महिला दिनाच्या निमित्ताने ...
स्त्रियांच्या बाबतीत अलीकडे दोन घडामोडी महत्त्वाच्या ठरत आहेत. एक आहे ते पहिल्या महायुद्धातील महिलांच्या अतुलनीय कामगिरीवरील नवे पुस्तक आणि दुसरे अफगाणिस्तानात काबूल च्या रस्त्यावर आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी उतरलेल्या निदर्शनकारी स्त्रिया. पहिल्यांदा एका पुस्तकाची गोष्ट.
महिलांकडे पाहण्याचा जगभरातील पुरुषी दृष्टिकोन काही नवा नाही. ताकत, बुध्दी, कौशल्ये, सारासार विचार,प्रवास, नोकरी , धाडस या सगळ्याच बाबतीत त्यांना पुरुषांपेक्षा सर्वच क्षेत्रात कमी लेखले गेले. एकविसाव्या शतकात हळू हळू यात फरक दिसू लागला. आणि थेट सैन्य दलात ही त्यांची नेमणूक होवू लागली. सैन्यात लढाई, संघर्ष,युद्ध, इत्यादी कामात त्यांची मदत घेतली जाऊ लागली.लढावू विमानांची फायटर पायलट, युद्धातील सैनिक, इत्यादी कामात जिथे आत्यंतिक धाडस, तातडीने अचूक निर्णय घेण्याची क्षमता यांचा कस लागतो अशा अतिशय मोक्याच्या कामात त्यांना सामावून घेतले जावू लागले. त्यापूर्वी आधुनिक युद्ध प्रसंगात सहाय्यक म्हणून त्यांना घेतले जात असे.नर्सेस, डॉक्टर्स, रुग्ण वाहिकेचे चालक आणि सैनिकी मुख्यालयातील सचिव पदावर त्यांची नेमणूक होत असे. विसाव्या शतकात झालेल्या दोन्ही महायुध्दात महिलांची कामगिरी लक्ष वेधक होती.त्यामुळे महिलांच्या हक्कांविषयी आणि त्यांच्या आकांक्षा विषयी पश्चिमेत जागृती होत गेली.आणि त्याला कायदेशीरपणाचे कोंदण लाभले. "आय एम नॉट अफ्रेड ऑफ लुकिंग इंटू द रायफल" हे पुस्तक त्याच आवेशाचे प्रतिबिंब आहे. पहिल्या महायुध्दात जर्मनीने अंकित केलेल्या बेल्जियम आणि फ्रान्स इथे जर्मनां विरूध्द लढणाऱ्या दोस्त राष्ट्रांच्या सैनिकांना सहाय्य करण्यासाठी मदतीस येणाऱ्यांची संघटना उभारून लढणाऱ्या, अशा आठ महिलांच्या धाडसाची आणि त्यांनी सोसलेल्या हाल अपेष्टांची कहाणी यात मांडली आहे.
या महिला वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या आहेत. अनेक अडचणी समोर ठाकल्यानंतर व्यक्ती जरी महिला असली तरी ती काय करू शकते हे मला समोर आणायचे होते असे लेखक म्हणतो. हे करताना त्यांनी आपल्या समोर ठेवलेली उच्च नैतिक मूल्ये पाहिली तर अचंबित व्हायला होते. या सगळ्या महिलांना त्यांनी निवडलेल्या मार्गामधले धोके पक्के माहित होते.पुढे पंचवीस वर्षातच जग आणखी एका महायुद्धाला सामोरे गेले.त्यातील महिलांची मोलाची ठरू शकणारी धाडशी कृत्यांची ही झलकच म्हणायला हवी. इतकी मोलाची कामगिरी पहिल्या महायुध्दात महिलांनी केली आहे. अनेकजणी या कार्यात पकडले गेल्यानंतर , तुरुंगात टाकल्यानंतर, तर काही जणींना मृत्युदंड देताना या महिलांना जर्मन सैन्याने अतिशय क्रूर वागणूक दिली. गब्रीएल पेटी या दोस्त राष्ट्रांच्या अतिशय महत्त्वाच्या महिला गुप्तहेरांने तिला शिक्षा देण्यापूर्वी तिने उच्चारलेल्या शेवटच्या वाक्यावरून या पुस्तकाचे नाव घेतले आहे. ही पूर्वी एका दुकानात सहाय्यकाची आणि हॉटेल मध्ये वेटर म्हणून काम करत होती. जर्मनीने अंकित केलेल्या बेल्जियम मध्ये रेड क्रॉस ची सहाय्यिका म्हणून काम करत असताना दोस्त राष्ट्रांची गुप्तहेर म्हणून काम करू लागली. १९१५ मध्ये तिची भरती करून घेवून तिला लष्करी सैन्या संबंधी माहिती कशी गोळा करायची याचे प्रशिक्षण दिले गेले. यात तिने प्रावीण्य सिध्द केले. बेल्जियन सैन्याला हर तऱ्हेची मदत तिने केली. भूमिगत वर्तमानपत्र वितरण प्रणालीने आणि त्यातील उपहासात्मक लिखाणाने तिने जर्मन सैन्याची दिशाभूल ही केली.१९१६ ला तिला अटक झाली. मृत्युदंड झाला.त्यातही तिने आपल्या मात्रूभुमिशी प्रामाणिक राहत जिवंतपणाचा आदर्श घालून दिला. हाल अपेष्टा सहन करूनही तिने आपल्या सहकाऱ्यांची नावे सांगितली नाहीत. किंवा दयेची मागणी करणाऱ्या पत्रावर तिने सहीही केली नाही. शेवटी मृत्यूदंड देण्यापूर्वी, तिच्यावर गोळ्या झाडल्या जात असताना ते प्रत्यक्ष बघणे होणार नाही म्हणून, धर्मोपदशकाने तिला डोळ्यावर पट्टी बांधायला सांगितले . तेव्हाचे तिचे उत्तर होते," शिक्षा देताना माझ्यावर झाडलेल्या बंदूकिकडे बघण्याची मला खंत वाटत नाही." "आय एम नॉट अफ्रेड ऑफ लुकिंग इंटू द रायफल" युद्ध संपल्यानंतर तिच्या शुरपणासाठी तिचा सन्मान केला गेला आणि तिचे स्मारक ही उभारले गेले.
एडिथ कॅवेल ही अशीच इंग्लिश नर्स.जर्मनीचा रणगाडा क्रूरपणे बेल्जियम वरून फिरल्यानंतर बेल्जियम मध्ये पूर्वी कधीकाळी तिने नावारुपास आणलेली नर्सिंग संस्था आणि तिथे केलेल्या कामामुळे ती दोस्त सैन्याला मदतीच्या कामात गुंतली. सैन्यातील जखामिंची सुश्रुषा करून, बरे करून, त्यांना हॉलंड ला पाठवायचे काम तिने केले. त्यावेळी ती पन्नाशीत होती.जर्मनांनी तिला अटक केली.मृत्युदंडाची शिक्षा झाली. शिक्षा सुनावणीच्या वेळी नर्स चा युनिफॉर्म घातला तर तुझी शिक्षा थोडी सौम्य होईल या तिच्या सहकाऱ्यांचे म्हणणे तिने ऐकले नाही. पण पुढे तिच्या हत्येने जर्मन सैन्याची बदनामीच खूप झाली. आणि जर्मन सेनाधिकाऱ्याने, "मला विचारल्याशिवाय कोणत्याही महिलेची शिक्षा अमलात आणायची नाही", असा हुकूम जारी केला. या निर्णयाने त्याकाळात पकडल्या गेलेल्या अनेक महीला गुप्तहेरांचे हाल सुसह्य झाले. त्यांच्या मृत्युदंडाची शिक्षा जन्मठेपेत बदलली गेली.
मार्था नोकर्ट हिला तर जर्मनीनेच नर्स म्हणून भरती केले होते. जखमी सैनिकांशी बोलता बोलता तिने त्यांच्या लश्करी धैर्याबद्दलची व क्षमतेबद्दलची अतिशय संवेदनशील माहिती गोळा केली. जर्मन सैन्य गॅस मास्क आणि अवजड लोखंडी काळे सिलिंडर्स ट्रक मधून उतरवत असल्याची माहिती गोळा करून तिने तिच्या उच्च पदस्थाकडे पाठवली होती. पण त्याकडे दोस्त सैन्याचे दुर्लक्ष झाले आणि दोस्त सैन्याला क्लोरीन गॅस चा सामना करावा लागला. हा युद्धातला पहिला रासायनिक अस्त्रांचा उपयोग होता.
प्रिन्सेस मारी डे क्रॉय हीचा, ती राहत असलेल्या खेड्यातील वाडा, जर्मन सैन्याने प्रादेशिक कमांड हेड क्वार्टर म्हणून वापरला होता. इमारतीच्या वरच्या भागातील एक गुप्त खोली, दोस्त सैन्यातील काही सैनिकांना डच बंदरा पर्यंत पोचवण्यापूर्वी लपविण्यासाठी म्हणून वापरण्याचे अचाट धाडस तिने केले. एक वर्षानंतर तिचे हे कृत्य उघडकीस आले आणि तिला तुरुंगवास झाला. तिच्यासोबत कौंटेस बेलेविले हिने दोस्त सैन्याला जर्मनांच्या तुरुंगातून पळून जायला मदत केली. तेही जर्मन सैन्याने डच सीमारेषेवर पळून जायला प्रतिबंध करणारे विजेरी तारांचे कुंपण घातले असतानाही.
आणि आता आपल्या शेजारील अफगाणिस्तानात रस्त्यावर उतरूण निदर्शने करणारऱ्या महिलांची गोष्ट.....परवाच तालिबानच्या जुलामाला कंटाळून भारतात आश्रयास आलेल्या एका अफगाण स्त्रीचे हे मनोगत.. अलीकडेच तालिबानने अफगाणिस्तानात मुली व स्त्रियांनी सार्वजनिक जागेत ,परिसरात, मोकळ्या जागेत जोराने बोलणे किंवा मोठ्या आवाजात प्रार्थना करणे यावर बंदी घातली आहे. शिवाय स्त्रीने सार्वजनिक ठिकाणी पूर्ण अंगभर कपडे परिधान करून स्वताला झाकून घेण्याचे फर्मान ही काढले आहे. अशाप्रकारे स्त्रियांचे दमण केल्याने त्यांना क्षुल्लक लेखता येते व दुय्यमपणा त्यांच्या माथी मारता येतो आणि त्यांच्याकडे निव्वळ शारीरिक दृष्टीनेच पहाता येते असे नाही तर आजूबाजूच्या वातावरणापासून त्यांना वेगळे करता येते.त्यांचे अस्तित्वच आजूबाजूच्या परिसरातून नगण्य केले जाते. आणि मग त्या रिकाम्या जागी पुरुषांना संधी उपलब्ध होते.आजूबाजूच्या वातावरणातून त्यांना निष्कासित केले जाते, आणि दमनाची ही एक परंपराच होवून जाते. पण मग ही अतीव दडपणाची भूमिका त्यांना खडबडून जागी करते आणि मग त्या जेव्हा बोलू लागतात, बंधन तोडून निदर्शने करत अन्यायाला वाचा फोडू पहातात तेव्हा तेव्हा पुरुष भितिग्रस्त होतात. याचे एक कारण म्हणजे स्त्री बोलते तेंव्हा तेंव्हा ती फक्त स्वतःविषयी बोलत नाही तर ती समुहाविषयी, समुदायाविषयी ही बोलते.न्यायासाठी ती झगडते आणि मुख्य म्हणजे समानातेसाठीही. त्यांचा आवाज मग दमणकारी व्यवस्थेला त्यांच्या जैसे थे व्यवस्थेला हादरवणारा असतो. त्यात दडपशाही ची व्यवस्था आणि त्याचे सत्ता समतोल बिघडवणारी उर्मी असते. काबुलच्या रस्त्यावर उतरलेल्या निदर्शने करणाऱ्या स्त्रिया हेच दाखवून देत आहेत की दडपशाहीची किंमत आतापर्यंत खूप चुकवून झाली आहे, आता बास्स. एक महत्त्वाची गोष्ट..पुरुष मात्र अजूनही निराशच आहेत. पण या स्त्रिया डगमगल्या नाहीत,हे आशेचे लक्षण मानले पाहिजे. या स्त्रियांच्या आवाजामुळे कुणाला धडकी भरते आहे? कुणाला भीती वाटते आहे.?
