आहार आणि लोकसमूह
भारतीय संस्कृती ही वेगवेगळ्या समाज समुहांनी मिळून बनलेली आहे. त्या त्या समुहांच्या परंपरा आणि रीती रिवाज यांनी त्याला जटिल बनवले आहे. त्याची केवळ शाकाहारी समाजसमूह इतकीच ओळख नाही. भारतात प्राचीन काळापासून मांसाहारी आणि शाकाहारी समाज आपापल्या श्रध्दा पाळताना दिसतात. आपली श्रध्दा श्रेष्ठ असल्याची भावना प्रत्येक समाजात बाळगली जाते. त्याला धार्मीक कंगोरे आणि पारंपारिक प्रथा यांचे कोंदण आहे. मात्र या एका पद्धतीच्या समर्थनार्थ आणि दुसऱ्या पद्धतीच्या विरोधी भूमिका घेण्यासंबंधी अलीकडे धार्मिक, राजकीय, सामाजिक स्तरावर हमरी तुमरीवर येत वादाचे प्रसंग निर्माण केले जात आहेत. विविध समाजात देवादिकांना मांसाचा नैवेद्य दाखवून मग त्याचे भक्षण माणूस करत आला आहे. अनेक शतके काही समाजांच्या आहारातून काही कारणाने मांस हद्दपार झाल्याचे दिसते,मात्र त्याला धर्म हेच एकमेव कारण आहे असे नाही.
भारतातील साम्राज्यशाह्यांच्या काळात काही कारणाने जमीन वापराचे अधिक्रम बदलत गेले, शेतीची प्रारूपं बदलली, व्यापाराची प्राथमिकता बदलली,आणि अनेक वर्षे दुष्काळ पडल्यामुळे शेतीतील उत्पन्न कमी झाले. आणि भात, तांदूळ व डाळी चे आहारातील प्रमाण कमी कमी होत गेले. खाणे पिणे आणि आहाराच्या सवयीत कालानुरूप आवश्यक बदल झाले.
गंमत म्हणून किंवा खेळ म्हणून प्राण्याची हत्या करणे या कल्पनेकडे ज्यावेळी आपण पाहतो तेंव्हा एक नैतिक असमाधान जागे होते. पण जेव्हा जेव्हा टेम्पो सारख्या वाहना मधून कोंबड्या उलट्या टांगून नेल्या जात असतात, त्यांचे डोके खाली लोबकळत असते, आणि त्या जिवाच्या आकांताने केकाटत असतात तेव्हा तेव्हा मांसाहार आणि त्याच्या कायदेशीरपणाच्या प्रश्र्नाशी न झगडता सोडून देणे अवघड होते. त्यांच्या त्या ओरडण्यात असते ती आपण आता मारले जाणार आहोत याची जाणीव . आपले अनमोल जीवन आता संपणार आहे याची जाणीव त्यांना होते आहे.ज्याकडे दुर्लक्ष करणे अवघड जाते. त्यांचे मारलेले कलेवर चीवडताना, त्यावर ताव मारताना हे सगळे विसरता येते?...
....हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. आणि त्याचे निखळ उत्तर देणे अवघड आहे. मानवी समूहाने ज्ञात इतिहासाच्या सुरुवातीपासून प्राण्यांची शिकार अन्नासाठी केली आहे. त्यामुळे शाकाहाराला ऐतिहासिक नैतिक मूल्य म्हणून मान्य करणे अवघड दिसते. शिकारीचा, खेळ म्हणूनही विकास झाला आणि त्यातही अनेकांनी महारथ मिळवली. आपल्या शस्त्रांच्या सहाय्याने व त्याचे वर्चस्व सिध्द करण्यासाठी केलेल्या अनेक प्राणिमात्रांच्या खुनाचे मात्र कसलेच समर्थन करता येत नाही.
फर ची टोपी घालने पाप ठरवले जाते आणि गाई गुरांचे कळप बंदिस्त जागेत कोंडून मांस विक्रीसाठी पाळून विकले जातात त्याला उद्योग म्हटले जाते. सिंहाच्या छाव्याला मारणे जास्त दुःखदायक मानतात आणि इतर लुप्त होत असलेल्या प्राणिमात्रांच्या हत्या या तुलनेने कायम दुर्लक्षिल्या जातात. वाघ वाचवण्याच्या चळवळी चालू केल्या जातात आणि अस्तंगत होत चाललेल्या अनेक बेडकांच्या प्रजातींकडे कानाडोळा केला जातो. उग्र जनावरे मारून खाणे अभिमानाने साजरे केले जाते आणि कुत्र्याचे मांस खाणे रानटी.
उत्क्रांतीच्या काळात वेळोवेळी मानवी स्वभावाच्या पसंतीला जे उतरले त्याने प्राधान्यक्रम ठरत गेले आणि त्याच सांस्कृतिक परंपरांचे पालन पुढे घडत गेले असे दिसते. या प्रक्रियेत आपल्या गरजांना अनुकूल होतील असे युक्तीवाद जन्माला घातले गेले आणि त्याच वेळी गैरसोयीच्या सत्याकडे साफ दुर्लक्ष केले गेले. या प्रक्रियेतच कोणाला मारायचे नाही आणि कोणाला मारायचे , कुणाचा वियोग दुःखदायक आणि कुणाची शिकार नियोजनपूर्वक अंमलात आणायची, कुणाला खाणे अभिमानास्पद आणि कुणाचे मांस निषिध्द या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सांस्कृतिक दृष्ट्या सोयीने ठरवलि गेली.
सण, पर्व,उत्सव काळात "मांसाहार बंदी"च्या चर्चा या जीवनाच्या आदरातून कमी आणि संस्कृती आणि सत्ता या मुद्द्यावर जास्त भर देताना दिसतात. आपल्या जात समूहांना पाठीशी घालायचे व मांस खाणारे "ते" आणि शाकाहारी "आम्ही" अशी विभागणी करायची असा खेळ आहे. सांस्कृतिक शुध्दता दुषित होऊ नये म्हणून आणि पावित्र्य राखण्याच्या नादात या शाकाहार आणि मांसाहार च्या संकल्पना उदयाला आल्या. सांस्कृतिक ओळख ठरवणारे घटक म्हणून हे गरजेचे मानले गेले . वैश्विक माणुसकी च्या दृष्टिकोनातून पाहिले तर याचा पाया खूप भक्कम असल्याचे दिसत नाही.
शाकाहारी असणे हे केवळ शाकाहारी कुटुंबात जन्माला आल्यामुळे वा नव्या आरोग्य चळवळीच्या स्वरूपात असलेल्या श्रद्धेला अनुसरून वा स्वतःच्या वेगळे असण्याच्या गरजेतून निर्माण झालेले तत्व आहे की इतर जिवांच्या जीवन जगण्याच्या मूलभूत अधिकारा बाबत जागृत असण्याची कृतिशील भूमिका म्हणून आहे हे स्पष्ट व्हायला हवे. दुसऱ्याला इजा पोहोचू न देण्याची इच्छा, ही एका जीवना पेक्षा दुसऱ्या जीवनाला कमी किंवा अधिक लेखण्याच्या विरूध्द असलेली भूमिका आहे. पण मग सगळी अन्न साखळी ही कोणत्या ना कोणत्या जिवानेच संपन्न झाली आहे त्याचे काय करायचे?
“आज शाकाहाराचा जो प्रश्न चर्चेत आहे तो माणुसकीच्या आदर्श तत्त्वावर आधारलेला नसून,आपल्या सध्याच्या चाली रितीचं समर्थन करण्याच्या भावनेतून निर्माण झाला आहे. तो आक्रमक हस्तक्षेप असून, सुसंस्कृत व सभ्य वैचारिक आदर्शाचे रूपांतर, लोक समूहात विभागणीची बिजं निर्माण करणाऱ्या तीक्ष्ण हत्यारांच्या स्वरूपात करण्यात येत आहे. याची मूळं, दुसरा जो अपवित्र व पावित्र्य नष्ट करणारा मानला गेलाय, त्याचा तिरस्कार करण्यात रुजलेली आहेत. आम्ही म्हणतो तेच बरोबर व योग्य आहे, ही वृत्ती भेदभाव निर्माण करणारे शास्त्र म्हणून वापरले जाते”,असे काहींचे म्हणने आहे. शुध्दता व पावित्र्य याचे आवाहन हे, मांसाहारामुळे शाकाहारिंचे सांस्कृतिक वातावरण अशुध्द होते, या दाव्यावर आधारलेले आहे.
अन्न ही संस्कृती-संस्कृती मध्ये द्वेषाचे हत्यार म्हणून धोकादायक ठरणार आहे. भावनेच्या आधारावर वा भावना दुखावतात म्हणून, मांस विक्री व व्यवहार बंदी करणे, वा करा म्हणणे, म्हणजे दुसऱ्याचे स्वातंत्र्य नाकारण्यासारखे होईल.
घटनेचे कलम १९(१)(g) नुसार आपली राज्यघटना, व्यापार आणि विक्री चा अधिकार, हा मूलभूत अधिकारात देते. मात्र यातील कलम १९(२)(६)अनुसार माफक बंधणे,ती ही वाजवी व हलक्या प्रमाणात, कायदेशीर रीत्याच घालता येतात. सरसकट बंदी घालता येत नाही. नगराध्यक्ष किंवा महापौर यांनी दिलेले आदेश हे कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश असतात ते पुरेसे नसतात. तर ते कायद्याच्या चौकटीत असतील तरच ते कायदेशीर ठरतात. अशा बंदीला जरी वैधानिक पदावरील अधिकाऱ्याचा पाठिंबा असला तरी ही बंदी राज्य घटनेतील सुवर्ण त्रिकोणाच्या (कलम १४,१९,२१) कक्षेच्या कसोटीत पाळली गेली असेल तरच ती कायदेशीर मानली जाते. दिलेला आदेश या तिन्ही कलमानुसार वाजवीपनाच्या सर्व घटकांची कसोटी पूर्ण करायला हवा. कारण घटनेने दिलेली समानतेची हमी ही जुलमिपणाच्या विरूध्द दिलेली हमी आहे.या संदर्भात कलम १४ ची कसोटी पार पाडणे महत्त्वाचे आहे.
कलम २१ हे वैयक्तिक निवडीचे स्वातंत्र्य, मूलभूत हक्काने देणारे कलम आहे. त्यामुळे विशिष्ट आहार निवडण्याचे स्वातंत्र्य हे व्यक्तीचं स्वातंत्र्य व व्यक्तीचे स्वायत्तपण जपणारे आहे.
कलम ५१(A)(e) हे सर्व जाती, धर्म,भाषा,प्रांत आणि प्रादेशिक व विभागीय समुदायात परस्पर सामंजस्य ठेवण्याचे मूलभूत कर्तव्य सांगते.
भारतात अल्पसंख्य असलेल्या वेगवेगळ्या धर्माचे व श्रध्देचे लोकसमुह मोठ्या प्रमाणात राहतात. यातील प्रत्येकाच्या चाली रिती आणि कृतिशील व्यवहार भिन्न आहेत. विविध जाती, धर्म आणि भिन्न समाजाकडून, आपल्या श्रध्दा व व्यवहार यांची सक्ती इतरांच्या वर लादल्याने इतर धर्मश्रद्धावर अतिक्रमण केल्यासारखे होईल.त्याने कलम २५ चा सगळा पायाच उद्ध्वस्त होईल. भारतासारख्या विविध जाती, धर्म, श्रद्धा असलेल्या देशात त्याने वेगळेच युद्ध सुरू होण्याचा धोका निर्माण होईल.
नवरात्रीत किंवा पर्युषण पर्वात काही लोक स्वतःहून मांसाहार वर्ज्य करतात.पण दुसऱ्यांच्या आहारातील मांस बंदीला ते पाठींबा देत नाहीत कारण त्यांना दुसऱ्यांना त्यांच्या अन्नापासून वंचित ठेवायचे नसते. अशा प्रकारच्या वैचारिक कृतिनेच तुमचा समाज, सण आणि धर्म याबद्दल आदर वाढायला मदत होईल. भारतात जिथे ७०% लोक मांसाहार करतात तिथे काही दिवस वा आठवडे सरसकट मांस बंदी करणे हे जनतेत क्षोभ निर्माण करणारी कृती ठरेल.
उत्सव काळात काही अन्नपदार्थावर घातलेली बंदी असो कि विशेष काळात केलेली दारू बंदी असो,किंवा अनुचित वाटणारे माध्यमातील बातमी किंवा म्हणणे असो अशा प्रकारच्या बंदीने फारसे काहीही चांगले, दिलासादायक उत्साहवर्धक किंवा विधायक झाल्याचे दिसत नाही.याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अनुभव सारखेच आहेत. ते म्हणजे ज्यावर बंदी घातली आहे ते राजरोसपणे भूमिगत होते आणि त्याचा खप सर्वसामान्य परिस्थितीत असतो त्याहून जास्त वाढतो. त्यामुळे उत्सव काळात वातावरण शांततामय रहावे म्हणून केलेली मांस बंदी किंवा दारू बंदी खरोखरच वातावरण शांततामय ठेवायला मदत करते काय हा प्रश्न निर्माण होतो.
दुकान लवकर बंद करून विक्रीची वेळ कमी करणे याचा काही फायदा होईल? दुकान ठराविक काळच उघडे राहणार आहे हे कळल्यानंतर लोक जास्तीची खरेदी उघड्या वेळात करतील.... कदाचित जास्तच. आणि हि बंदी विक्रीवर आहे खाण्यापिण्यावर नाही.
निर्बंध आणि बंदी यामुळे ‘कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहील’ आणि ‘स्वच्छता राखली जाईल’? याउपर, ‘भक्तांची सुरक्षितता’ आणि ‘सोय’ कशी काय निर्माण होईल ते देवच जाणोत.
नेहमीच एका ठिकाणची दारू आणि मांस बंदी ,शेजारच्या दुसऱ्या ठिकाणाहून होणाऱ्या पुरवठ्याच्या काळाबाजारात मुरून जाते. त्यामुळे उत्सव काळात आहारावरून, राजकिय व कट्टर संघटना, व्यक्ती यांच्या भडक विधानांमुळे आपली डोकी भडकावून न घेता सौहार्दाच्या वातावरणात सण,उत्सव, पर्व साजरे करणे हे प्राचीन भारतीय संस्कृतीला साजेसे ठरेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा