त्यांना खडबडून जागी करते आणि मग त्या जेव्हा बोलू लागतात, बंधन तोडून निदर्शने करत अन्यायाला वाचा फोडू पहातात तेव्हा तेव्हा पुरुष भितिग्रस्त होतात. याचे एक कारण म्हणजे स्त्री बोलते तेंव्हा तेंव्हा ती फक्त स्वतःविषयी बोलत नाही तर ती समुहाविषयी, समुदायाविषयी ही बोलते.न्यायासाठी ती झगडते आणि मुख्य म्हणजे समानातेसाठीही. त्यांचा आवाज मग दमणकारी व्यवस्थेला त्यांच्या जैसे थे व्यवस्थेला हादरवणारा असतो. त्यात दडपशाही ची व्यवस्था आणि त्याचे सत्ता समतोल बिघडवणारी उर्मी असते. काबुलच्या रस्त्यावर उतरलेल्या निदर्शने करणाऱ्या स्त्रिया हेच दाखवून देत आहेत की दडपशाहीची किंमत आतापर्यंत खूप चुकवून झाली आहे, आता बास्स. एक महत्त्वाची गोष्ट..पुरुष मात्र अजूनही निराशच आहेत. पण या स्त्रिया डगमगल्या नाहीत,हे आशेचे लक्षण मानले पाहिजे. या स्त्रियांच्या आवाजामुळे कुणाला धडकी भरते आहे? कुणाला भीती वाटते आहे.?
             वेगवेगळ्या धार्मिक परंपरेत पुरुषांना स्त्रियांचे संरक्षक म्हणून पालकत्व बहाल केले गेले आहे. आणि ते महत्त्वपूर्ण मानले गेले आहे.याचे एक कारण स्त्रियांचे शरीर आणि त्याची पवित्रता याच्यामध्ये पुरुष सताक व्यवस्था सामूहिकपणे सन्मान, कीर्ती आणि प्रतिष्ठा मानत आली आहे. प्रगतपूर्व भारतात पुरूष सत्ताक समूहात जी समुदायाची प्रतिष्ठा म्हणून मान्यता पावलेली गोष्ट परंपरेने चालत आली होती ती  त्या समुदायातील महिलांच्या प्रतिष्ठेशी संलग्न होती. समुदायातील महिला सुरक्षित असणे, त्यांचे पालकत्व स्वीकारणे व त्यांना सुरक्षित करणे यात पुरुष स्वताला सन्मानजनक , प्रतिष्ठित व पौरूषेय मानत असत.
            स्त्री कडे नैतिक सद्गुण आहेत की नाही हे ठरवणे तिच्या हाती नाही तर ते ठरवणारे पुरुष , आणि म्हणून त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पुरुषाने स्वतःच स्वतःकडे घेतली. तिला स्वातंत्र्य मिळणार नाही हे पाहीले गेले. कारण तिला स्वातंत्र्य दिले तर ती पथभ्रष्ट होईल. आणि त्यांना सुरक्षितता पुरवली नाही तर त्या दोन्ही कुटूंबांना दुःखात लोटतील. स्त्रियांना पुरुषांनी स्वतःचा पाल्य बनवले.आणि ते स्वतः पालक बनले. स्त्रियांना पारतंत्र्यात लोटून, त्यांच्यावतीने सगळे निर्णय स्वतः घेवून. त्यांना कसला आवाजच  ना ठेवता. बळजबरीने.
                मुलगी, पत्नी किंवा आई या तीन भूमिकेतून तिच्याकडे पाहिले गेले, पुरुषा सारखेच स्त्रीकडे स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहिले गेले नाही. एकप्रकारे गुलाम म्हणून तरी किंवा याचक म्हणून तरी. वैयक्तिक  रित्या स्त्री स्वतंत्रपणे धार्मिक अधिष्ठान  व समारंभात अधिकारीकरित्या वावरू शकणार नाही याचीही व्यवस्था  धर्म शास्त्रात केली गेली. तिने एकटीने घराबाहेर फिरू नये. एकटीने इतरांच्या घरात वास्तव्य करू नये.स्त्रीला दिक्षा घ्यायची असेल तर तिच्या नातेवाइकांची परवानगी तिला काढावी लागेल. मात्र पुरुषांना अशा प्रकारच्या परवानगीची गरज नाही.
               लहानपणी वडील तिचे पालक व संरक्षक असतात, तरुणपणात पती तिचे पालकत्व करतो, म्हातारपणी मुलगा तिचे पालकत्व करतो, कारण स्त्री ही स्वतंत्रपणे राहायला वागायला अयोग्य आहे. यात स्त्री चे म्हातारपणात पालकत्व ठळकपणे तिच्या पुत्राला दिले आहे. याच अर्थ स्त्रीला पूत्र हवाच असाही होतो. संतती परंपरा पवित्र ठेवने महत्त्वाचे मानले गेल्यामुळे त्याची सगळी जबाबदारी स्त्रीकडे दिली गेली. पुरुषांना मात्र मोकळीकच दिली गेल्याचे दिसते.
             पुराणातील कथा आणि तत्कालीन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजकारणात आणि राष्ट्र उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या महिला तुलनेने कमी व अपवादात्मक आहेत. त्यांची चर्चा व्हायला हवीच. पण आधुनिक काळात युध्दाच्या धगधगनाऱ्या समर प्रसंगात राष्ट्रहित आणि माणुसकीचे ध्येय उराशी बाळगत ,मानवी जग अस्तंगत होण्याच्या मार्गावर असताना ,कोठेच विधी निषेध पाळले जात नसताना,स्वतःहून रणांगणात उडी घेऊन, अत्याचारांचा प्रतिकार करत, ठाम राहणाऱ्या आणि भविष्यातील हित लक्षात घेत आहुती देणाऱ्या या व यासारख्या महीलांचे कर्तृत्व नजरेसमोर ठेवायला हवेत. कारण ते कर्तृत्व आजच्या काळातले आहे. ते समोर ठेवले म्हणजे  आपण नेमके कुठे ऊभे आहोत आणि आपले स्थान काय याचे भान यायला सोपे जाते. 






ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ

ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ सगळ्याच तीर्थंकरांचा उपदेश एकसारखाच असेल का...