वेगवेगळ्या धार्मिक परंपरेत पुरुषांना स्त्रियांचे संरक्षक म्हणून पालकत्व बहाल केले गेले आहे. आणि ते महत्त्वपूर्ण मानले गेले आहे.याचे एक कारण स्त्रियांचे शरीर आणि त्याची पवित्रता याच्यामध्ये पुरुष सताक व्यवस्था सामूहिकपणे सन्मान, कीर्ती आणि प्रतिष्ठा मानत आली आहे. प्रगतपूर्व भारतात पुरूष सत्ताक समूहात जी समुदायाची प्रतिष्ठा म्हणून मान्यता पावलेली गोष्ट परंपरेने चालत आली होती ती त्या समुदायातील महिलांच्या प्रतिष्ठेशी संलग्न होती. समुदायातील महिला सुरक्षित असणे, त्यांचे पालकत्व स्वीकारणे व त्यांना सुरक्षित करणे यात पुरुष स्वताला सन्मानजनक , प्रतिष्ठित व पौरूषेय मानत असत.
स्त्री कडे नैतिक सद्गुण आहेत की नाही हे ठरवणे तिच्या हाती नाही तर ते ठरवणारे पुरुष , आणि म्हणून त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पुरुषाने स्वतःच स्वतःकडे घेतली. तिला स्वातंत्र्य मिळणार नाही हे पाहीले गेले. कारण तिला स्वातंत्र्य दिले तर ती पथभ्रष्ट होईल. आणि त्यांना सुरक्षितता पुरवली नाही तर त्या दोन्ही कुटूंबांना दुःखात लोटतील. स्त्रियांना पुरुषांनी स्वतःचा पाल्य बनवले.आणि ते स्वतः पालक बनले. स्त्रियांना पारतंत्र्यात लोटून, त्यांच्यावतीने सगळे निर्णय स्वतः घेवून. त्यांना कसला आवाजच ना ठेवता. बळजबरीने.
मुलगी, पत्नी किंवा आई या तीन भूमिकेतून तिच्याकडे पाहिले गेले, पुरुषा सारखेच स्त्रीकडे स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहिले गेले नाही. एकप्रकारे गुलाम म्हणून तरी किंवा याचक म्हणून तरी. वैयक्तिक रित्या स्त्री स्वतंत्रपणे धार्मिक अधिष्ठान व समारंभात अधिकारीकरित्या वावरू शकणार नाही याचीही व्यवस्था धर्म शास्त्रात केली गेली. तिने एकटीने घराबाहेर फिरू नये. एकटीने इतरांच्या घरात वास्तव्य करू नये.स्त्रीला दिक्षा घ्यायची असेल तर तिच्या नातेवाइकांची परवानगी तिला काढावी लागेल. मात्र पुरुषांना अशा प्रकारच्या परवानगीची गरज नाही.
लहानपणी वडील तिचे पालक व संरक्षक असतात, तरुणपणात पती तिचे पालकत्व करतो, म्हातारपणी मुलगा तिचे पालकत्व करतो, कारण स्त्री ही स्वतंत्रपणे राहायला वागायला अयोग्य आहे. यात स्त्री चे म्हातारपणात पालकत्व ठळकपणे तिच्या पुत्राला दिले आहे. याच अर्थ स्त्रीला पूत्र हवाच असाही होतो. संतती परंपरा पवित्र ठेवने महत्त्वाचे मानले गेल्यामुळे त्याची सगळी जबाबदारी स्त्रीकडे दिली गेली. पुरुषांना मात्र मोकळीकच दिली गेल्याचे दिसते.
पुराणातील कथा आणि तत्कालीन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजकारणात आणि राष्ट्र उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या महिला तुलनेने कमी व अपवादात्मक आहेत. त्यांची चर्चा व्हायला हवीच. पण आधुनिक काळात युध्दाच्या धगधगनाऱ्या समर प्रसंगात राष्ट्रहित आणि माणुसकीचे ध्येय उराशी बाळगत ,मानवी जग अस्तंगत होण्याच्या मार्गावर असताना ,कोठेच विधी निषेध पाळले जात नसताना,स्वतःहून रणांगणात उडी घेऊन, अत्याचारांचा प्रतिकार करत, ठाम राहणाऱ्या आणि भविष्यातील हित लक्षात घेत आहुती देणाऱ्या या व यासारख्या महीलांचे कर्तृत्व नजरेसमोर ठेवायला हवेत. कारण ते कर्तृत्व आजच्या काळातले आहे. ते समोर ठेवले म्हणजे आपण नेमके कुठे ऊभे आहोत आणि आपले स्थान काय याचे भान यायला सोपे जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा